बेधुंद करणारा ढोल-ताशाचा आवाज.
रंगांची उधळण करणारा घेरदार घागरा .
एकमेकांच्या हातात हात गुंफून धम्माल करत नाचणं आणि नाचताना एकमेकांच्या डोळ्यात दिसणारा आनंद भरभरून पहाणं.
बस्स. हेच काय ते खरं आयुष्य, असा फील देणारी असते गरब्याची रात्र .
अशा रात्रीची झिंग चढते, बेभान होऊन नाचताना सगळा ताण आपोआपच नाहीसा होतो..
जे नेहमी गरबा खेळायला जातात, त्यांना हे सारं वाचताना ते शब्दच नाही तर त्यातला प्रत्येक भाव पोहोचतो.
पण ज्यांना वाटतं की, गरबा/दांडिया म्हणजे नुस्ता धांगडधिंगा.
नुस्ता टाइमपास.
त्यांना कसं सांगणार की, गरबा खेळणं हे यासार्याच्या पलीकडे असतं.
गरबा खेळायला माझ्या आईचा नेहमीच विरोध असे.
कारण एकच, तिथल्या टारगट पोरांनी नंतर आपल्या लेकीला त्रास देऊ नये. रात्री-अपरात्री जातायेता काही विपरीत घडणार तर नाही ना याची तिला काळजी वाटायची. पण जसजशी नवरात्रीची आणि पयार्याने गरबा खेळण्याची चाहूल लागली की आमचे मित्रमैत्रिणींचे प्लॅन्स सुरू होत.
घागरा कोणता घालायचा, तो नेमका कुठे मिळेल, त्यावर सूट होईल अशी ऑक्सिडाईसची ज्वेलरी कुठून आणायची इथपासून ते यंदा कुठे जायचं, फ्री पासेस कोणाला मिळतायेत का, कुठे कोण सेलिब्रिटी येणार आहे इथपयर्ंत सगळी जमवाजमव करावी लागतेच. मग हळूहळू प्रत्येकजण आपापल्या घरी आपला गरबाचा ठरलेला प्लॅन संधी साधून ‘आउट’ करणार ! कुणाच्या घरी हसतहसत परवानगी मिळत असे तर कुणाच्या आईला पटवण्याची जबाबदारी ग्रुपमधल्या एखादीला घ्यावी लागत असे. हो ना करता करता आईबाबा राजी होत आणि वेळेवर घरी यावं लागेल, फार उशीर चालणार नाही अशी तंबी देत गरबा खेळायला जाण्याचा ग्रीन सिग्नल तिला मिळे.
किती वर्षे मी गरबा खेळले, काय बरं असावं या गरबामध्ये की, मी इतक्यांदा त्यासाठी घरच्यांशी वाद घातला? इतक्या खटपटी लटपटी केल्या?
जरा विचार केला की, लक्षात येतं मीच नाही माझ्यासारखे अनेकजण जे गरबा/दांडिया खेळायला जातात ते फक्त‘नाचत’ नाहीत, नट्टापट्टा करून मकडत नाहीत, त्यांच्यासाठी गरब्याची प्रत्येक रात्र एक वेगळा अनुभव असते.
मला आठवतं, नाशिकमध्ये आमच्या भागात रासदांडियाचं आयोजन दरवर्षी केलं जात असे. सदर भागातील रहिवाशांसाठी प्रवेश विनामूल्य त्यामुळे मोठय़ा संख्येने तरूण-तरुणी दांडिया खेळायला येत. आमच्या शेजारी रहाणारा दादा या दांडियामध्ये हमखास एक टिपरी घेऊन नाचायला येत असे. ही एकच टिपरी तो अशी काही लीलया फिरवी की त्याच्यासोबत खेळणार्याला धम्माल येत असे. पुढे काही वर्षांनंतर आम्ही मोठमोठय़ा नामांकीत ग्रुप्सनी आयोजित केलेल्या रासदांडियाला जाऊ लागलो. विनामूल्य प्रवेश असलेल्या दांडियांपेक्षा आम्हाला भरपूर पैसे मोजणारे आणि सेलिब्रिटीज बोलावणारे ग्रुप्स जास्त खुणावू लागले. अशा ठिकाणी खेळायला जाणं हा प्रेस्टिज इश्यूदेखील झाला. पण वास्तवाचं भान येता येता बिनपैशाच्या सुखाची किंमतही आपोआपच कळली. पैसे देऊन गर्दीतला एक चेहरा बनण्यापेक्षा आपल्या गल्लीतल्या दांडियात मिळणारं अटेन्शन, त्यामुळे होणारी आपली स्वतंत्र ओळख, आपल्याच मित्रमैत्रिणींबरोबर गरबा खेळण्यातला आनंद लाखमोलाचा असतो, हे जरा हळूहळूच पण कळत गेलं!
त्यामुळे नवरात्री आल्या की, कलरकोडचे कपडे, गरब्यासाठीचे कपडे, मेकअप, पासेस यासगळ्यांची काळजी अनेकजण करतात. पण मला वाटतं, त्याहून महत्त्वाचं आहे की आपण गरब्यात नेमकं काय शोधायला जातो..
आपल्याला काय मिळतं.
प्रत्येकाचा आनंद सारखाच असेल कदाचित, पण त्या आनंदाच्या पोटात असलेलं ‘काहीतरी’ खास हे ज्याचं त्यालाच माहिती असतं!
ते ‘तुमचं’ तुम्हाला या गरब्यात सापडो.!
- मोहिनी घारपुरे-देशमुख