.. काय माहीत?
By Admin | Updated: November 6, 2014 17:19 IST2014-11-06T17:19:56+5:302014-11-06T17:19:56+5:30
वय वर्षे १५ आणि चार महिन्यांची गरोदर? कसलं तारुण्य आणि कसली उमेद? जगण्याचे भार सोसत जगणार्या आदिवासी तरुण मुलींच्या वाट्याला येते फक्त परवड !

.. काय माहीत?
>आपल्याला कधीच न दिसणार्या ‘आदिवासी’ तरुण मुलींच्या आयुष्याचं अस्वस्थ चित्र.
माझ्याशी बोलत असलेली ती मुलगी. जेमतेम पंधरा वर्षांची असावी. चार महिन्यांची गरोदर होती.
मला कळेना, आई होणार्या ‘तिला’ काय म्हणावं?
मुलगी, युवती म्हणू की महिला म्हणू? ऐन चौदावं-सोळावं म्हणजे हळवे क्षण, हिरवी स्वप्नं, झोपाळ्यावाचून झुलायचे दिवस असं चित्न डोक्यात असतं, पण हे तारुण्य तसं नाही. नाही म्हणायला आदिवासी भागातलं चित्र थोडंबहुत बदलतंय. पण आजही मी अवतीभोवती अल्पवयीन कुमारी माता पाहते. आताशा नजरच काहीशी बोथट झालीये म्हणायची, आधी आधी खूप वाईट वाटायचं. खूप अस्वस्थ व्हायचे. दिवसेंदिवस त्या इवल्याश्या मुलींचे चेहरे डोळ्यांसमोर तरळायचे.
माझ्यासमोर जी कुमारी माता उभी होती. तिला विचारलं, एवढय़ा कमी वयात आई बनणं योग्य वाटतं का तुला? आधी ती काहीच बोललीच नाही. मी ही हारले नव्हते. वैद्यकीय चौकशीदरम्यान पुन:पुन्हा तिला विचारत राहिले. कधी आडून कधी थेट. त्यावर तोंड झाकून हासत, ‘ काय माहीत?’ म्हणत ती बाहेर पळाली. तपासणीला आलेल्या इतर चार-पाच मुलीही जेमतेम सतरा-अठरा वर्षांच्या होत्या. त्यांचीही विचारपूस केली. काहीच हावभाव न दर्शवता त्या फक्त हसल्या.
एक मुलगी म्हणाली, खरंतर चूकच आहे. मला पुढं शिकायचं होतं. पण घरच्यांनी लग्न लावून दिलं. सासूला लगेच नातवंड हवं होतं. तिचं ऐकावं लागतं.’ एवढंच बोलली. बाकीच्या गप्पंच. तसंही या लाजाळू मुलींना बोलतं करणं कठीण असतं. अनोळखीकडे पाहणारच नाहीत. पटकन बोलणार नाहीत. भाषा, माणसं आपली असली किंवा परिचयाची वाटली तरचं बोलणार. मला नेहमी पाहतात, कधी हॉस्पिटलमध्ये, कधी पाड्यांवर वैद्यकीय शिबिरांमध्ये म्हणून माझ्याशी बोलतात मोकळेपणानं थोडंफार. या १४-१६ फारतर अठरा वर्षांच्या आई होऊ घातलेल्या मुलींना मी नेहमी भेटते. त्याचं तारुण्य, त्यांचे प्रश्न हे इतर तरुण जगासारखे नाहीत. ते वेगळेच आहेत. दुर्गम ग्रामीण भागातील पाड्यावरच्या या मुली. काहीजणींनी चौथी ते सातवी दरम्यान शाळा सोडलेली. काही अभावानेच शाळेत गेलेल्या. एखादीच दहावी पास. बर्याचदा या मुलींचे नवरे अडाणी किंवा यांच्यापेक्षा कमी शिकलेले असतात.
त्यात सर्वांत मोठी अडचण ही आहे की, आपल्याला मत असायला हवं आणि ते व्यक्त करता यायला हवं हीच जाणीव यातल्या ऐंशी टक्के मुलींना नाही. जे सभोवताली समाजाच्या रु ढीपरंपरेत घडतेय ते योग्य की अयोग्य ह्याचा विचार त्या करत नाहीत. जे वातावरण आपल्यावर लादलं गेलयं, त्यानुसार स्वत:ला तयार करु लागतात. लहानपणापासून आजूबाजूला अगदी १४ -१५ वर्षांच्या मुलींची लग्न होणं, शाळा सोडणं, कमी वयात मुलं होणं ही त्यांच्यासाठी ‘नेहमीची’ पाहण्यातली गोष्ट, ९0 टक्के मुलींना त्यात काही वावगं वाटत नाही. दहा टक्के मुलींना त्याची जाणीव होत असते; परंतु त्याला विरोध करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात निर्माण होत नाही. एखादीच त्याला विरोध करते. आजूबाजूला पाहून, शाळेत जायलाच हवं किंवा शिक्षण पूर्ण करायलाच हवं म्हणते.मी अनेक मुलींशी बोलते तेव्हा काहीजणी म्हणतातही की, ‘लग्न करायचं नव्हतं, पण घरच्यांमुळे केलं किंवा मुलगा आवडला म्हणून केलं.पण बाळ नको होतं लगेच.’ त्यात नवरा बर्याचदा काही नोकरी करत नसतो किंवा घरची पोटापुरती शेती असतो. हल्ली काही लोक उत्पन्न देणारे मोगरा, झेंडूची शेतीही करतात. तिथं ही मुलं काम करतात.
नाही म्हणायला, शहरी भागात शिक्षणानिमित्त राहणार्या मुली थोड्या आजूबाजूच्या जगाच्या अनुभवाने धीट झालेल्या आहेत. त्या विचार करतात; परंतु त्यांच्यातही विवाहपूर्व गर्भधारणेचे प्रमाण बरेच आहेच. त्यातून मग अवैध गर्भपाताचे प्रयत्नही घडतात किंवा पालकच येऊन सांगतात, तरु ण आहेत, झाली चूक, सांभाळून घ्या.
इथल्या आरोग्य केंद्रातून निरोध नेणार्यात अविवाहित तरु ण मुलांची संख्या जास्त आहे. इथे लैंगिक शिक्षणाचे अनेक कार्यक्र म होतात. तरीही शेतात रानात फिरताना क्षणिक मोहाला बळी पडून ही पिढी चुका करते.
काही गोष्टी मात्र बदलत आहेत. शिक्षण, नोकरीबाबत इथल्या मुली मुलांपेक्षा जास्त गंभीर आहेत, खुपदा मुलीच नोकरी करून घर चालवतात. नवरा काहीही न करता बसून खातो असं दिसतं.
आदिवासी मुलामुलींचं हे ‘वास्तव’ तारुण्य आणि त्यांना टीव्हीतून दिसणारं बाहेरचं जग यांचा काही ताळमेळच नाही. दहा-पंधरा कि.मी.वरून डोक्यावर पाणी वाहताना या तरु णींच्या ओठी रणबीर, दीपिकाची गाणी असली तरी पायात वास्तवाचे काटे रु तत असतात.
ते काटे आणि डोईवरचं ओझं, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं, हा खरा प्रश्न आहे.
- डॉ. अनिता पाटील
(जव्हार परिसरातल्या आदिवासी भागात काम करणार्या धडाडीच्या तरुण स्त्रीरोग तज्ज्ञ.
आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजूंना व्हावा म्हणून राबणार्या डॉ. अनिताने नोंदवलेलं
हे अस्वस्थ तरुण आदिवासी जगणं.)