Meet the 555km marathon runner from Pune | भेटा साडेपाच दिवसात 555 किलोमीटर मॅरेथॉन धावणार्‍या पुणेकराला!

भेटा साडेपाच दिवसात 555 किलोमीटर मॅरेथॉन धावणार्‍या पुणेकराला!

ठळक मुद्देहिमालय आपल्याला हाका मारतो मग थांबणं कठीण होतं. 

- आशिष कासोदेकर

आयुष्यात काहीतरी साहस हवं. नेहेमी नवीन आव्हान हवं तर मग मजा येते. मी अशी काही माणसं नेहेमीच बघतो जी म्हणतात, ‘अरे मी पूर्वी क्रिकेट छान खेळायचो’,  ‘पळण्यात माझा हात कोण धरायचा नाही’. या आठवणी छानच. पण या आठवणी का? जे आवडत होतं, छान जमत होतं ते वास्तवात का नाही? का आपण आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर आलो की आपल्यातलं काहीतरी वेगळं, आपल्याला खूप आवडणारं मागे ठेवून देतो? नुसते आठवणींचे उमाळे काढून काय साध्य होणार आहे?
2011 पासून मी सांघिक खेळाकडून वैयक्तिक खेळाकडे वळलो. अर्थात खेळ हे माझं करिअर नव्हतं. माझा ट्रॅव्हल कन्सलटंटचा व्यवसाय सांभाळून मी हे करत होतो. वैयक्तिक खेळातूनच मी स्वतर्‍ला आव्हान देण्याची सवय स्वतर्‍ला लावून घेतली. 2013 मध्ये  ‘पाहू पळून ’ म्हणून 15 कि.मी पळालो. मग मी रोजच पळू लागलो. मला पळायला आवडू लागलं. पळणं सवयीचं व्हायला लागलं आणि मग माझं मन स्वतर्‍ला आव्हान देण्यासाठी, वेगळं करण्यासाठी ढुशा देऊ लागलं. मग मी 42 कि.मी. पळालो तेही लडाखमध्ये. ती माझी पहिली मॅरेथॉन. अनेकजणांनी विचारलं पहिल्या मॅरेथॉनसाठी थेट लडाखसारखा अवघड भाग का निवडला? -  उत्तर एकच. वेगळं काहीतरी नवीन करायचं होतं मला. मग दक्षिण आफ्रिकेत 90 कि.मी. मॅरेथॉन पळालो. तेव्हा वाटलं आपल्यातली क्षमता वाढते आहे. आता जे जमतं आहे त्यापेक्षा जास्त काहीतरी करायला हवं. म्हणून मी 111 कि.मी.च्या मॅरेथॉनसाठी रजिस्ट्रेशन केलं. तेही जमलं. मग 333 कि.मी.ची मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. अवघड होतं; पण ते जमलं. तोर्पयत हाय अ‍ॅल्टिटय़ूड (अति उंचावरून) अल्ट्रा मॅरेथॉन 333 कि.मी.र्पयत होता. ही मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर मला 555 किमी अल्ट्रा मॅरेथॉन जी ऑगस्ट 2019 मध्ये होणार होती तिच्याविषयी कळलं. हा इव्हेण्ट पहिल्यांदाच होणार होता. माझं मन हे आव्हान स्वीकारायला तयार होत होतं. पण घरच्यांना, मित्रमंडळींना हे थोडं अतिसाहसाचं आणि जोखमीचं वाटत होतं. मी बराच काळ रजिस्ट्रेशन करायचं टाळलं होतं. पण माझं मन मला शांत बसू देत नव्हतं. अल्ट्रा मॅरेथॉन 555 किमीचा हा पहिला इव्हेण्ट होणार आहे. आपण भाग घेतला नाही आणि हा इव्हेण्ट होऊन गेला तर मग मात्र माझी खूप चिडचिड होणार होती. म्हणून मग करून टाकलं रजिस्ट्रेशन.
मी तयारीला लागलो. आठ महिने कसून तयारी केली. सकाळी माझा व्यवसाय सांभाळायचो आणि संध्याकाळी, रात्री चालायचो. पळायचो. या आठ महिन्यात मी रोज केवळ मध्यरात्री 2 ते 6 एवढे चारच तास झोपायचो. एवढीच झोप घेणं हाही माझ्या सरावाचाच भाग होता. कारण प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये पळताना झोपेवर कंट्रोल असणं गरजेचं होतं. महिन्यातून एकदा मी 100 कि.मी पळायचो. एकटाच जायचो. रात्री सुरुवात करायचो. खरं तर मॅरेथॉनचा सराव पहाटे लवकर सुरू करायचा असतो. कारण ऊन कमी असतं. मी मात्र भरदुपारीही मॅरेथॉनचा सराव केला. ज्या ज्या विचित्र परिस्थितीमुळे आपली चिडचिड होते ती परिस्थिती सवयीची होण्यासाठी मी माझ्या सरावाचं हे तंत्र निवडलं होतं. माझं शरीर तयार होत होतं. मनाचा निग्रहही ठाम होत होता. एक महिना मी लेहमध्ये राहिलो. उंचावर राहाण्याचा अनुभव घेऊन बघितला. 
अशा प्रकारच्या मॅरेथॉनसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी जितकी महत्त्वाची असते तितकीच तिथल्या परिस्थितीचा, येऊ शकणार्‍या आव्हानांचा विचार करून तशीही मनाची तयारी ठेवावी लागते. खरं तर ऑगस्टमध्ये लेह लडाखमध्ये बर्फवृष्टी होत नसते. इथे मात्र मॅरेथॉनच्या पहिल्या पायरीवरच (खारदुंगला गावात) पाऊस सुरू झाला होता. वातावरण खराब झालं होतं. आम्ही जसजसं वरती जाऊ लागलो तसं पावसाचं रूपांतर बर्फवृष्टीमध्ये झालं. ऑगस्टमध्ये बर्फवृष्टी हे इथे पहिल्यांदाच होत होती. मला याचा अंदाज नव्हता. पण म्हणून माझं काही अडलं नाही. मुळात आव्हानांसाठी मन तयार झालेलं असलं की अवघड आव्हानाला भिडण्यासाठी मन आपोआपच स्वतर्‍ला मॅनेज करतं.
मला 333 किमीमुळे मोठय़ा मॅरेथॉनमध्ये धावायची सवय होती. पण इतर मॅरेथॉन आणि हिमालयातली समुद्रसपाटीपासून 17,400 फुटांपेक्षा जास्त उंचावरची ही मॅरेथॉन वेगळी होती. हिमालय हेच मोठं आव्हान होतं. या आव्हानाचेही पाच टप्पे होते. एवढय़ा उंचावर असलेला ऑक्सिजनचा अभाव हा पहिला टप्पा. फक्त 50 टक्केच ऑक्सिजन होता. बाकी चार टप्पेही अवघड होते कारण वातावरण आणि चढउतार.
या संपूर्ण मॅरेथॉनमध्ये मी ‘पॉझिटिव्ह’च राहिलो. जेव्हा आम्ही मॅरेथॉन सुरू करण्यासाठी गावात पोहोचलो तेव्हाच पाऊस सुरू झाला. इतर लोकांचा मूडच गेला. आता पुढे शक्य नाही असं काहीजण म्हणत होते. त्यांनी मलाही विचारलं आता काय? मी म्हणालो की, ‘धावायचं. मी पळणार आहे. मॅरेथॉन पूर्ण करणार आहे. छान वातावरण आहे हे. मी एन्जॉय करतो आहे हे.’ माझं बोलणं ऐकून उदास झालेल्या माणसांनाही ऊर्जा मिळाली. त्यांच्यातही उत्साह संचारला. मी सकारात्म्क होतो म्हणूनच ध्येय गाठू शकलो.
प्रत्येक मॅरेथॉननं मला काही ना काही शिकवलं. हिमालयातल्या या मॅरेथॉननं मला आपण मनाचा खूप जास्त वापर करायला हवा याची जाणीव दिली. खरं तर हिमालयाच्या सहवासात असताना हा हिमालयच आपल्याला खूप काही शिकवत असतो. इथे वेगवेगळ्या लोकांना भेटता येतं. वेगवेगळ्या देशातले अ‍ॅथेलिट भेटतात. त्यांच्याशी बोलायला भेटतं. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. भेटणारा प्रत्येकजण प्रेरणा देत राहातो. हिमालय आपल्याला हाका मारतो मग थांबणं कठीण होतं. 
आता पुढे काय?
माझ्यासमोरही प्रश्न आहेच, एक आव्हान संपलं आता मी आणखी एका आव्हानाच्या शोधात आहे.

