२७ हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:52+5:302021-02-05T06:03:52+5:30
परभणी : राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असली तरी वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली ...

२७ हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आदेशाची प्रतीक्षा
परभणी : राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असली तरी वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली नसल्याने या महाविद्यालयांमधील जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांना शासन निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.
कोरोनानंतर राज्यात हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत शासनाने प्रारंभी दहावी व बारावी त्यानंतर नववी व अकरावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्ह्यासह राज्यभरात पाचवी ते आठवीच्या वर्गांना प्रारंभ झाला आहे. १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांनाही पूर्ण क्षमतेने परवानगी देण्यात आली असली तरी महाविद्यालये मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. जिल्ह्यात अनुदानीत २२, तर विनाअनुदानीत ४२ असे एकूण ६४ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्येे २७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अगोदरच शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अशात ऑनलाइन शिक्षणास अनेक विद्यार्थी गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अशातच विद्यापीठाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे.
शैक्षणिक नुकसानीत भर
विद्यार्थ्यांचा प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अशात द्वितीय सत्राचाही अभ्यासक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयांनी सुरू केला आहे. ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे त्यांना हे ऑनलाइन शिक्षण नुकसानकारक वाटत आहे. अशातच परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने अभ्यास कसा करावा? आणि परीक्षेचा पेपर कसा द्यावा, यासंदर्भात विद्यार्थी सापडले आहेत.
महाविद्यालये सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ऑनलाइन वर्गासाठी विद्यार्थी थांबत नाहीत. अशातच परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला का, याची शहानिशा केली पाहिजे.
- बाळासाहेब जाधव, प्राचार्य
शासनाने वरिष्ठ महाविद्यालये तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व इतर उपक्रम राहिले आहेत. ते आत्मसात करण्यासाठी त्यांना वेळ मिळेल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- प्रा. संतोष रणखांब,सचिव, स्वामुक्टा संघटना
कोरोनामुळे ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. अनलॉक प्रक्रियेनंतर पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. पदवी व पदव्युत्तरचे विद्यार्थी सुज्ञ असतानाही महाविद्यालये सुरू केले जात नाहीत. त्यामुळे नुकसान होत आहे.
- गोविंद मानखेडे, विद्यार्थी, सेलू
ऑनलाइन वर्गाच्या वेळी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे त्रस्त झालो आहोत. शासन महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. ही भूमिका चुकीची आहे.
- योगेश गायके,विद्यार्थी, सेलू