४८ तासात ४८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:15+5:302021-04-20T04:18:15+5:30
मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. दररोज १५ ते २० रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र रविवार ...

४८ तासात ४८ जणांचा मृत्यू
मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. दररोज १५ ते २० रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र रविवार आणि सोमवार हे दोन दिवस जिल्ह्यासाठी क्लेशदायक ठरले. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. रात्री ८ वाजेपासून ते पहाटेपर्यंत २४ रुग्ण कोरोनाने दगावले. तर सोमवारी दिवसभरात १६ कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसाच्या ४८ तासात ४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच स्वत:हून कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
१९ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयातील १२ आणि खासगी रुग्णालयातील ४ अशा १६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ७ महिला आणि ९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्याही तेवढ्याच पटीने वाढली आहे. आरोग्य विभागाला सोमवारी १ हजार ९६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आरटीपीसीआरच्या १ हजार ३५१ अहवालात ३२६ आणि रॅपिड टेस्टच्या ६१८ अहवालात २४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दिवसभरात ५७३ नवीन रुग्णांची नोंद झाली.
जिल्ह्यात एकूण २६ हजार ८७ रुग्ण संख्या झाली असून १९ हजार १६२ रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७७१ वर पोहोचली. सध्या ५ हजार ५५४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
शहरातील जिल्हा रुग्णालयात २१५, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५२, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २६५, अक्षदा मंगल कार्यालयात १४७, रेणुका हॉस्पिटलमध्ये १२२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार १०० एवढी आहे. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
७१३ रुग्णांची कोरोनावर मात
सोमवारी ७१३ रुग्णांनी कोराेनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मागील काही दिवसापासून नवीन नोंदणी होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तेवढी एक समाधानाची बाब आहे.