ओव्हर एक्सरसाइजचे बळी!- नक्की काय घातक ठरतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:39 PM2019-01-31T12:39:32+5:302019-01-31T12:39:45+5:30

कुठल्या तरी हीरोची बॉडी तगडी आहे, सिक्स पॅक्स आहेत, पडद्यावर तो एकदम मॅनली दिसतो, किंवा अमुक एका हिरोइनची झिरो फिगर आहे, तसंच आपणही दिसलं पाहिजे यासाठी वाट्टेल ते करायची अनेक तरुण-तरुणींची तयारी असते; पण हा हव्यास जिवावर बेतू शकतो..

Over Exercise, why it is so dangerous? | ओव्हर एक्सरसाइजचे बळी!- नक्की काय घातक ठरतंय?

ओव्हर एक्सरसाइजचे बळी!- नक्की काय घातक ठरतंय?

Next
ठळक मुद्देव्यायामाचं एक शास्रशुद्ध टेक्निक, तंत्र असतं. आपल्याला ते माहीतच हवं; पण यू-टय़ूबवरचे व्हिडीओ पाहून नव्हे!

-मयूर पठाडे

काही दिवसांपूर्वीचीच घटना.
ठाण्यातील एका तरुणाचा जिममध्ये व्यायाम करता करताच मृत्यू झाला.
हा मृत्यू का झाला, कसा झाला याबद्दलची कारणं काही दिवसांनी कळतीलच. त्यावर उलट-सुलट चर्चाही रंगतील; पण व्यायाम करताना, पळताना, ट्रेण्ड मिलवर चालताना, वजन उचलताना कुणाचा तरी मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना अलीकडे बर्‍याच पाहायला, ऐकायला मिळतात..
खरं तर आपण व्यायाम करतो, तेच आरोग्यासाठी, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी; पण व्यायाम करतानाच एखाद्याचं आयुष्य संपणं हा अतिशय मोठा विरोधाभास..
मग का घडतं असं?.
अतिव्यायाम, अतिमहत्त्वाकांक्षा किंवा चुकीच्या पद्धतीनं केलेला व्यायाम बर्‍याचदा आपल्या अंगाशी बेतू शकतो. व्यायाम करताना आपण कशासाठी व्यायाम करतोय हे अगोदर आपण समजून घेतलं तर असे प्रकार टाळता येऊ शकतील. 
कुठल्यातरी हीरोची बॉडी तगडी आहे, सिक्स पॅक्स आहेत, पडद्यावर तो एकदम मॅनली दिसतो, अमुक एका हिरोइनची फिगर झिरो साइज आहे, गेल्या कित्येक वर्षात तिच्या अंगावरची चरबी एक सेंटीमीटरनंही वाढलेली दिसली नाही, म्हणून आपणही तसंच दिसलं पाहिजे आणि त्यासाठी वाट्टेल ते करायची माझी तयारी आहे, हा हव्यास बर्‍याचदा तरुणांना नको त्या दिशेला घेऊन जातो.
आजकाल कुठल्याही जिममध्ये जा, तिथली मुलं व्यायामाबरोबरच आपल्या शरीरावर सप्लिमेंट्सचा मारा मोठय़ा प्रमाणात करताना दिसतील. याच मार्गानं आणि लवकरात लवकर बॉडी बनवण्यासाठी अनेक तरुण पुढे ड्रग्जकडे वळल्याचं प्रमाणही मोठं आहे. 
व्यायाम करताना मृत्यू पावल्याची उदाहरणं आपल्याकडे दिसत असली तरी अतिव्यायामामुळे किंवा चुकीच्या व्यायामामुळे आपल्या आयुष्याचीच वाट लावून घेतलेल्या तरुणांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
व्यायाम ही समजून, उमजून हळूहळू आणि तंत्रशुद्धपणे करण्याची गोष्ट आहे, हेच अनेकांना माहीत नाही. माहीत असलं तरी ते समजून घेण्याची कुणाची तयारी नाही. मात्र थोडीशी काळजी घेतली तर असे प्रकार टाळता येऊ शकतील आणि आरोग्य सुधारल्यामुळे आपल्या आयुष्यातील आनंदाचा तडकाही वाढू शकेल.

