सोनई, खर्डा, जवखेडा आणि..?
By Admin | Updated: November 6, 2014 17:00 IST2014-11-06T17:00:34+5:302014-11-06T17:00:34+5:30
ज्यांच्या शरीराची खांडोळी झाली ते तरुण, ज्यांनी खांडोळी केली तेही तरुण, प्रेमसंबंध आणि जातीपातीच्या खोट्या प्रतिष्ठेतून दुसर्याचा क्रूरपणे जीव घेणारा तरुण विखार काय सांगतो?

सोनई, खर्डा, जवखेडा आणि..?
>एकामागून एक हत्त्याकांडं ‘कव्हर’ करणार्या रिपोर्टरच्या हाती लागणारं एक भयाण वास्तव
सोनई, जि. अहमदनगर.
तीन दलित युवकांची निघरुण हत्त्या.
ऑनरकिलिंगचा संशय.
————
खर्डा, जि. अहमदनगर
नीतीन आगे या १७ वर्षाच्या
तरुणाची हत्त्या. प्रेमसंबंधातून हत्त्या झाल्याचा आरोप.
————
जवखेडा तिहेरी हत्त्याकांड.
प्रेमसंबंधातून हत्त्या झाल्याचा अंदाज
————
एखादं झाड तोडणं. एखादी माशी मारणं. एखाद्या पक्ष्याला दगड मारणं. एखाद्याला शब्दांनी जखमी करणं या सार्यामुळे आपण हळहळतो.
मग, माणूस कापला जात असेल तेव्हा काय? माणसांच्या शरीराची खांडोळी केली गेली वगैरेसारखी वाक्यं उच्चारतानाही भयाण वाटतात, तेव्हा ते प्रत्यक्ष घडणं किती भयावह असेल याची कल्पनाही आपण तरी करु शकतो का?
पण हे सारं आपल्या अवतीभोवती घडतं आहे. गेल्या दोन वर्षांत अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या घटनांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्वार्थासाठी, चोरी-दरोड्यासाठी, स्वसंरक्षणासाठी किंवा रागाच्या भरात एखाद्याला ठार करणं ही कृती अत्यंत सौम्य वाटावी एवढय़ा क्रूर आणि अमानुष वाटणार्या या घटना नेमकं काय सांगतात? एका बाजूला अधिकाधिक शिक्षित, संस्कृत, सुजाण आणि समृद्धीकडे जाणारा तरुणांचा प्रवास आणि दुसर्या बाजूला माणूस म्हणवून घ्यायला लाज वाटाव्यात अशा या घटना.
खरं तर हे कोणी केलं, काय केलं याचा तपास अद्याप पोलिसांना लागत नाहीए. सोनई आणि खर्डा या आधीच्या दोन्ही प्रकरणांमध्ये फिर्यादींनी संशयितांची नावं दिली होती. त्यामुळे अर्थातच पोलिसांचा तपास सोपा होता. मात्र, पाथर्डीतल्या जाधव कुटुंबीयांच्या हत्त्याकांडात कोणतेही धागेदोरे नसल्यानं पोलिसांपुढचं आव्हानही मोठं ठरलंय. अर्थात सोनई प्रकरणात आरोपींना दुसर्या दिवशी अटक करण्यात आली तेव्हा, ‘हो आम्ही हे कृत्य केलंय, त्याबद्दल आम्हाला अपराधी वाटत नाही’ असं त्यांनी खासगीत सांगितलं होतं आणि आता जवखेड्यातल्या हत्त्याकांडानंतर आरोपींनी पुरावेही नष्ट करुन कोणताही मागोवा ठेवलेला नाही. या तिन्ही घटनांचा तपशील पाहता अनेक प्रश्न तर उपस्थित होतातच. पण काही सामायिक घटकही दिसतात.
तिन्ही घटनांमध्ये ज्यांची अमानुष हत्त्या करण्यात आली ते दलित वर्गातील आहेत. जवखेड्यातले आरोपी अद्याप निष्पन्न व्हायचे आहेत. पण अन्य दोन प्रकरणांमधले संशयित आरोपी उच्च समाजातील होते. त्यामुळे या सर्व घटनांमागे नेमका कोणता सामाजिक अर्थ भिनलेला आहे याचा विचार करणं अत्यंत कळीचं ठरतंय.
ज्यांची हत्त्या करण्यात आली ते तरुण आहेत. सोनईतले सचिन, राहुल आणि संदीप हे २0 ते २३ या वयोगटातले होते. खडर्य़ातला नितीन आगे हा तर अवघा १७ वर्षांचा मुलगा होता. आताच्या तिहेरी हत्त्येतील सुनील हा तरुण फक्त१९ वर्षांचा आहे. जवखेड्यातल्या जाधव कुटुंबातल्या तिघांची हत्त्या करण्यात आली असली तरी सुनीलच्या शरीराचे जेवढे हाल करण्यात आले आहेत ते पाहता हत्त्येचा हेतु त्याच्याशी संबंधित असावा हे स्पष्ट आहे.
