नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी कुठे काय खातात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 08:00 IST2020-12-31T07:55:26+5:302020-12-31T08:00:25+5:30
नववर्ष स्वागताचे पदार्थही गुडलक म्हणून खाण्याच्या किंवा त्यातून काही प्रतीकं घडवण्याच्या रीती अनेक देशात दिसतात.

नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी कुठे काय खातात ?
- माधुरी पेठकर
थर्टी फस्ट यंदा घरच्या घरी साजरा करायचा तर काय मेन्यू करायचा हा पहिला प्रश्न. बटाटेवडे, पावभाजी, मिसळ, भजी हे तसे नेहमीचे पदार्थ. पण बऱ्याच देशात विविध पदार्थ करायची सेलिब्रेशनची एक खास रीत दिसते. गुडलक आणि नवीन वर्षाचा शुभशकून त्यावरही ठरतो म्हणतात.. त्यातली ही खाद्यसफर..
स्पेन
मध्यरात्री बाराच्या ठोक्याला बारा द्राक्षं
स्पेनमधे नवीन वर्ष साजरं करताना रात्री बाराचे ठोके वाजायला लागले की प्रत्येक ठोक्यागणिक एक एक द्राक्ष खाण्याची रीत आहे. ही गोष्ट सोपी नाही. त्या त्या ठोक्याला द्राक्ष खाल्ला जाणं आवश्यक आहे आणि हे जमणं तसं महाकठीण काम. मधेच द्राक्ष घशात अडकण्याची भीती असते. घड्याळ्याच्या ठोक्यासोबत द्राक्षं खाण्याची गती सांभाळावी लागते. ती सांभाळली गेली नाही आणि बारा ठोक्यांना बारा द्राक्षं खाल्ली नाही तर ते भविष्यासाठी वाईट सूचक ठरतं असं काही जण मानतात तर द्राक्ष गोड लागले तर ते चांगल्या भविष्याचे सूचन करतात आणि द्राक्षं आंबट निघाले तर ते चांगल्यापेक्षा थोडं कमी चांगल्या भविष्याचे सूचन करतात.
अल साल्वादोर
रॉ एग
अल साल्वादोरमधे नवीन वर्षाच्या सुरुवातीला रॉ एग अर्थात कच्च्या अंड्याला फार महत्त्व असतं. पण हे कच्चं अंडं खाल्लं जात नाही. ३१ डिसेंबरला मध्यरात्री एका ग्लासात अंडे फोडले जातात. रात्रभर ते फोडलेले अंडे तसेच ठेवले जातात. दुस-या दिवशी ग्लासातले अंड्याचे पिवळे बलक कोणत्या आकाराचे दिसतात हे बघितलं जातं आणि ते ज्या आकारासारखे दिसत असेल ते आकार कसलं प्रतिनिधित्व करतात, यानुसार प्रत्येकाला येणारं वर्ष कसं असेल हे कळ्तं.
इटली
मसूर
छोट्या गोलाकार आकाराचे मसूर हे इटलीमधे समृध्दीचं प्रतीक मानले जातात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मसूर खाणं खूपच भाग्याची गोष्ट मानली जाते. या दिवशी मसूर हे मांसाहारी पदार्थांसोबत खाल्ले जातात.
तुर्की - डाळिंब-
तुर्कीमधे नवीन वर्षाच्या सुरुवातीला डाळिंबं हे कुस्करून त्याचा रस घराच्या प्रवेशद्वाराला लावला जातो. जितकी जास्त डाळिंबं कुस्करू तितकं येणारं भविष्य चांगलं असेल असं मानलं जातं. डाळिंबाचे दाणे हे येणा-या वर्षासाठी समृध्दी आणि सुपिकतेचे प्रतीक मानले जातात.
दक्षिण अमेरिका
चवळीचे दाणे, हिरव्या भाज्या कॉर्नब्रेड
दक्षिण अमेरिकेत चवळीचे दाणे हे पैशांचं प्रतिनिधित्व करतात. ही चवळी कोबीचाच प्रकार असलेल्या कोलार्ड किंवा मोहरीच्या पानांसोबत शिजवली जाते. कॉर्नब्रेड हे मक्याच्या पिवळ्याधमक दाण्यांमुळे समृध्दीचं प्रतीक मानलं जातं. येणारं वर्ष हे भरभराटीचं जाण्यासाठी या सर्व घटकांनी युक्त असा पदार्थ खाणं महत्त्वाचं मानलं जातं.
जर्मनी
शुगर पीग
जर्मनीमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे देखणं शुगर पीग बनवलं जातं. पण ते खाल्लं जात नाही. साखर, बदामाची पेस्ट याद्वारे छोटासा शुगर पीग बनवला जातो. साखरेपासून बनलेले हे छोटे छोटे शुगर पीग येणारं वर्षही असंच गोड असेल याची खात्री देतात.