हे लक्षात ठेवलेलं बरं.
* व्यायाम आपण आपल्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी करतोय ही गोष्ट आधी लक्षात असू द्या.
*व्यायाम म्हणजे कोणाशी स्पर्धा नाही.
*व्यायामाचं आपलं ध्येय आधी निश्चित करा. त्यानुसार काय, किती, कोणता आणि कसा व्यायाम करायचा हे ठरवता येऊ शकतं.
* कुठल्याही परिस्थितीत प्रशिक्षित ट्रेनरकडूनच व्यायाम शिकायला हवा.
* व्यायाम ही नुसतं ‘पाहून’ करायची गोष्ट नाही. अमुक एक जण जो व्यायाम करतो, तो आपल्याला सूट होईलच आणि तसाच रिझल्ट आपल्यालाही मिळेल, असं नाही.
* जिममधला किंवा अगदी मैदानावर जर तुम्ही पळत असाल, तिथे तुम्हाला कोणी ट्रेनिंग देत असेल तर तो ‘ट्रेनर’ त्या क्षेत्रातलं किती ‘शिकला’ आहे, त्याची पात्रता काय, याची खात्री करायलाच हवी. अमुक एकाची बॉडी चांगली आहे, म्हणजे त्याला सगळं कळतं असं अजिबात नाही. 
* अनेक जिममध्ये ‘बॉडीबिल्डर’ दिसणारे जे ट्रेनर दिसतात, बर्‍याचदा ते ट्रेनर नसतातच. त्यांची बॉडी दिसायला चांगली आहे, येणार्‍या ‘कस्टमर्स’वर त्यांचं इम्प्रेशन पडावं यासाठी त्यांना ट्रेनर म्हणून नेमलं जातं. असे ट्रेनर बर्‍याचदा सर्वाधिक घातक ठरतात. त्याचं शास्रीय नॉलेज किती हे तपासूनच आपण स्वतर्‍ला कोणत्याही ट्रेनरच्या हवाली केलं पाहिजे.
* आपल्याला कुठला आजार असेल, काही दुखापती झालेल्या असतील तर त्यानुसार आपला व्यायाम आणि त्याच्या पद्धतीही बदलतात. 
* गरजेशिवाय जास्त प्रमाणात सप्लिमेण्ट्स खाणं धोकादायक ठरू शकतं. दणकून ‘कमिशन’ मिळतं म्हणून काही जिममध्ये, जिममधला ट्रेनर तुम्हाला सप्लिमेंट्सचं व्यसन लावू शकतो.
* सप्लिमेंट्स घेणं चूक आहे, असं नव्हे; पण आपला व्यायाम, आपल्या शरीरातली अमुक गोष्टींची कमतरता आणि त्यांची गरज या गोष्टी त्यासाठी अत्याधिक महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी त्यातील तज्ज्ञ व्यक्तींचाच सल्ला घ्यायला हवा.
* व्यायाम सुरू करण्याच्या आधी वॉर्मअप, स्ट्रेचिंग, कूलडाउन या गोष्टींचाही तुमच्या आरोग्यात खूप मोठा वाटा असतो. 
* आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारे अत्याचार आणि जबरदस्ती करू नका.
* व्यायाम झाल्यानंतर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, नाहीतर आपलं काहीतरी चुकतं आहे, हे नक्की लक्षात घ्या.
* एकाच दिवशी कार्डिओ, वेट ट्रेनिंग असले प्रकार शक्यतो करू नका. 
* उपाशीपोटी व्यायाम करणं घातक आहे. व्यायामाआधी शक्यतो थोडं खाल्लेलं असलं पाहिजे. 
* व्यायामाची वेळ पाळा आणि व्यायामातही सातत्य ठेवा आणि आरोग्यपूर्ण आहाराकडे लक्ष द्या. त्याचा फायदा दिसेलच दिसेल. 
* जशी लाइफस्टाइल, त्याप्रमाणे व्यायामाला सुरुवात करावी. आपल्या ट्रेनरलाही ते माहीत हवं. 
* व्यायामाचं एक शास्रशुद्ध टेक्निक, तंत्र असतं. आपल्याला ते माहीतच हवं; पण यू-टय़ूबवरचे व्हिडीओ पाहून नव्हे, तर त्यातलं शास्त्र आत्मसात करून. 

 

Web Title: Over Exercise, why it is so dangerous?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.