परभणीत १६ वर्षांची परंपरा : बी़ रघुनाथांच्या आठवणीत सांस्कृतिक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:31 IST2018-09-19T00:28:47+5:302018-09-19T00:31:26+5:30
एखाद्या साहित्यिकाच्या स्मृतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळते़ त्यापैकीच परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक बी़ रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चार दिवसीय सोहळा मागील १६ वर्षांपासून साजरा होतो़

परभणीत १६ वर्षांची परंपरा : बी़ रघुनाथांच्या आठवणीत सांस्कृतिक सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एखाद्या साहित्यिकाच्या स्मृतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळते़ त्यापैकीच परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक बी़ रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चार दिवसीय सोहळा मागील १६ वर्षांपासून साजरा होतो़
आपल्या लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्राला मराठवाड्याच्या प्रतिभेची वेगळी ओळख करून देणारा संवेदनशील कवी म्हणून बी़ रघुनाथांची ख्याती आहे़ परभणीत मागील सोळा वर्षांपासून गणेश वाचनालय व जनशक्ती वाचक चळवळीच्या वतीने चार दिवसीय महोत्सव साजरा होतो़ यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावतात़ परभणीकरांसाठी ही एक सांस्कृतिक मेजवानीच असते़ ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मृतीचे असे सोहळे साजरे होणे म्हणजे नवीन पिढीतील साहित्यिकांसाठी मार्गदर्शक वाटू ठरू शकते़ परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरात गणेश वाचनालयात नुकताच बी़ रघुनाथ महोत्सव साजरा झाला़ ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या महोत्सवात ‘गीतगोपाळ’ हा ग.दि. माडगूळकरांच्या गीतांना सी़ रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम सादर झाला़ यात विश्वनाथ दाशरचे व संचाने गीतसंगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला़ लक्ष्मीकांत धोंड यांनी निवेदन केले़ दुसऱ्या दिवशी पक्षीतज्ज्ञ डॉ़ प्रेमेंद्र बोथरा व श्रीकृष्ण उमरीकर यांनी पक्ष्यांचे सहजीवन सचित्र समजावून सांगितले़ तिसºया दिवशी ‘फेसाटी’ या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीवर चर्चा करण्यात आली़ लेखक नवनाथ गोरे व प्रा़ डॉ़ पी़ विठ्ठल यांनी सहभाग नोंदवला़ तर चौथ्या दिवशी चित्रपट अभिनेत्री मीना कुमारी यांच्या स्मृतींना गीत, संगीत व ओघवत्या निवेदन शैलीतून उजाळा दिला़ डॉ़ वृषाली किन्हाळकर यांनी यामध्ये आॅडीओ व व्हिडीओ फितीचा वापर सुरेख पद्धतीने केला़