छत्तीसगडच्या 12 आदिवासी जिल्ह्यांतले ‘तिचे’ 15 दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 07:55 IST2020-03-12T07:54:00+5:302020-03-12T07:55:03+5:30
बलात्काराच्या घटनांनी नुस्तं बसल्याजागी अस्वस्थ होणं, सोशल मीडियात व्यक्त होणं यापेक्षा स्वतर् काहीतरी करायला हवं असं म्हणून बस्तरच्या आदिवासी भागात काम करणारी तरुण डॉक्टर स्वत: 12 आदिवासी जिल्ह्यांत फिरली, तरुण मुलामुलींशी बोलली तेव्हा तिच्या हाती जे लागलं त्याची ही गोष्ट.

छत्तीसगडच्या 12 आदिवासी जिल्ह्यांतले ‘तिचे’ 15 दिवस
डॉ. ऐश्वर्या रेवडकर,
हैदराबादमध्ये डॉक्टर मुलीसोबत पाशवी अत्याचाराची घटना घडली . संपूर्ण देश या नीच कृत्याने हादरला. स्रियांवरच्या या वाढत्या पाशवी अत्याचारांबद्दल चर्चा चालू असतानाच, तेलंगणा पोलिसांनी आरोपींचे एनकाउण्टर केलं. चर्चेचा रोख वेगळ्या दिशेने वळला. या सर्व घटनांनी मी खचून गेले होते. माझ्या बस्तरच्या आदिवासी मुलींच्या सुरक्षेसाठी मी काय करू शकते याचा विचार डोक्यात अथक घोळत होता. मी खूपवेळा एकटी दूरचा प्रवास करते, वेळी -अवेळी अनोळखी ठिकाणी पोहोचते, सुरक्षेची चिंता कायम डोक्यात असतेच. मी छत्तीसगडला जाताना नेहमी हैदराबादमार्गे जाते. त्यामुळे डॉक्टर मुलीच्या केसशी मी जास्त समरस झाले, उद्या माझ्यासोबत असं काही झालं तर माझ्यासाठी कोण उभं राहणार? या विचारांनी झोप उडाली आणि त्यातून ‘सफर’ या कॅम्पेनचा किडा डोक्यात वळवळला. अशी घटना घडल्यानंतर नेहमी असं होतं की मुलींनाच सल्ले दिले जातात की रात्री उशिरा बाहेर जायचं नाही, एकटं अनोळखी ठिकाणी जायचं नाही, कपडे कसे घालायचे, कसे वागायचे अशी अनेक बंधने. या सर्व विरोधात मला सिम्बॉलिकली व्यक्त व्हायचं होतं. त्यासाठी मी ठरवलं की एक प्रवास निवडायचा. जो मी एकटीनं करेन, दररोज नवीन ठिकाणी जाईन, अनोळखी लोकांशी बोलता येईल.
म्हणून मग छत्तीसगडमधील 12 जिल्हे निवडले, माझ्या कारनं एकटीनं प्रवास करायचा ठरवला. तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यापासून सुरु वात करून, राजधानी रायपूर्पयत प्रवास संपवायचा असे ठरवले.
परंतु ही कॅम्पेन करावी की नाही याबद्दल डोक्यात अनेक शंका होत्या. याचा किती फायदा होईल, लोक काय म्हणतील, घरी कसं सांगायचं, असे प्रश्न होते. मोजक्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा केली आणि त्यांनी, तुला वाटतं आहे तर कर, असं म्हणून माझे मनोधैर्य वाढवले. बिजापूर-दंतेवाडा-बस्तर-कोंडागाव - नारायणपूर - कांकेर-बालोद-भिलाई-बेमेतरा- मुन्गेली- बिलासपूर- रायपूर. अंतर तपासले. त्या त्या भागातील संस्थांमार्फत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होईल असं डोक्यात होतं. मला फक्त प्रवासाचा खर्च करायचा होता. मार्ग ठरला, तसा 26 डिसेंबरपासून 10 जानेवारीपर्यंतचा 12 दिवसांचा कालावधीही ठरवला. कोणते उपक्र म घ्यायचे यावर मी विचार करत होते.
