१ हजार ५० कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:30+5:302021-02-05T06:04:30+5:30
गंगाखेड : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १ हजार ५० शिक्षकांची नियुक्ती केली होती. या शिक्षकांना निवडणूक कामाचा भत्ता देणे अनिवार्य ...

१ हजार ५० कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित
गंगाखेड : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १ हजार ५० शिक्षकांची नियुक्ती केली होती. या शिक्षकांना निवडणूक कामाचा भत्ता देणे अनिवार्य आहे. मात्र, आतापर्यंत या शिक्षकांना निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने तालुक्यातील १ हजार ५० शिक्षक निवडणूक भत्त्यापासून वंचित आहेत.
गंगाखेड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींसाठी १८४ प्रभाग होते. त्यासाठी १९० मतदान केंद्रांची संख्या होती. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष १, मतदान अधिकारी ३ असे एकूण एका केंद्रावर ४ कर्मचारी होते. एकूण १९० केंद्रांवर ९५० शिक्षक आणि १०० राखीव अशा एकूण १ हजार ५० शिक्षकांची नियुक्ती केली होती. केंद्राध्यक्षांना दीड हजार रुपये आणि मतदान अधिकारी यांना १३०० रुपये असे मानधन देण्यात येते. विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ताही मिळाला होता. ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत तालुक्यातील १ हजार ५० कर्मचाऱ्यांना लवकरच निवडणूक भत्ता मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक होऊन पंधरा दिवस झाले आहेत. मात्र, या भत्त्याविषयी निवडणूक विभागाकडून कोणतेही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षकांना निवडणूक भत्त्यापासून वंचित ठेवले जात आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्त कर्मचाऱ्यांना मानधन दिलेले नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे.
गोपाळ मंत्री, शिक्षक