वारी पंढरीची, गजर तरुणाईचा
By Admin | Updated: July 13, 2016 18:57 IST2016-07-13T18:46:04+5:302016-07-13T18:57:07+5:30
आषाढी एकादशी ऐकल्यावर विठ्ठलाच्याही अगोदर डोळ्यांसमोर उभे राहतात ते ‘वारकरी

वारी पंढरीची, गजर तरुणाईचा
>- रोहित नाईक
आषाढी एकादशी ऐकल्यावर विठ्ठलाच्याही अगोदर डोळ्यांसमोर उभे राहतात ते ‘वारकरी’. या दिवशी लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन ही मंडळी आपल्या जीवनाचं सार्थक करुन घेतात. अभंग - ओव्यांनी वातावरण भारलं जातं. एकूणच वारकरी चातकाप्रमाणे ज्या दिवसाची वाट पाहतात, तो दिवस म्हणजे ‘आषाढी एकादशी’...
आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यात, वारकरी म्हटल्यावर ५०-६० वर्षांची व्यक्ती सदरा - पायजमा घातलेली, हातात वीणा धरलेली, कपाळाला चंदन लावलेली अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. परंतु, यामध्ये तरुणांचा सहभागही खूप लक्षणीय असतो. विशेष म्हणजे बहुतेक तरुण हे ग्रामीण भागातील असतात.
मात्र शहरातसुध्दा आषाढी एकादशीनिमित्त शाळांमधून दिंडी काढली जाते. कॉलेजेसमध्ये विविध स्पर्धा होतात. शाळेतल्या दिंडीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक यंगिस्तानच्या डिक्शनरीमध्ये ‘उपवास’ असा शब्दच नसतो. मात्र, आषाढी एकादशीला खूप सारे कॉलेजियन्स न चुकता उपवास करतात. हरी विठ्ठल......
एरवी कधीही उपवास न करता आषाढीचा दिवस मात्र उपवासासाठी कधीच चुकवला जात नाही. नेहमी वेस्टर्न म्युझिक ऐकणाºया कानांना यादिवशी अभंग - ओव्या खूप प्रसन्न ठेवतात. प्रत्यक्षात वारीमध्ये जाण्याची इच्छा असली, तरी शिक्षण किंवा नोकरीमुळे तिथे जाता येत नाही. यावर उपाय म्हणून टेक्नोसॅव्ही यंगिस्तान टीव्हीद्वारे किंवा थेट इंटरनेटद्वारे घरबसल्या ‘आॅनलाइन’ पंढरीची वारी अनुभवतात. जवळच्या मंदिरात दर्शनाला गर्दी करतात.
काहीजण तर आपल्या शाळेच्या दिंडीमध्ये सहभागी होतात. त्यानिमित्ताने का होईना, पुन्हा शाळेत जाण्याची संधी तरी मिळते. आता तर देवाचंदेखील ‘ई - दर्शन’ होऊ लागले आहेत.
जागतिक कट्टा असलेल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अनेकांनी स्वत:च्या प्रोफाईलवर आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, फोटो किंवा माहिती देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामाध्यमातून वारी जगभर पोहचतही आहे.
आज कित्येक तरुण ‘वारकरी संप्रदाय’ विद्यालयातून पदवी प्राप्त करीत आहेत. त्यामुळेच, एक मात्र नक्की की, जरी तरुणाई प्रत्यक्षात पंढरपूरपासून लांब असली, तरी त्यांचा ‘विठुराया’ त्यांच्या मनात नक्कीच विसावला आहे.
बोला...
पुंडलिक वरदे... हरी विठ्ठल...
श्री ज्ञानदेव... तुकाराम...
पंढरीनाथ महाराज की जय.....