सोमवारचा पाऊस म्हणजे खरी जिंदगी...
By Admin | Updated: July 21, 2016 12:46 IST2016-07-21T12:27:56+5:302016-07-21T12:46:17+5:30
शनिवार रात्रीपासूनच धो-धो पाऊस सुरू झाला होता. रविवार उजाडला तोच ओला ओला. सुट्टीच्या दिवशी असा गच्चं पाऊस म्हणजे चिंगाट, बुंगाट, झिंगाटकरांची आयतीच सोय.

सोमवारचा पाऊस म्हणजे खरी जिंदगी...
शनिवार रात्रीपासूनच धो-धो पाऊस सुरू झाला होता. रविवार उजाडला तोच ओला ओला. सुट्टीच्या दिवशी असा गच्चं पाऊस म्हणजे चिंगाट, बुंगाट, झिंगाटकरांची आयतीच सोय. तर मंडळी, दिवसभर उतमात करून, पावसात भिजून, पुराच्या पाण्यात सेल्फी काढून, चिलींग इन रेन असा म्हणत त्र्यंबकेश्वर, आणखी कुठे कुठे पाऊ स्थळी जाऊन, घाटात, नी धबधब्यातपर्यंत जाऊन पुन्हा स्वत:च्याच थोबडयाचे फोटो काढून, नवरे-बायका-पोरांचं लटाम्बर सजवून धजवून पोळ्याच्या बैलासारखं मिरवून आणून, चोरीमारीच्या फुटकळ कविता आपल्या नावे फेसबुकवर खपवून, आख्या जगाला पार वात आणून, आणि अशा प्रकारे रविवार सत्कारणी लावून तुम्ही घरी येता. आल्या आल्या गिझर सोडून भरपूर पाण्यात सैराट अंघोळ करता ( हो पालिकेने पाणी कपात रद्द केल्याची बातमी तुमच्या पर्यंत पोचलेली असते). दिवसभराच्या अरबट चरबट खाण्याने (किंवा पिण्याने) पोट फुगलेलं असतं त्यामुळे नुसती खिचडी किंवा दूध (किंवा काही ज्याच्या त्याच्या कुवती नुसार) खाऊन/पिऊन तुम्ही गोधडी ओढून बसता. बॅकग्राउंडला पावसाचा एक लयीतला आवाज. जणू काही अंगाईच ! ते ऐकता ऐकता नॉस्टेल्जिक, इमोशनल वगैरे वगैरे होण्याचा प्रयत्न तुम्ही करता. तेही जमत नाही म्हटल्यावर गेलं खड्यात म्हणून सरळ घोरायला लागता. अजून काय हवं आयुष्यात? अ सण्डे वेल स्पेण्ट. सोमवार सकाळ. कालच्या पराक्र मामुळे डोळे उघडायला तयार नसतात. आॅफिसला उशीर. भाजी-बीजी, लाउंडरी-बिउंडरी असली आठवडी काम केली नसल्यामुळे खाने को निवाला नही, पहनेको कपडा नही असली अवस्था. तश्याच आंबलेल्या अंगाने अंघोळीची गोळी घेऊन ( काल जेवढ्या पाण्यात उड्या मारल्या तेवढ्यात महिनाभराची अंघोळ सहज होऊन जाईल.) भकाभक परफ्युम उडवून घराचा ओला दरवाजा उघडता आणि बाहेर पाऊस! नुसता पाऊस. कालचा ओला रेनकोट पण सुकला नाही अजून. आता तो घातला तर पावसाआधी तो रेनकोटच चिक-चिक करेल. आता असंच तरफडत भिजत जायच आणि कुडकुडत एसीमध्ये आठ तास काम करायचं. ते रविवारचा पाऊस, गम्मत, गाणी ठीकाय हो पण सोमवारचा पाऊस म्हणजे खरी जिंदगी. म्हणा आता.. फिर वही बारिश, फिर वही इष्क, फिर वही तुम! -अनादी अनंत