भर उन्हात चक्कर येऊन पडल्याने ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; परभणी शहरातील घटना
By राजन मगरुळकर | Updated: May 6, 2025 18:36 IST2025-05-06T18:35:31+5:302025-05-06T18:36:12+5:30
वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग येथे ऑटोची वाट पाहत थांबलेले असताना अचानक चक्कर येऊन पडले

भर उन्हात चक्कर येऊन पडल्याने ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; परभणी शहरातील घटना
परभणी : घरातून बाहेर पडल्यावर लग्न समारंभासाठी जाण्यास निघालेल्या ४३ वर्षीय व्यक्तीचा भर उन्हात दुपारी चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना परभणी शहरात वसमत महामार्गावर शिवशक्ती बिल्डिंग परिसरात मंगळवारी दुपारी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान घडली.
राम दगडू शिंदे (रा. समझोता कॉलनी, परभणी) असे मयताचे नाव आहे. समझोता कॉलनी भागातील रहिवासी राम शिंदे हे मंगळवारी दुपारी पिंगळी येथे लग्न समारंभास जाण्यास घरातून बाहेर पडले. वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग येथे ऑटोची वाट पाहत थांबले होते. दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी शिंदे यांना अचानक चक्कर आली. शिंदे हे जागेवर पडल्याने बेशुद्ध झाले. त्यानंतर नागरिकांनी त्यांना एका खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, या प्रकरणी नवा मोंढा ठाण्यात दगडू शिंदे यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास गोविंद चुडावकर, माणिक पवार करीत आहेत. मयत शिंदे यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, आई, वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शहरात तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअस एवढा मंगळवारी नोंद झाला होता. त्यामुळे वाढत्या तापमानाने उष्णतेने उन्हाच्या झळा लागत आहेत.