वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठताय? मग हा आजार होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:00 IST2018-11-29T06:00:00+5:302018-11-29T06:00:09+5:30

झोप वैरी झाली तर मूडबदल नावाचा आजार तरुण मुलांना का छळतोय?

sleepless nights? lifestyle hazards.. | वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठताय? मग हा आजार होऊ शकतो.

वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठताय? मग हा आजार होऊ शकतो.

ठळक मुद्देभ्यास सांगतोय की तुम्हाला आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असेल तर निदान झोपेच्या वेळा तरी पाळा.

- निशांत महाजन

आताशा अ‍ॅपची क्रेझ तरुण मुलांमध्ये उरलेली नाही. तरीही सध्या स्लीप अ‍ॅप चर्चेत आहे. म्हणजे काय तर शांत झोप यावी म्हणून मदत करणारी अ‍ॅप्स. गाणी, सुदिंग म्युझिक, झोप येण्याच्या सूचना असं बरंच काही त्या अ‍ॅपवर असतं. किती तास झोपलात, किती गाढ झोप लागली याची रेकॉर्डही ते अ‍ॅप ठेवतात. 
पण म्हणजे अंथरूणावर पडलं, तोंडावर पांघरूण ओढलं आणि ढाराढूर झोप लागली, पडल्या पडल्या झोप लागली ही इतकी साधी गोष्ट करायची तरी अनेकांना मदत लागते. त्याचं कारण न येणारी झोप ! बरं त्यात काही सगळेच प्रेमात पडलेले नसतात, त्यामुळे प्यार में निंद उड गयी असं म्हणण्याचीही सोय नाही. झोप भलत्याच गोष्टींनी उडालेली असते. आणि ज्यांना कमी झोप लागते त्यांना हायपरटेन्शन, चिडचिड असे त्रास होतात यावर मोठमोठय़ा जर्नल्समध्ये आता लेख प्रसिद्ध होऊ लागलेत.
पण जाते कुठं ही झोप?
त्याचं होतं असं की आपण तरुण असतो, बिनधास्त असतो. रात्री जागरणं करतो, सिनेमे पाहतो, पाटर्य़ा करतो, गप्पा मारत बसतो, जमलं तर अभ्यास करतो. आणि पहाटे कधीतरी झोपतो, दुपारी उठतो. कधी तर संध्याकाळीही उठतो. काहीजण तर बारा वाजून गेल्याशिवाय उठतच नाहीत. हे सारं करणं अनेकांना ‘कूल’ वाटतं. भल्या पहाटे उठून खुडबुड करणारे आईबाबा तर महाबोअर वाटतात. लवकर उठणं आवडत नाही. आणि उठलेच कधी तर उठून करणार काय असा प्रश्न पडतो. पण आता जीवनशैलीचा अभ्यास असं म्हणतो की, जर तुम्ही लवकर झोपेतून उठत नसाल किंवा रोजच तुमच्या झोपेच्या वेळा बदलत असतील तर तुमचे जबरदस्त मूडस्विंग्ज होतात. आणि तुमचे दिवसाच्या दिवस वाईट जातात. आणि त्यानं तुमच्या करिअरवर कायमचा वाईट परिणाम होतो.
मेसेच्युसेट्ेस इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या एका अभ्यासानुसार हे निरीक्षण पुढं आले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये शिकणार्‍याच मुलांचं एक सव्र्हेक्षण केलं. या मुलांना फक्त त्यांच्या झोपेच्या वेळेच्या नोंदी सलग 36 दिवस ठेवायला सांगण्यात आल्या. त्यातून एक रेकॉर्ड तयार झालं जे असं दाखवतं की रोज एकाच वेळी झोपणारे आणि एका ठरावीक वेळीच उठणारे तरुण मुलं अत्यंत कमी आहेत. बाकीचे सारे रोज वाट्टेल तेव्हा झोपतात, वाट्टेल तेव्हा उठतात. अनेकांचं झोपेचं ठरलेलं असं काही शेडय़ुल नाहीत. त्यातून या मुलांचं झोपेचं चक्र बिघडतं. त्यातून पचनाचं तंत्रही बिघडतं. 
त्याहून वाईट म्हणजे ज्यांचं झोपेचं चक्र बिघडतं, त्यांचा मूड अनेकदा दिवसभर चांगला नसतो. ते चिडचिडतात. उदास असतात. कधी आक्रमक असतात. त्यांचे प्रचंड मूड स्विंग्ज होतात. आणि त्यांचं कामावरचं लक्षही उडालेलं असतं. परिणाम म्हणून त्यांच्या दिवसभराच्या कामाचा दर्जा बिघडतो. आणि एकूण प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून हा अभ्यास सांगतोय की तुम्हाला आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असेल तर निदान झोपेच्या वेळा तरी पाळा.
तसं फार अवघड नाही ते !

Web Title: sleepless nights? lifestyle hazards..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.