पाटबंधारे विभागात ६४६पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:19+5:302021-02-27T04:23:19+5:30
परभणी : जिल्ह्यात जायकवाडी पाटबंधारे विभागात ८४० पैकी तब्बल ६४६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनविषयक सुविधा देताना अडचणीत ...

पाटबंधारे विभागात ६४६पदे रिक्त
परभणी : जिल्ह्यात जायकवाडी पाटबंधारे विभागात ८४० पैकी तब्बल ६४६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनविषयक सुविधा देताना अडचणीत येत आहेत. ही पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित जोशी धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. जायकवाडीच्या पाण्यावर जिल्ह्याचे दोन लाख हेक्टर सिंचन क्षेत्र झाले आहे. परभणी येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अथवा परभणी पाटबंधारे मंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही याकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ येथे सिंचन व्यवस्थापन अस्थापनेवर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधानुसार जानेवारी २०२१अखेर जिल्ह्यात ८४० पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल ६४६पदे रिक्त आहेत. प्रत्यक्षात केवळ १९४ पदे कार्यरत आहेत. अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, उपविभागाीय अभियंता ५, शाखा अभियंता २५, कालवा निरीक्षक २३२, मोजणीदार १०६, स्थानिक अभियांत्रिकी सहाय्यक पाच एवढी पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम सिंचन क्षमतेवर होत आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन सिंचन व्यवस्थापनाचे कंत्राटीकरण करून सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे धोरण आखले होते; परंतु, त्यादृष्टीने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उन्हाळी पिकांसाठी पाण्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच परभणी येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण किंवा परभणी पाटबंधारे मंडळ स्थापन करावे, अशी मागणी अभिजित जोशी धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.