‘टच’मधे असलेलं एकटेपण
By Admin | Updated: December 5, 2014 12:04 IST2014-12-05T12:04:50+5:302014-12-05T12:04:50+5:30
डीअर फ्रेण्ड्स. अस्वस्थच वाटतं ना, कधीकधी एखादा लेख, एखादी बातमी वाचून. पुढच्याच पानावरच्या महादेवचीच गोष्ट घ्या. एरवी कशाला माहिती झाला असता तो आपल्याला? आणि वेळ कुठेय आपल्याला कुणाचा विचारबिचार करण्यासाठी? इथं स्वत:साठी वेळ नाही, स्वत:शी चार शब्द बोलायचे तरी फुरसत नाही. कित्येक दिवसांत तर घरच्यांशीही बोललेलो नाही. आजारी आजीला, म्हातार्या होत चाललेल्या मामाला भेटायला जाऊ जाऊ म्हणतो, पण वेळ कुठाय?

‘टच’मधे असलेलं एकटेपण
डीअर फ्रेण्ड्स. अस्वस्थच वाटतं ना, कधीकधी एखादा लेख, एखादी बातमी वाचून.
पुढच्याच पानावरच्या महादेवचीच गोष्ट घ्या.
एरवी कशाला माहिती झाला असता तो आपल्याला? आणि वेळ कुठेय आपल्याला कुणाचा विचारबिचार करण्यासाठी?
इथं स्वत:साठी वेळ नाही, स्वत:शी चार शब्द बोलायचे तरी फुरसत नाही.
कित्येक दिवसांत तर घरच्यांशीही बोललेलो नाही. आजारी आजीला, म्हातार्या होत चाललेल्या मामाला भेटायला जाऊ जाऊ म्हणतो, पण वेळ कुठाय?
तसं ‘टच’मधे असतोच आपण एकमेकांच्या. सवयीनं बर्थ डे विश करतो. कुणी कुठं डोसा खाल्ला, कोण कुठं फिरायला गेलं, तिथं काय मजा केली हे सारं तर कळतंच आपल्याला.
करतात ना, ते सारं तेही फेसबुक किंवा व्हॉट्स अँपवर पोस्ट. फोटोबिटोसह..
आपणही करतो.
त्यांच्या घरी काय भाजी काल केली होती हेसुद्धा अनेकदा आपल्याला माहिती असतं.!
पण ही झाली सारी माहिती ! आपण टचमधे आहोत, एकमेकांच्या संपर्कात आहोत, हे सांगणारी किंवा तसा फील तरी देणारी ! पण आपण एकमेकांशी पोटातलं बोलणं, मनापासून सांगणं, कुणी सांगितलेलं ऐकून घेणं, हे सारं करतो का आता?
होतं असं काही?
बोलतो मनातलं काही भीडभाड न ठेवता एकमेकांशी? म्हणायला आपल्याला ढीगभर मित्र आणि मैत्रिणी.
पण प्रसंगी आपण एकटेच आणि मनातून पार एकेकटे.
गर्दीतलं हे सुनंपण, आपल्या सगळ्यांना खुपतं, सलतं, छळतं.
हे कधीतरी आपण मान्य करणार आहोत का? हातातला फोन बंद करून, प्रत्यक्ष आपल्या माणसांशी बोलणार आहोत का?
.कधीतरी !