शुध्द पाण्याचं एटीएम
By Admin | Updated: July 11, 2016 13:56 IST2016-07-11T13:56:41+5:302016-07-11T13:56:41+5:30
शहरात राहणाऱ्यांना प्यायच्या पाण्यासाठी इतकं झगडावं लागत नाही जितकी तडफड ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी करावी लागते.

शुध्द पाण्याचं एटीएम
शहरात राहणाऱ्यांना प्यायच्या पाण्यासाठी इतकं झगडावं लागत नाही जितकी तडफड ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी करावी लागते. तसं नाही म्हणायला पिण्याच्या पाण्याचं महत्त्वं महाराष्ट्रातल्या शहरी भागांनाही यंदाच्या दुष्काळानं पटवून दिलंच आहे. पण दुष्काळ असो नाहीतर सुकाळ पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणं हे ग्रामीण भागातल्या लोकांच्या सवयीचंच झालं आहे.
कधीमधी वर्तमानपत्रात याबद्दल वाचल्यावर, वृत्तवाहिन्यांवरील दृश्यांमध्ये पाण्याच्या हालाची दृश्य पाहिल्यानंतर तेवढ्यापुरती हळहळ वाटते. पण तो प्रश्न त्यांचा आहे या मानसिकतेनं अशा बातम्यांमधून चटकन पाहणारे, वाचणारे स्वत:ची सुटकाही करवून घेतात.
पण मुंबईमधल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीत शिकणारी दिया श्रॉफ नावाची विद्यार्थिनी याला अपवादच म्हणावी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातले हाल पाहून दिया अस्वस्थ झाली. तिची अस्वस्थता तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. तिच्या संशोधक बुध्दीनं यावर उपाय शोधायचं ठरवलं.
ग्रामीण भागात किमान पिण्याचं काही लिटर शुध्द पाणी तरी प्रत्येक कुटुंबाला हमखास मिळालं तर त्यांचे कष्ट कितीतरी हलके होतील. दीयानं आपल्या या कल्पनेबाबतची चर्चा युरेका फोर्बस कंपनीशी केली. त्यांच्यात झालेल्या विचारविनिमयातून शुध्द पाण्याच्या एटीएमची कल्पना सुचली. पैशाच्य एटीएम मशीनसारखं पाण्याचं एटीएम मशीन बसवण्याचा हा जलजीवन प्रकल्प आहे. संपूर्ण भारतातल्या ग्रामीण भागात हे पाण्याचे एटीएम बसवले तर ग्रामीण भागातल्या लोकांचा पिण्याचा प्रश्न सुटू शकतो असं दीयाला वाटतं.
दीयाच्या कल्पनेतून साकार झालेला जलजीवन हा पाण्याचा एटीएम प्रकल्प सोलापूरमधल्या प्रभाग क्रमांक 30 मधल्या रेवणसिध्देश्वर झोपडवस्तीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.
अर्थातच तिनं शोधलं आणि ते लगेच साकारालं असं झालं नाही. तिनं वैयक्तिक पातळीवर, सरकारी कार्यालयातून आणि नगर परिषदेकडून देणग्या गोळा केल्या. त्यातून जमलेल्या पैशातून सोलापूरमध्ये हा प्रकल्प आकारास आला.
पाण्याचे एटीएम मशीन त्या त्या भागातल्या बोरवेल, विहिर या पाण्याच्या स्त्रोतांशी जोडलेल्या शुध्दीकरण प्रकल्पाशी जोडलेलं असतं. पाणी शुध्दीकरण प्रकल्प विहीर, बोरवेल मधल्या पाण्याचं शुध्दीकरण करतं. या प्रकल्पातलं पाणी मग त्याला जोडलेल्या टाकीत साठवलं जातं. आणि हे साठवलेलं पाणी या टाकीला जोडलेल्या एटीएमद्वारे प्रत्यक्ष लोकांमध्ये वितरित केलं जातं. एटीएमद्वारे लोकांना पाणी मिळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक एटीएम कार्ड दिलं जातं. जे त्या मशीनवर स्क्रॅच केलं की स्क्रॅच करणाऱ्यांना वीस लीटर शुध्द पाणी मिळतं.
दीयाला पाण्याच्या एटीएम प्रकल्प संशोधनासाठी राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही मिळाला आहे.
-माधुरी पेठकर