*********

साहसी मॅरेथॉनसाठी वेड नाही, तयारी हवी !

अवघड मॅरेथॉनमध्ये सहभागी होणं हे साहस असतं. त्यासाठी पळण्याची सवय, आवड आणि वेड या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात. केवळ आलं डोक्यात आणि घेतला सहभाग असं होत नाही. मॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी मेथडप्रमाणे पळणं गरजेचं असतं. सरावादरम्यान पळण्याआधीही वॉर्म अप, स्ट्रेचिंग हे उत्तम होणं गरजेचं आहे. भलेही सरावात कमी पळा; पण या दोन्ही गोष्टी छान जमल्याच पाहिजे.
आवड म्हणून मॅरेथॉन पळणं आणि पॅशन म्हणून अवघड मॅरेथॉनचे आव्हान स्वीकारणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे आपण पळण्याचा सराव करताना आधी पळणं  ही आपली आवड आहे की पॅशन. हे तपासून पाहावं. आणि पॅशन असेल तर मॅरेथॉनचे ध्येय निश्चित करून तंत्रशुद्ध सराव करणं गरजेचं आहे. एक एक टप्पा पार करत स्वतर्‍ला आव्हान द्यावं. आणि मग हे आव्हान पेलण्यासाठी शरीर आणि मन पक्क करावं.

 

एकाच्या स्वप्नाचे हजारो भागीदार

या मॅरेथॉनमध्ये मी स्वतर्‍च्या सोबत होतो. स्वतर्‍ची सोबत ही सुंदर गोष्ट आहे. पण या मॅरेथॉनची आणखी एक ‘ब्यूटी’ होती. अल्ट्रा मॅरेथॉन 555 किमी पूर्ण करणं  हे माझं एकटय़ाचं स्वप्न होतं. पण ते जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्यात हजारोजण सहभागी झालेले होते. माझ्या सोबत मला धावण्यादरम्यान मदत करणारा माझा सहा जणांचा ग्रुप, माझ्या मित्रांनी माझ्या या मोहिमेची माहिती देणारा  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपद्वारे हजारोजण माझ्या या धावण्याच्या प्रवासाकडे लक्ष ठेवून होते. मला आर्थिक मदत करणारेही माझं ध्येय पूर्ण होण्याची वाट पाहात होते. एकाच्या स्वप्नामध्ये एवढे भागीदार असण्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला होता. 


(मुलाखत आणि शब्दांकन - माधुरी पेठकर)

Web Title: Meet the 555km marathon runner from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.