सॉरी... महादेव

By Admin | Updated: December 5, 2014 11:57 IST2014-12-05T11:57:46+5:302014-12-05T11:57:46+5:30

महादेव, तसं म्हटलं तर तुझं माझं काहीच नातं नाही. मी कधी तुला पाहिलेलंही नाही. तुझी माझी मैत्रीही नाही. तरीही तुझ्या फोटोसह आलेली ‘ती’ बातमी वाचून मी आतून पुरता हेलावून गेलो. तुझ्या मोबाइल लिस्टमध्ये (असलेले आणि) नसलेले आम्ही. एखाद्यानं स्वत:ला श्रद्धांजली वाहणारी पोस्ट टाकली तरी आम्हाला काहीच वाटत नाही, त्यालाही रिप्लाय म्हणून एक स्मायली टाकून आम्ही थम्स अपच करणार ?

Sorry ... Mahadev | सॉरी... महादेव

सॉरी... महादेव

महादेव, तसं म्हटलं तर तुझं माझं काहीच नातं नाही. 
मी कधी तुला पाहिलेलंही नाही. तुझी माझी मैत्रीही नाही. तरीही तुझ्या फोटोसह आलेली ‘ती’ बातमी वाचून मी आतून पुरता हेलावून गेलो. 
तुझ्या मोबाइल लिस्टमध्ये (असलेले आणि) नसलेले आम्ही. एखाद्यानं स्वत:ला श्रद्धांजली वाहणारी 
पोस्ट टाकली तरी आम्हाला काहीच वाटत नाही, त्यालाही रिप्लाय म्हणून एक स्मायली टाकून 
आम्ही थम्स अपच करणार ?
 
