जिल्ह्यात १८ रुग्णांचा मृत्यू; १२११ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST2021-04-21T04:17:50+5:302021-04-21T04:17:50+5:30
परभणी : जिल्ह्यातील १८ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला असून, दिवसभरात एक हजार २११ नव्या रुग्णांची भर ...

जिल्ह्यात १८ रुग्णांचा मृत्यू; १२११ नवे रुग्ण
परभणी : जिल्ह्यातील १८ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला असून, दिवसभरात एक हजार २११ नव्या रुग्णांची भर पडली आहे. वाढलेला संसर्ग आणि रुग्णांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूही वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढविणारा ठरत आहे. २० एप्रिल रोजी दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात ३, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ९ अशा १२ रुग्णांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला असून, इतर ६ रुग्णांचा मृत्यू खासगी रुग्णालयांमध्ये झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ६ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला ३ हजार ९६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या २ हजार ३१४ अहवालांमध्ये ९१५ आणि रॅपिड टेस्टच्या ७८२ अहवालांमध्ये २९६ असे १ हजार २१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारची रुग्णसंख्या आतापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. जिल्ह्यात एकूण २७ हजार २९८ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी २० हजार ७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. ६८९ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ५ हजार ९०५ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय रुग्णालयात १८०, जिल्हा परिषदेच्या इमारतीत २७०, रेणुका मंगल कार्यालयाच्या रुग्णालयात ९० आणि अक्षदा मंगल कार्यालयाच्या केंद्रात १५४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार ४४० रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, तर उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
८४२ रुग्णांना सुटी
मागील चार दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. २० एप्रिल रोजी ८४२ रुग्णांना प्रशासनाने सुटी दिली. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बाधितांसाठी २९४ खाटा शिल्लक
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत २९४ खाटा शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्हा रुग्णालयात २, आयटीआय हॉस्पिटलमध्ये २०, जिल्हा परिषदेचा इमारतीत ३०, अक्षदा मंगल कार्यालयात २७, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये १६३ आणि उर्वरित खाटा खासगी रुग्णालयात रिक्त आहेत.