कोण असतात ह्या?

By Admin | Published: January 11, 2017 03:07 PM2017-01-11T15:07:53+5:302017-01-11T15:07:53+5:30

मुलग्यांपेक्षाही थोड्या बोल्ड. काहीशा आक्रमक. आपल्या तालावर गोष्टी नाचू शकतात हे जाणणाऱ्या आणि संधी मिळालीच तर मुलग्यांना नाचवणाऱ्याही.. रोजच्या नियमांनी बांधलेल्या आयुष्यात एक फट किलकिली करून रोमॅण्टिक आयुष्य जगून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या.. आणि त्यातल्या थ्रिलची नशा चढलेल्या!

Who are they? | कोण असतात ह्या?

कोण असतात ह्या?

googlenewsNext

मुली?
मुलींच्या जगात कशाला काही असेल मुलांसारखं? हॉट? 
- असा प्रश्न पडलाच असेल, तर मुलींमध्येही हॉट व्हिडीओ, न्यूड गाणी, पांचट जोक्स आणि प्रसंगी पोर्न पाहणं हे बऱ्यापैकी आम असतं. आहे.
आणि मुलांपेक्षा त्यांची प्रतिमा ‘सोबर’ असल्यानं त्यांचे मोबाइल तपासले जात नाहीत की कुणी त्यांच्या चॅट वाचत बसत नाहीत.
मात्र काही संदर्भात मुली मुलांच्या एखादं पाऊल पुढे आहेत असं एक वास्तव ‘आॅक्सिजन’च्या पत्रातून आमच्या हाती लागतं.
मुलांमध्ये शहरी, ग्रामीण असा भेद दिसत नसला, तरी मुलींमध्ये तो काही प्रमाणात आहे. ग्रामीण भागात मुलींवर अजूनही घरातल्या माणसांचे पहारे असतात. बंधन आहेतच. पण म्हणून मग एक वेणी, खाली मान अशा वाटेनं साऱ्याच जणी जात नाहीत.
काहींना थ्रिल हवं असतं, एक्साइटमेण्ट हवी असते. आणि काहींना ट्राय आउट करून पाहायचं असतं.
एका मुलीनं ‘कन्फेशन’ म्हणून पाठवलेल्या पत्रात ती लिहिते, ‘तो स्वत: मला प्रपोज करेल असं मी वागले. त्यानं प्रपोज केल्यावर थोडे आढेवेढे घेऊन हो म्हणाले. मग बाइकवर फिरणं, चोरून काहीबाही करून पाहणं यात मला मजा येत होती. आपल्याही आयुष्यात असं सारं रोमॅण्टिक घडावं असं मला वाटत होतं. ते मी घडवून आणलं. मला माहिती होतं, वडील सांगतील तिथंच लग्न करावं लागेल. मी ते केलंही. तो त्याच्या वाटेनं निघून गेला. माझी कहाणी इथंच संपली. पण त्याच्याकडे काही फोटो राहिलेत माझे, त्यांची कधीमधी धास्ती वाटते.. त्यानं मला ब्लॅकमेल केलं तर..’
ब्लॅकमेल केलं जाण्याच्या भीतीखाली जगणाऱ्या अनेकजणी मेल्स आणि पत्रांतून भेटतात. काही पोलीस कम्प्लेण्ट करतातही. मात्र गावभर होणाऱ्या चर्चेनं, बदनामीनं मोडूनही पडतात. 
दुसरीकडे ‘प्रेमात पडून पाहणाऱ्या’ अनेकजणी. मुलांपेक्षा थोड्या बोल्ड. काहीशा आक्रमक. आणि आपल्या तालावर गोष्टी नाचू शकतात हे जाणणाऱ्या आणि त्या घडवणाऱ्याही..
रोजच्या नियमांनी बांधलेल्या आयुष्यात एक फट किलकिली करून त्या हे रोमॅण्टिक आयुष्य जगून घ्यायचा प्रयत्न करतात.
स्पर्शाची सहजता स्वीकारतात. मुलामुलींमध्ये वावरण्याचा मोकळेपणा मान्य करतात. सहज स्वीकारतात. आणि प्रसंगी आम्ही फक्त मित्र आहोत असंही म्हणतात..
ग्रामीण भागापेक्षा शहरी मुलींची अवस्था थोडी बरी आहे. त्यांच्या आयुष्यात ‘मोकळीक’ आहे. निर्णयस्वातंत्र्यही आहे. आणि घरानं मुलगा-मुलगी मित्र असतात, त्यांचे ग्रुप्स असतात हे मान्य केलं आहे. पण तेच ग्रुप आता व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊ लागले आहेत..
काही मुली ‘बोल्ड’ आहेत हे ओळखून त्यांना त्या ग्रुपमध्ये एण्ट्री दिली जाते. ग्रुपवर प्रत्येकाची/प्रत्येकीची नावं बदलली जातात. आणि मुलींना झेपेल इतपत ‘चावट’ चॅट या ग्रुपवरही सुरू होतात.
एरवी हे मुलंमुली चांगले मित्र असतात, प्रत्यक्षात भेटत असतात. प्रेमाबिमात पडलेले नसतात परस्परांच्या. मात्र या ग्रुपमध्ये राहण्याची आणि त्याहून हॅपनिंग ग्रुपमध्ये शिरण्याची चढाओढ मुलींमध्येही लागलेली दिसते.
पण या ग्रुपच्या पलीकडे या मुलींच्या जगात काय घडतं?

