हाय का रिस्पॉन्स? कोल्हापुरी प्रेमाचा ठसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 05:31 PM2020-02-20T17:31:05+5:302020-02-20T17:31:43+5:30

कोल्हापूरचं सगळं कसं एकदम झोकात असतं. एका घावात दोन तुकडं. खटक्यॉवर बॉट. जाग्यावर पलटी; त्यामुळे एखादी मुलगी आवडली तर म्हणणार, ‘डायरेक्ट विचारतो, माझ्याबरोबर लगीन करणार का? प्रेम हा शब्दही न उच्चारता थेट अंगावर अक्षताच.

life & Love in Metro cities, a report about love in Kolhapur! | हाय का रिस्पॉन्स? कोल्हापुरी प्रेमाचा ठसका!

हाय का रिस्पॉन्स? कोल्हापुरी प्रेमाचा ठसका!

Next
ठळक मुद्देकोल्हापूरच्या प्रेमाचं जगावेगळं रसायन. एकदा हातात हात घेतला तर शेवटर्पयत न सोडणारं..!!

- विश्र्वास पाटील

कोल्हापूरचं सगळं कसं एकदम झोकात असतं. एका घावात दोन तुकडं. खटक्यॉवर बॉट.. जाग्यावर पलटी; त्यामुळे एखादी मुलगी आवडली तर हा पठ्ठय़ा काही दिवस तिच्या मागावर राहणार.. एकदा-दोनदा घरार्पयत जाऊन जरा कौटुंबिक माहिती काढणार.. एखाद्या मैत्रिणीची ओळख काढून थोडा अंदाज घेणार.. आणि थोडं पाखरू हाताला लागतंय म्हटल्यावर थेट कागदाची बारीक घडी करून त्यातून मोबाइल नंबर पोहोच करणार.. एकदा मोबाइल आला की निम्मं काम झालं सोप्पं.. मुलगी विचारणार, का, कशाला फोन करायला सांगितला होतास.?? हा जरा लाजणार.. आढेवेढे घेणार, इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार. ‘बरं हाय ठेवते फोन’ म्हटल्यावर मग हा बहाद्दर थेटच विचारणार, ‘ते नव्हं, काय हाय का रिस्पॉन्स.?? प्रतिसाद आला तर काम फत्ते. नकार आला तर मात्र अहो, राहू दे राहू दे.. आपण फक्त फ्रेण्डशिपमध्ये तर राहू.. अशी विनवणी.. जुळलेली लिंक न तुटू देणारी.!
काही कार्यकर्ते इतके धाडसी की जी मनात बसली आहे, तिला कॉलेजमध्ये, गल्लीच्या कोपर्‍यावर थांबवून थेटच विचारणार, ‘ए लाइन देणार का..?’ त्यास प्रत्युत्तरही तितक्याच दणक्यात, ‘नाही रे भावा, मी एंगेज आहे..!!’
इथल्या मुलीही तशा भारीच! एखादा मुलगा कॉलेजमध्ये फारच मागे मागे करायला लागलाय हे लक्षात येताच ही थेट रस्त्यातच थांबून त्याला चॅलेंज करणार. हाय का तुझ्यात हिंमत. तर मग आमच्या वडिलांना येऊन भेट सरळ. माझी आहे तयारी. ज्याला वडिलांना भेटण्याची हिंमत असते ते पुढे जातात अन्यथा इतर मग नको रे बाबा तिच्या नादाला लागायला म्हणून तिथेच मनाला ब्रेक मारतात.
कोल्हापूरची महाराष्ट्राला ओळख पुरोगामी अशी असली तरी प्रेमाबद्दल तसं निकोप वातावरण अजूनही या शहरात दिसत नाही. कुठे कोपर्‍यावर एखादी मुलगा-मुलगी बोलत थांबली असली तर जाणारे-येणारे मान मोडेर्पयत वळून बघणार.. ‘असंल काहीतरी लडतर’ अशी कॉमेंटही ठरलेली. या शहराचा स्वभाव काहीसा सरंजामदारी. त्यामुळे मुला-मुलींनी आपल्याला न विचारता काही केलेलं लोकांना आवडत नाही. हल्लीहल्ली प्रेमविवाहांचं प्रमाण वाढतंय. राज्यात व देशातही एकतर्फी प्रेमातून मुलींना जाळून मारण्याच्या घटना घडल्या असल्या तरी कोल्हापूरचा अनुभव त्याबाबत फारच वेगळा आहे. इथला तरुण एखाद्या मुलीच्या फार मनापासून मागे लागणार. ती आपली व्हावी यासाठी जे काही करावे लागते ते नक्की करणार; परंतु त्यातूनही जर तिच्याकडून नकारच आला तर देणार नाद सोडून. गेलीस उडत, बघू दुसरी, अशीही मनाची समजूत घालून तो तिच्या मार्गातून बाजूला होणार. पुन्हा तिला त्रास देणे, तिच्या मार्गात अडचणी निर्माण करणं हे त्याच्या रक्तात नाही. प्रेमासाठी जिच्याकडे हात पसरला तिच्याच लग्नात हौसेने पंगती वाढणारेही काही बहाद्दर आहेत.
बरं. कोल्हापूरचे प्रेम असे मनाचा मोठेपणा दाखविणारे आहे. त्याला जबाबदारीची नक्कीच जाणीव आहे. एकमेकांना समजून घेण्याची त्याला सवय आहे. कोण प्रेमविवाह करतंय म्हटल्यावर तर कोल्हापूरकरांना मदतीला धावून जाण्याची भारी हौस.. लग्न करून त्यांचा संसार सुरळीत होईर्पयत मोठा आधार देणार.
कोल्हापुरात एक काळ असा होता की, खासबाग हॉटेलमधील मिसळ खाणे हा प्रेमीयुगुलांचा खास कार्यक्रम असे. तिथे अनेकांची लग्ने ठरल्याच्याही आठवणी सांगतात; परंतु आता मिसळपेक्षा फास्टफुड, कॉफी शॉप, डीवायपी सिटीमधील मॉल, कोल्ड्रिंक हाऊस आणि मॅकडीत या भेटीगाठी होतात. प्रेमवीरांना भेटण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कोल्हापूरचा रंकाळा. त्याच्या कट्टय़ावर कित्येकांचे प्रेम जुळले, फुलले. परंतु आता तिथेही वर्दळ वाढल्याने थोडासा निवांतपणा मिळवण्यासाठी पन्हाळ्यावर जाण्याची क्रेझ. तोंडाला स्कार्फ बांधून बाइकवरून प्रियकराला बिलगून बसून जाणार्‍या बाइकची रांग अनेकदा शिवाजी पुलावरून दिसते. कोल्हापुरातील ज्या गल्लीत लोकांची वर्दळ कमी आहे, तिथेही गाडी मधल्या स्टॅण्डवर लावून बिलगून उभी राहिलेले दोघे दिसतात. कोल्हापूरच्या प्रेमाला स्वतर्‍वरील जबाबदारीचीही जाणीव आहे. स्वतर्‍च्या पायावर उभे राहण्याची, स्वतर्‍ला सिद्ध करण्याची धडपड त्याच्या प्रेमाला बळ देणारी आहे. तर हे असे आहे कोल्हापूरच्या प्रेमाचं जगावेगळं रसायन. एकदा हातात हात घेतला तर शेवटर्पयत न सोडणारं..!!


(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे मुख्य बातमीदार आहेत.)
 

Web Title: life & Love in Metro cities, a report about love in Kolhapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.