नीट आणि जेईई- परीक्षा लांबणीवर , विद्यार्थांचं काय होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 15:18 IST2020-07-09T15:16:24+5:302020-07-09T15:18:14+5:30
नीट आणि जेईई या परीक्षा सप्टेंबर्पयत पुढे ढकलण्यात आल्या. जी मुलं गेलं दीड वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ या परीक्षांचा अभ्यास करत आहेत, ते हताश झालेत. पण तसं करून कसं चालेल?

नीट आणि जेईई- परीक्षा लांबणीवर , विद्यार्थांचं काय होणार ?
- धर्मराज हल्लाळे
सलग 21 महिने एकच अभ्यासक्रम. एकाच परीक्षेची तयारी करत राहणं हे अनेक मुलांना कंटाळवाणं झालंय.
ही मुलं थकली आहेत. चिडचिड होते आहे, तेही स्वाभाविक आहे. राग तरी कोणावर धरावा?
बहुतांश ठिकाणी अकरावीचे वर्ग डिसेंबरमध्येच संपतात. लगेचच बारावीची तयारी सुरू होते. गेल्या वर्षारंभाला बारावीत दाखल होणा:या विद्याथ्र्यानी विचार केला असेल की, आपण मे महिन्यात परीक्षा देऊन एका कठीण तपश्चर्येतून मुक्त होऊ !
परंतु, कोरोनानं जगभरात जनजीवन ढवळून निघालं. त्यात देशातील सर्वात मोठी परीक्षा, अर्थात 15 लाखांवर विद्याथ्र्याचं भवितव्य अवलंबून असलेली परीक्षा, नीटची तयारी. कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यानं नीट आणि जेईई या दोन्ही परीक्षा जुलैमध्ये घेण्याचं ठरलं. परंतु, स्थिती नियंत्नणात नाही, त्यात परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्याची संख्या मोठी म्हणून दोन्ही परीक्षा आता सप्टेंबरपर्यंत पुढं गेल्या.
या परीक्षांच्या तारखा सतत बदलत गेल्या. परीक्षा लांबणीवरही पडली.
जानेवारी 2019 पासून आजवर जे या परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांनी अभ्यास तरी किती करायचा?
विद्याथ्र्याची मन:स्थिती बिघडत चालली आहे, आता अभ्यास नकोसा झालाय. साचलेपण आलंय. अभ्यासक्रम पूर्ण वाचून झाला, उजळणीही झाली. चाचणी परीक्षा झाल्या, त्या तरी किती द्यायच्या? शिक्षकांनाही प्रश्न पडलाय, सराव परीक्षांसाठीचा प्रश्नसंच संपलाय. अनेकांना अभ्यास अजीर्ण झालाय. अक्षरावरून डोळे फिरविणं सुरू आहे. पालकही हैराण झालेत. मुलांची क्षमता कशी टिकवून ठेवायची हा प्रत्येकासमोर प्रश्न आहे.
त्यात काहीजण असेही आहेत की ज्यांनी नीट, जेईई गेल्यावर्षी दिली, मात्न अधिक गुण मिळवून उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी पुन्हा परीक्षेचा निर्णय घेतला. रीपीट करायचं ठरवलं.
त्यांची परिस्थिती अजून बिकट आहे. मुलं प्रदीर्घ काळ अभ्यास करत आहेत, त्यांचा ताणही वाढला आहे. पालकही धास्तावले आहेत.
आता यावर प्रश्न असा की, हे सारं असं आहे तर करायचं काय?
* एक गोष्ट विद्यार्थी आणि पालकांनी समजून घेतलं पाहिजे, आजची परिस्थिती असाधारण आहे. सगळ्यांसाठी, जगभरच हे संकट आहे.
आपल्या एकटय़ाच्या वाटेलाच हे संकट आलेलं नाही. तर हा परीक्षा आणि अभ्यासाचा ताण देशभरातील 15 लाख विद्याथ्र्याना सहन करावा लागणार आहे.
* सगळे एकाच नावेतील प्रवासी आहोत. त्यामुळं धीरानं सामोर गेलं पाहिजे, आहे ती परिस्थिती तूर्तास स्वीकारली पाहिजे.
* आजवर जे आव्हान पेललं, अभ्यास केला, ताणावर मात केली तसं आणखी तीन महिने आपल्याला संयम टिकवायचा आहे.
* ज्यांचा अभ्यास अपुरा होता, त्यांना वाढलेला वेळ लाभदायी आहे. त्यांनी त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा.
* ज्यांचा अभ्यास झाला आहे, ज्यांना परीक्षा लगेच द्यायची होती, त्यांनीही थोडा ब्रेक मिळाला म्हणत थोडी विश्रंती, थोडा विरंगुळा, दीनचर्येत काहीसा बदल करून जरा ताणमुक्त व्हावं. मग पुन्हा नव्या दमानं अभ्यासाला लागता येईल.
* पालकांनी खंबीर होऊन मुलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आजच्या स्थितीत कोरोनामुक्त जीवन, आपला जीव अधिक मोलाच आहे.
* वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजे आयुष्याचं अंतिम ध्येय नाही. तूर्त एक मोकळा श्वास घ्या. घुसमट थांबेल.
कविवर्य सुरेश भट म्हणतात ते लक्षात ठेवू.
हे असे आहे तरी पण,
हे असे असणार नाही..
दिवस अमुचा येत आहे..
तो घरी बसणार नाही..