मोठय़ा माणसांना काही सांगणे अवघड असते, त्यापेक्षा लहान मुले जास्त विचार करतात आणि स्वतर्च्या कृतीमध्ये बदल घडवून आणतात. म्हणून मग मी जास्त लक्ष मुलांवर केंद्रित करायचे ठरवले. बार्शीमध्ये माझी स्रीरोगतज्ज्ञ मैत्रीण डॉ. गौरी गायकवाड ही शाळांमध्ये गूड टच, बॅड टचबद्दल प्रबोधन करते. तिच्याशी याबद्दल चर्चा केली. प्रवासाची तयारी झाली तशी मी बार्शीवरून हैदराबादमार्गे छत्तीसगडमधील बिजापूरला पोहोचले. शाळा, महविद्यालये आणि गावातील काम करणार्या महिला अशा विविध गटांसोबत सेशन्स घ्यायचे हे नक्की झाले होते; परंतु नक्की काय बोलायचे याबद्दल ठरलं नव्हतं. त्यातून अनेक लोकांनी सल्ला दिला की मुलींपेक्षा मुलांशी बोलणं हे जास्त गरजेचं आहे. ते मला स्वतर्लाही समजत होते; परंतु याआधी कधी मुलांसोबत या विषयावर बोलायचा बिल्कुलच अनुभव नव्हता. माझ्यासाठी हे खूप मोठे चालेंज होते. बिजापूरपासून माझी छत्तीसगड कामाला सुरु वात झाली होती, दोन वर्षे मी येथील जिल्हा रु ग्णालयात स्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. त्यामुळे बिजापूर हे माझे घरच बनले आहे. पहिल्या दिवशी येथील महिलांसोबत कुटरू या खेडय़ात सेशन घेतलं आणि त्यातून त्यांनी अनेक अत्याचाराच्या घटनांबद्दल सांगितलं. सेशनच्या शेवटी यापुढे आम्ही याविरोधात नक्कीच आवाज उठवू, असं ठरवलं. संध्याकाळी बिजापूर येथील ‘टुमारोज फाउण्डेशन’च्या वसतिगृहात पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांशी बोलले. गूड टच, बॅड टच, छेडछाड, बलात्कार या विषयापर्यंत रंगले. मुलांनीही मोकळेपणाने प्रश्न विचारले, तेव्हा कुठे माझे मुलांसमोर हा विषय कसा बोलायचा याचं टेन्शन गेलं. एका मुलाने पतीने पत्नीची कन्सेण्ट घ्यावी का, हा प्रश्न विचारला आणि मला माझे सेशन यशस्वी झाल्याचा आनंद झाला. पहिल्या दिवसाच्या सेशन्सनी मग मला अंदाज आला कीकोणत्या वयोगटाच्या मुलांमुलींसमोर कशा पद्धतीने हा विषय मांडायला हवा, महिलांच्या गटासमोर काय बोलायला हवं, झोपताना डायरीमध्ये मी नोंद करून ठेवली. पुढचे उपक्र म दंतेवाडय़ामध्ये होते. दंतेवाडा हे माझे छत्तीसगडमधील दुसरे घर आहे. प्रणीत सिम्हाने सुरू केलेली ‘बचपन बनाओ’ ही शैक्षणिक सामाजिक संस्था आणि आकाश बडवे या मित्राने सेंद्रिय शेतीसंदर्भात सुरू केलेली शेतकर्यांची ‘भूमगादी’ ही संघटना, या दोन्हींमध्ये काम करणारी तरु णाई हे माझे कुटुंब आहे. बचपन बनाओसोबत काम करणारा ‘कारण सिंग’ हा माझा मित्र माझ्यासोबत सेशन्स घ्यायला जॉइन झाला. दंतेवाडा सोडून पुढे बस्तरला प्रवासासाठी निघणं माझ्या अगदी जिवावर आलं होतं. नवीन ठिकाणी जाण्याची, सेशन्स घेण्याची, सर्वच गोष्टींची अनाकलनीय भीती मनात निर्माण झाली होती; परंतु एकदा पुढे प्रवास सुरू केला आणि नवीन नवीन भेटत गेलेल्या लोकांच्या मदतीने अनेक शाळा, महाविद्यालयांत, महिलांच्या विविध गटांशी मी भेटू शकले, सेशन्स घेऊ शकले. जगदलपूरला जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, शासनासोबत काम करणारा निखिलेश हरी यांनी ‘प्रयास’ या वसतिगृहात आदिवासी मुले आणि मुलांसाठी सेशन्स आखायला मदत केली. महिलांच्या बचतगटाच्या समूहासोबत चर्चा झाली, त्यातून अनेक घटना समोर आल्या.
