पुरुषोत्तम करतोय यार.
By Admin | Updated: September 25, 2014 17:44 IST2014-09-25T17:44:20+5:302014-09-25T17:44:59+5:30
पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष, त्यानिमित्त एक खास मैफल.

पुरुषोत्तम करतोय यार.
>हे असं ‘पुरुषोत्तम’ करत, नाटकवेडं होणं आणि जिंकण्यासाठी ‘भानावर’ राहून काम करणं असतं काय?
दिवसभर कॉलेज. मग संध्याकाळी ६ वाजता ठरलेल्या कट्टय़ावर प्रॅक्टिसला भेटायचं.
रात्रभर मग नुस्ता किचाट. तो तालमी आधीच सुरू होतो.
आधी कलाकारांच्या ऑडिशन, मग कथेचं वाचन, त्यातले बारकावे.
त्यात दहाजणांची शंभर मतं, त्यातले वाद.
असं करत करत, एकेक गोष्ट फायनल होत जाते.
आणि मग प्रत्यक्ष तालमी सुरू होतात.
‘पुरुषोत्तम करतोय यार.’
हे तीन शब्दच पुरेशी किक देतात.
आणि मग रात्रीचा शब्दश: दिवस होतो.
पहाटेपर्यंत तालीम.
मग पहाटे जाऊन काहीतरी खाऊन यायचं, टक्कं उजेडेपर्यंत तालीम सुरूच.
मग घरी सुसाट पळायचं. जाऊन थेट झोपायचंच. उठलं की कॉलेज.
नाहीतर पुन्हा बाराच्या ठोक्याला तालीम सुरू.
हे असं साधारण ‘पुरुषोत्तम’ या एका ‘करंडका’साठी आजवर पुण्यातल्या किती कॉलेज पिढय़ांनी केलं असेल.?
पुरुषोत्तमचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं.
म्हणजे गेली पन्नास वर्षे नाटकवेडी तरुण मुलं ‘पुरुषोत्तम करायचंच’ म्हणून पुरती भारली जातात.
आणि नाटक म्हणजे काय फक्त लेखन, दिग्दर्शन, अभिनय नव्हे.
‘पुरुषोत्तमला बॅकस्टेज करतोय’
हे अभिमानानं सांगावं इतकं पुरुषोत्तमचं ‘बॅकस्टेज’ही भरभरून देतं.
पुरुषोत्तम करंडक नावाचं एक व्यासपीठ नुस्तं नाटक शिकवत नाही, तर ‘बेस्ट’ काय असू शकतं, कस लागतो आपला म्हणजे नक्की काय होतं.
आपण जिवाच्या आंकातानं सराव करतो, काम करतो, वाट्टेल तेवढी मेहनत घेतो म्हणजे नक्की काय करतो.
आणि जिवाला जीव देणारे आणि जीव जाईपर्यंत छळणारे मित्र भेटतात म्हणजे कसे भेटतात.
हे सारं गेली अनेक वर्ष तरुण मुलांनी या पुरुषोत्तम करंडकाच्या निमित्तानं अनुभवलं.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आज तिची ओळख चतुरस्त्र अभिनेत्री असली तरी एकेकाळी तीही याच ‘पुरुषोत्तम करंडकासाठी’ अशीच राबली होती.
आणि जिथे ‘नाटक’ केलं तिथंच ‘जड्ज’ (येस, पुरुषोत्तम करंडकासाठी मुख्य परीक्षक) म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली.
सोनाली म्हणते, ‘ यंदा काही परफॉर्मन्स तर इतके चांगले होते की, अनेकदा परीक्षक म्हणून मला माझ्या भावना कण्ट्रोल करत परीक्षकाची सभ्यता पाळावी लागली, नाहीतर अनेकदा तर असं वाटलं की स्टेजवर जाऊन या तरुण कलाकारांना गच्च मिठय़ा माराव्यात, इतकं या मुलांचं काम सुंदर होतं.’
- सोनालीनं अशी दाद द्यावी, असं नेमकं काय घडवलं या मुलांनी? पुरुषोत्तम करंडक जिंकलेल्या पहिल्या तीन एकांकिका ‘घडवणार्या’ तरुण लेखक -दिग्दर्शकांची या अंकात एक भेट.
आपल्याले जे करावंसं वाटतं, ते करताना नक्की काय असते त्यांची प्रोसेस? त्यासाठी नेमकं काय काय केलं त्यांनी.
याचसाठी ह्या गप्पा.
स्पर्धा विसरून ते सारे पुण्यात पर्वतीवर जमले होते, आणि मग जमली मस्त मैफल.
तीच ही मैफल आतल्या पानात.
परीक्षक म्हणून ‘दिसलेल्या’ तरुण लेखक-दिग्दर्शक आणि कलाकारांविषयी काय वाटतं, हे दिलखुलास सांगतेय. सोनाली कुलकर्णी आणि पुरुषोत्तम ‘जिंकलेल्या’ दोस्तांशी मस्त गप्पा