कोरोना उपाययोजनासाठी २५ कोटी ५४ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:35+5:302021-04-18T04:16:35+5:30
परभणी जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ...

कोरोना उपाययोजनासाठी २५ कोटी ५४ लाखांचा निधी
परभणी जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या समितीने छाननी केली. त्यानंतर निधी मागणीचा जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याला २५ कोटी ५४ लाख १३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कोविड रुग्णांसाठी साहित्य खरेदी करायचे आहे. यासाठी आवश्यक तेथे प्रशासकीय, तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने नवीन पुरवठादार उपलब्ध होत असल्याने बाजार भाव कमी होत आहेत. त्यामुळे एकाच वेळी मोठी खरेदी करण्यात येऊ नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
हे साहित्य खरेदी करण्यात येणार
उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून व्हेंटिलेटर, एअर प्युरीफायर्स, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी, रुग्णांसाठी आवश्यक उपचाराची साधने, कोविड औषधी, लॅब कीट, रॅपिड अँटिजेन, आरटीपीसीआर कीट, रेमडेसिविर इंजेक्शन, आदी साहित्य खरेदी करता येणार आहे. हे साहित्य खरेदी करताना हाफकीन संस्थेने निश्चित केलेल्या दरानुसारच खरेदी करावी, असेही या आदेशात नमूद केले आहे.
दोन महिन्यांत मिळाले ५१ कोटी रुपये
राज्य शासनाने जिल्ह्याला यापूर्वी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी विशेष आदेश काढून २५ कोटी ५४ लाख १३ हजार रुपयांचा निधी दिली होता. त्यानंतर आता १६ एप्रिल रोजी आणखी एक नवा आदेश काढून २५ कोटी ५४ लाख १३ हजार रुपयांचा निधी दिली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत कोरोना उपाययोजनांसाठी जिल्ह्याला ५१ कोटी ८ लाख २६ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यावरून राज्य शासन कोरोना उपाययोजनांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.