३०३ चालक, वाहकांचा रोज ११ हजार प्रवाशांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:00+5:302021-02-25T04:21:00+5:30
परभणी : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र दररोज ११ हजार प्रवाशांशी संपर्क येणाऱ्या ३०३ बसच्या ...

३०३ चालक, वाहकांचा रोज ११ हजार प्रवाशांशी संपर्क
परभणी : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र दररोज ११ हजार प्रवाशांशी संपर्क येणाऱ्या ३०३ बसच्या चालक व वाहकांना कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे परभणी बसस्थानकावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परभणी येथील बसस्थानकावरून जिल्ह्यातील कोरोना कोपऱ्यासह परजिल्ह्यात प्रवाशांची मोठी ये-जा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. येथील प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज ७४० बस फेऱ्या करण्यात येतात. या बसफेऱ्यांतून जवळपास ११ हजार प्रवासी प्रवास करतात. यासाठी १४८ वाहक तर १५५ चालक असे एकूण ३०३ कर्मचारी कर्तव्यावर असतात. मागील ८ दिवसांपासून विदर्भासह जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे दररोज ११ हजार प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक व वाहकांसाठी परभणी येथील एसटी महामंडळ प्रशासनाने सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्स या सुविधांसह त्यांची तपासणी करून त्यांना लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र या संदर्भात कोणतीही पावले प्रशासनाकडून उचलली जात नाहीत.
मास्क, सॅनिटायझरवर होणारा खर्च
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून एसटी महामंडळ प्रशासनाच्या वतीने चालक व वाहकांना सॅनिटायझरचा पुरवठा केला जात होता.
मागील काही दिवसांपासून सॅनिटायझरचा पुरवठा बंद आहे.
दुसरीकडे मास्कचे वाटप महामंडळाकडून करण्यात आले नाही. विशेष म्हणजे काही चालक, वाहकांनी मास्कचा वापर केलाच नाही.
११००० प्रवाशांचा रोज प्रवास
परभणी बसस्थानकावरून दररोज ११ हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र यातील बहुतांश प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही. त्याचबरोबर बसमध्ये कोणतेही फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
तपासणीच नाही
जिल्ह्यातील कानाकोपऱ्यासह परजिल्ह्यात जाणाऱ्या परभणी आगारातील चालक व वाहकांची आरोग्य विभागाकडून तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोग्य विभागाने व एसटी महामंडळ प्रशासनाने या कर्मचाऱ्यांची तपासणी केलेली नाही.
लॉकडाऊननंतर बस सुरू झाल्या. एसटी महामंडळ प्रशासनाकडून चालक व वाहकांना सॅनिटाझर उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर आता उद्यापासून कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जाईल.
-दयानंद पाटील, आगारप्रमुख, परभणी
बसस्थानकावर प्रवाशांची गर्दीच गर्दी
जिल्हा प्रशासन विदर्भात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहे. मात्र दुसरीकडे परभणीच्या बसस्थानकावर प्रवाशांसाठी कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही दिवसांपासून या स्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना मास्क वापरण्याचा विसरही पडला आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.