बाह्यवळण रस्त्यासाठी २८ कोटी ८९ लाख प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST2021-07-17T04:14:54+5:302021-07-17T04:14:54+5:30
कल्याण-निर्मल या ६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरून वळण रस्ता काढण्यात आला आहे. १४.५ किमी लांबीच्या या रस्त्यासाठी सुमारे ...

बाह्यवळण रस्त्यासाठी २८ कोटी ८९ लाख प्राप्त
कल्याण-निर्मल या ६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरून वळण रस्ता काढण्यात आला आहे. १४.५ किमी लांबीच्या या रस्त्यासाठी सुमारे ८४ हेक्टर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केली. जमिनीचे मूल्यांकन काढून मावेजाची रक्कम निश्चित करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेऊन नाहरकतही घेण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना वितरित करावयाच्या मावेजाची रक्कम मागील दोन वर्षांपासून रखडली होती. त्यामुळे जमीन संपादनाअभावी या रस्त्याचे काम ठप्प होते.
अखेर केंद्रीय दळणवळण विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांनी पत्र काढून या रस्त्याच्या जमीन संपादनासाठी २८ कोटी ८९ लाख ८१ हजार १३१ रुपये मंजूर केले आहेत. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे जमीन संपादनाचा मार्ग मोकळा झाला असून, रस्त्याच्या पुढील कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग
बाह्य वळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ६९ कोटी रुपये मंजूर केले होते. खा. बंडू जाधव यांच्या पाठपुराव्याने १३५ शेतकऱ्यांच्या पेमेंट स्लिप महामार्ग विभागाने मुंबई येथील आर. ओ. कार्यालयाकडे सादर केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निधी वितरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, केंद्रीय रस्ते विभागाच्या नव्या आदेशामुळे विलंब लागत होता. आता पहिल्या टप्प्यातील २९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने रस्ते निर्मितीतील मुख्य अडसर दूर झाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मावेजा उपलब्ध होईल.
प्रवीण देशमुख, परभणी.