नुस्तं पाहून काय उपयोग?

तरुण मुलग्यांना अनेक गोष्टी पाहूनच एक्साइटमेण्ट वाटते. त्यापुढचं पाऊल म्हणजे चर्चा आणि चावट गप्पा.
मुलींना मात्र स्वभावत: असं नुस्तं पाहून काही फार एक्साइटमेण्ट वाटत नाही. त्यांना प्रत्यक्ष कृती असं काही हवं असतं.
मग अनेक मुली व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स आणि चॅटवर तासन्तास गप्पा मारत राहतात. गप्पांचा विषय एकच- ‘सेक्स’, दिसणंबिसणं, स्वत:चं आणि इतरांचंही.
आणि त्यापुढे जाऊन रोमान्स अनुभवणं. त्यात हे सारं करायला सोबतचे मित्र भरीस घालतात. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. सिनेमात दाखवतात ते ‘बेफिक्रं’ जग अनेकजणी जगू पाहतात, निदान त्या मोहात पडतात.
काहीजणी फसतात त्या याच टप्प्यावर.
अनेकदा आधी स्वेच्छेनं ज्या गोष्टी केल्या जातात त्या एका टप्प्यानंतर नकोशा होतात. किंवा आपण अडकत चाललो आहोत किंवा अडकवले जात आहोत हे लक्षात येतं.
आणि मग प्रसंगी या प्रकरणी पोलिसांची मदत घ्यावी लागते. आणि घरच्यांनाही सांगावंच लागतं जे घडतं ते. उत्सुकता, अज्ञान आणि शरीरसंबंध ते कामजीवन यासंदर्भातल्या शास्त्रीय माहितीचा अभाव यातून काही मुलीही ‘एक्सपिरीमेण्ट’ करून पाहतात.
दुर्दैवानं काहीजणींना त्याची बरीच मोठी किंमत मोजावी लागते. आणि काहीजणी मात्र ब्लॅकमेलिंगला बळी पडतात. सतत दबावाखाली जगतात.
एक मोठं आकर्षण
मुलींच्या संदर्भात सध्या एक मोठं आकर्षण म्हणजे सोशल मीडियात म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर होणाऱ्या अनोळखी लोकांशी ओळखी.. दोस्ती.
एरवी आपल्या आवडीनिवडी समान असणारे किंवा भन्नाट जगणारे फार कमी लोक आपल्या प्रत्यक्ष वर्तुळात भेटत. पण आता ते जग कित्येकपट या सोशल मीडियानं विस्तारलं.
आणि त्यातून अनेकींच्या प्रत्यक्ष न भेटताही ओळखी होऊ लागल्या. गप्पा रंगू लागल्या.
शेअरिंग वाढलं. जे घरात कुणाशीही बोललं जात नाही ते तिथं बोललं जातं.
आणि मग अनोळखी, अजनबी चेहऱ्याच्या त्या व्यक्तिमत्त्वाचा आधार वाटू लागतो. असा आधारही अनेकजणींना फार महत्त्वाचा वाटतो.
काहींची फसगत होते तीही याच टप्प्यावर.
मुलींच्या जगात मोठी खळबळ निर्माण करणारे आणि त्यांच्याही नकळत त्यांना उत्सुकतेच्या तोंडाशी उभे करणारे हे दिवस आहेत.

- आॅक्सिजन टीम

Web Title: Who are they?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.