तसं म्हटलं तर तुझं माझं काहीच नातं नाही. मी कधी तुला पाहिलेलंही नाही. तुझी माझी मैत्रीही नाही. तरीही तुझ्या फोटोसह आलेली ती बातमी वाचून मी आतून पुरता हेलावून गेलो. आपल्या अगदी जवळचं कुणीतरी अचानक दूर दूर निघून जावं असंच काहीसं वाटत राहिलं.. 
महादेव कुंभार : भावपूर्ण श्रद्धांजली असा संदेश मोबाइलवरून फोटोसह पाठवून गळफास घेऊन तरुणाची आत्महत्त्या.
- हा त्या दिवशीचा पहिल्या पानावरच्या बातमीचा विषय होता. नाहीतर सांगलीतल्या तुझ्या फाटक्या घरात आणि छोट्याशा गावात कुणाला रस असणार? चॅनलवाल्यांना ब्रेकिंग मिळालं होतं. सोशल मीडियावरच्या अनेकांसाठीही ते एक हॅपनिंग होतं. लोकांना प्रतिक्रिया देण्यासाठी, सोशल मीडियाच्या आहारी कसे तरुण चाललेत हे जगाला ओरडून सांगण्यासाठी. तज्ज्ञांना एक विषयही मिळाला होता.. 
मी मात्र थबकलो होतो. कितीतरी वेळ ! काही क्षण तर तुझ्या त्या फोटोत मी स्वत:ला ठेवूनदेखील पाहिलं. अस्वस्थतेनं दाटलेलं एक प्रचंड कोलाहलाचं वादळ दोरीच्या फासात मान अडकवून घेऊन शांत होऊन गेलं होतं.. काय वादळं होती तुझ्या मनात? किती अस्वस्थता दाटून राहिली असेल? दु:खाच्या परिसीमेविना कुणी असं अचानक पाऊल कसं उचलेल.. नक्की काय घडलं असावं?
या आभासी जगात रमताना जगण्यातल्या वास्तवाचा तुला विसर हवा होता? की वास्तवातले चटके इतके भयंकर होते की आभासी जगात रमण्यातलाही आनंद तुझ्यासाठी संपून गेला होता? की दु:खावेगाच्या एका क्षणी सगळंच निर्थक झालं होतं?
- तू गेलास पण तुझ्या भोवतीच्या या प्रश्नांचं मोहोळ कायम आहे. तुझ्या मन:स्थितीचा थांग आता कधीच लागू शकणार नाही. 
 पण राहून राहून एकच वाटत राहिलं, हे पाऊल उचलण्याआधी तुझ्याशी कुणीतरी बोलायला हवं होतं. विश्‍वासाने तुला कुणीतरी जवळ घेणारं हवं होतं.  तुझ्या मनाची उलथापालथ कुणालाच दिसली नसेल का रे? मैत्रीचा एक तरी निखळ आधार, हात तुझ्या सोबत हवा होता.
 ऐन तारुण्याच्या उंबरठय़ावर असणारा एक विशी-बाविशीतला तरुण आपलं आयुष्य एका क्षणात संपवून टाकतो. मोबाइल हा त्याला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणातला आधार वाटतो. कारण त्याचा शेवटचा संवाद जो काय होतो तो तिथेच. 
 दहावीनंतर शिक्षण सुटलेलं. मनात अपयश साठलेलं. घरची परिस्थिती हलाखीची. मोलमजुरी करणारे आईवडील. राहायला अगदी फाटकं घर. काम मिळालं तरच घर चालणार अशी परिस्थिती.
- हे असं जगत होतास तू.
 अशातच जर कुणाच्यात गुंतलेल्या हृदयानं तुझं मन दुखावलं गेलं असेल, तर त्यातून सावरणं आणखीनच कठीण. भविष्याच्या क्षितिजावर एकही आशेचा किरण दिसला नसणार, त्याशिवाय असं पाऊल कुणी उचलेल का रे? 
अशा वेळी किमान एक जिवाभावाचं असं कुणी जवळ असतं. पाठीवर हात ठेवणारं, जवळ घेऊन समजावणारं, मित्रत्वाचा आधार देणारं, कुणीतरी !  कदाचित तुझा निर्णय बदलला असता. परिस्थिती बदललीही नसती कदाचित, पण आयुष्य असं चुरगळून फेकून तरी दिलं नसतंस तू.  तुला फारसे मित्रही नव्हते. एकलकोंडा राहायचास. मग मोबाइलच तुझा मित्र बनला. वेळ मिळेल तेव्हा आणि वेळच वेळ असेल तेव्हा तू त्यात रमायचास. कदाचित वास्तवाच्या चटक्यांतून दूर पळावं म्हणून तुला ते आभासी जग जवळचं वाटलं असावं. 
..कदाचित एका क्षणाला दोन्ही व्यर्थ वाटलं असावं बहुधा. अन् पोलीस मात्र अजूनही तुझ्या त्या आभासी जगातलं वास्तव शोधण्यासाठी मोबाइलचा शोध घेत फिरताहेत म्हणे.
मी तुझ्या व्हॉट्स अँप लिस्टमध्ये नव्हतो. पण समजा, असतोच आणि तू मला पाठवला असतास तुझा मेसेज, तर मी काय समजलो असतो त्यातून? मलाही ती तू केलेली भंकसच वाटली असती का? की नुस्ता एक टाइमपास? 
मी-तू आपण सारेचजण; व्हॉट्स अँप, फेसबुक फक्त टाइमपास वाटतो. त्यावर जे काही चालतं ते सारं सिरीयसली घ्यायचंच नसतं, असं वाटतं का आपल्या सगळ्यांना? तसं तुझ्या पोस्टलाही नाहीच घेतलं कुणी सिरीयसली ! म्हणून तर तू पाठवलेला स्वत:लाच श्रद्धांजली वाहणारा फोटो पाहून कुणी हायपर होत तुला फोनबिनही केला नसेल.  
जशी आली एखादी कविता आपल्या नंबरवर की केली फॉरवर्ड, दिवसभर फिरणारे आचरट विनोद, पीजे, राजकारण्यांपासून जगातल्या कुठल्याही माणसाची  उडवलेली खिल्ली हे सारं आपल्यासाठी भंकसच. आपल्या सार्‍यांना एकच घाई लागली आहे, येईल ते पटकन शेअर करून फक्त लाईक मिळवत बसण्याची! 
आणि या सार्‍यात महादेव तुझं असं अचानक स्वत:लाच श्रद्धांजली वाहून जाणं.
तुझ्या मोबाइल लिस्टमध्ये (असलेले आणि) नसलेले आमच्यासारखे घटकाभर विचार करतील की, एखाद्यानं स्वत:ला श्रद्धांजली वाहणारी पोस्ट टाकल्यावर तरी आपण ती सिरीयसली घेणार की रिप्लाय म्हणून एक स्मायली टाकून तेही कॅज्युअलीच घेणार.
- पराग पोतदार 

Web Title: Sorry ... Mahadev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.