तिन्ही हत्त्याकांडांमध्ये फक्त मारणं, ठार करणं किंवा संपवणं हे अभिप्रेत नाही तर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं ते कृत्य करणं आणि त्याचवेळी सर्व पुरावेही नष्ट करण्याचाही नीट विचार करण्यात आलेला दिसतो. सोनईत या तिन्ही तरुणांना शौचालय साफ करण्याच्या उद्देशानं बोलावण्यास आलं. त्यांना मारल्यानंतर त्यांचे मृतदेह संडासची टाकी, बोअरवेल यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सचिनचा मृत्यू संडासच्या टाकीत पडून गुदमरमरल्यानं झाल्याचा बनाव तयार करण्यात आला. नितीन आगेच्या मृतदेहाचीही अशीच विल्हेवाट लावण्यात आली. त्याचा मृतदेह झाडाला टांगून आत्महत्त्येचा बनाव तयार करण्यात आला.
जवखेड्याच्या प्रकरणात अद्याप आरोपी आणि त्यांचा हेतु निष्पन्न झालेला नाही, मात्र पहिल्या दोन्ही प्रकरणांमध्ये सवर्ण मुलीसोबत कनिष्ठ वर्गातील तरुणाचे प्रेमसंबंध हा समान धागा दिसतो. जवखेडे प्रकरणात सुनीलच्या शरीराचे केलेले हाल आणि त्याचा मोबाइल गायब करणं यातून हे हत्त्याकांडही प्रेमसंबंधातून झालं असावं असा एक अंदाज व्यक्त केला जातोय.
ही तिन्ही हत्त्याकांडं एकट्या माणसानं केलेली नाहीत तर तो एक सामुदायिक प्रकार असल्याचं उघड झालय. सोनई आणि खडर्य़ाच्या केसमध्ये तर पाचपेक्षा जास्त संशयित आरोपींची नावं एफआयआरमध्येच नमूद आहेत. जवखेड्याच्या हत्त्याकांडाचा प्रकार पाहता यातही चारपेक्षा जास्त लोक सहभागी असतील हा पोलिसांचा कयास आहे.
या तिन्ही घटनांमधला सर्वांत महत्त्वाचा सामायिक घटक म्हणजे हत्त्येतील अमानुषता आणि क्रुरता. डोक्यात एखादं हत्यार घालून, घाव करून वा भोसकून हे हत्यारे थांबलेले नाहीत. तर मृतदेहांच्या अत्यंत अमानुष पद्धतीनं खांडोळ्या करण्यात आलेल्या आहेत.
————
पोलीस तपास, सरकारची कारवाई, कोर्टाची शिक्षा आणि शेवटी न्याय-अन्याय हे सारं सुरूराहील. पण वर उपस्थित केलेले हे सहा सामायिक घटक आणि त्यातला तरुणांचा सहभाग, त्यांचं वर्तन आपल्याला विचार करायला लावणारं आहे.
एका बाजूला संस्कार, शिक्षण, समृद्धी यामुळे आपण आधुनिकतेच्या दिशेने जात असल्याचा दावा करीत आहोत. भौतिक विकासाची, आधुनिकतेची फळं चाखत आहोत. जबाबदार नागरिक, संवेनशील व्यक्ती म्हणून अनेक चर्चा करतो आहोत. अशावेळी आपल्याच भोवती आपल्यापैकीच कुणीतरी एवढं अघोरी का होऊ शकतं? जातपात, सामाजिक प्रतिष्ठा आजही आणि तरुणांच्या मनातही एवढी खोलवर का रुतून आहे? थंड डोक्यानं माणसाच्या शरीराच्या खांडोळ्या करण्यात याव्यात एवढी कोणती भावना तीव्र आहे? प्रेमसंबंध, नातेसंबंध याबाबत बराच विचार, बर्याच चर्चा करणारे तरुण या सार्याबद्दल काय विचार करतात? तरुण म्हणून याकडे कसं बघतात, यातून काय बोध घेतात?
अन्यथा एक सोनई झालं, दुसरं खर्डा झालं, तिसरं जवखेडे झालं आणि आणखी काहीतरी चौथं होईल. मग पाचवं.. मग सहावं.. त्याच खांडोळ्या आणि तीच आंदोलनं. तीच सांत्वनं आणि तीच आश्वासनं.
हे दृष्टचक्र थांबवणं निग्रहानं आणि आग्रहानं हे तरुणांच्याच हातात आहे ते तरुणांनाच शक्य आहे.
त्यामुळे जातीपातीची खोट्या प्रतिष्ठेची भुतं आपल्याही मानगुटीवर आहेत का, हे प्रत्येक तरुणानं विचारायलाच हवं स्वत:ला !
- दीप्ती राऊत
उत्तर महाराष्ट्र ब्युरो चिफ, आयबीएन लोकमत