पुढे कोंडागावला ‘साथी’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक भूपेश बघेल यांना भेटले. मी एकटीच आहे हे पाहून त्यांनी माझी राहण्याची-जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरीच केली. त्यांच्या मदतीने कोंडागाव आणि नारायणपूर या दोन्ही जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांत सेशन्स झाले. वाटेत एका खेडय़ात बचतगटांची मीटिंग चालू होती, तिथेच मग मी चर्चेसाठी जॉइन झाले. खेडय़ातील वयस्कर महिलासुद्धा चर्चेमध्ये भाग घेत होत्या, प्रश्न विचारत होत्या. त्यांची तक्र ार होती की मुले-मुली आमचं ऐकत नाहीत. साथी संस्थेसोबत काम करणारा मित्र आदर्श सिंग, रात्री जेवणासाठी एका कार्यकर्तीच्या घरी घेऊन गेला, तिचा वाढदिवस असल्याने केक कापला, चिकनवर ताव मारला. पूर्ण खेडे अंधारात डुबून गेले होते आणि वरचे तारे लख्ख चकाकत होते. नारायणपूरपासून पुढे कांकेरला पोहोचले. दिशा या सामाजिक संस्थेचे केशव सोरी, प्रसिद्ध चित्रकार, कलाकार अजय मंडावी, शासनासोबत काम करणारे फेलो अंकित आणि नेहा या सर्वांनी मिळून माझे सेशन्स ठेवले होते. त्यातील एक पीडित स्त्रियांसाठीही होते. लहानपणापासून वडिलांनी केलेल्या बलात्काराला बळी पडलेली, घर सोडून पळून आलेली आणि मानसिक आजाराने ग्रस्त एक मुलगी पाहून माझे मन सुन्न झाले. त्या सर्व स्रियांशी वरकरणी हसून मी संवाद करत होते; परंतु आतून मात्र मी उन्मळून पडले होते. माध्यमिक शाळेमधील सेशनमध्ये शिक्षिकांनीही समरसून भाग घेतला. संध्याकाळी महाविद्यालयीन मुलामुलींचे एकत्र सेशन घेतले, मुलींपेक्षा मुलेच जास्त लाजत होती. रात्री थंडीमध्ये आमच्या शेकोटीभोवती बसून महुआचा आस्वाद घेत गप्पा रंगल्या.
पुढे बालोद जिल्ह्यात दल्ली राजा येथे शहीद हॉस्पिटलमध्ये मैत्रीण डॉ. प्रेरणा हिने रु ग्णालयातील नर्सेससाठी आणि नंतर एका खेडय़ात किशोरवयीन मुलींसाठी सेशन्स ठेवले होते. रात्नी शहीदमध्ये काम करणार्या महाराष्ट्रीयन डॉक्टर ग्रुपसोबत गप्पागोष्टी आणि उनोचा डाव रंगला. पुढे भिलाई येथे बचपन बनाओ सोबत काम करणारा मित्र चंद्रेश याने एका महाविद्यालयात सेशनसाठी परवानगी घेतली. आधी प्रिन्सिपल थोडय़ा साशंक होत्या; परंतु त्यांनी परवानगी दिली. सुरु वातीला कोणी मुली येत नव्हत्या. हळूहळू सेशन तब्बल अडीच तास रंगले. सेशन संपताना एका मुलीने सर्वांसमोर येऊन धाडसाने तिच्या सोबत घडलेला लहानपणीचा लैंगिक शोषणाचा प्रसंग सांगितला आणि तिची हिंमत पाहून मुलं सर्द झाले. फक्त लैंगिक शोषणापर्यंत न थांबता, पदवी शिकणार्या त्या मुलीनी लैंगिक आनंद, हस्तमैथुन या सर्व गोष्टींबद्दलही चर्चा केली आणि तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय बनला.
असा हा प्रवास बरंच काही शिकवत होता. त्यातून माझ्या हाती काय लागलं याविषयी पुढच्या अंकात.
( बस्तरमध्ये काम करणार्या स्रीरोगतज्ज्ञ)