केवडा...तरुण नातवाला आजीचं जग उलगडतं तेव्हाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 06:09 PM2018-02-21T18:09:29+5:302018-02-22T08:43:48+5:30

आजी आणि नातवाचं जग एकमेकांहून किती वेगळं; पण तरुण नातवाला आजीचं जग उलगडतं तेव्हाची गोष्ट.

Kavda ... the story of young dancer when the world of grandmother unfolds | केवडा...तरुण नातवाला आजीचं जग उलगडतं तेव्हाची गोष्ट

केवडा...तरुण नातवाला आजीचं जग उलगडतं तेव्हाची गोष्ट

Next

- माधुरी पेठकर

‘मला कोणाचा त्रास नको म्हणून मला वेगळं ठेवलं’ असं म्हणत वृद्धावस्थेतला आपला एकटेपणा आनंदानं आणि समजुतीनं स्वीकारलेली आजी. ही आजी भेटते ती ‘केवडा’ या लघुपटात. एरवी आजी एकटीच घरात राहात असते. अधूनमधून तिचा कॉलेजमध्ये जाणारा नातू रोहित खास तिला भेटायला म्हणून येतो आणि आजीचं एकटं जग बोलकं करून जातो.
‘केवडा’ ही शॉर्ट फिल्म म्हणजे आजी आणि नातवामधला मोकळा संवाद आहे. हे संवाद म्हणजे वर्तमान आणि भूतकाळाचा एक प्रवास आहे. याच संवादातून आजीच्या मनातल्या संदुकीत जपून ठेवलेल्या आठवणी एक एक करून समोर येतात. आजी-न नातवातलं भावनिक नातंही उलगडतात.
आजीला भेटायला आलेला रोहित. तो येतो आणि घरात आल्या आल्या आपलं जग उघडून बसतो. लॅपटॉप उघडून, इंटरनेट सुरू करतो. कानाला इअरफोन लावून रोहित चॅटिंगमध्ये दंग होतो. इकडे नातवाच्या येण्यानं आजी एकदम उत्साहित झालेली असते. आपल्या एकटेपणाचा तिनं काढलेला मजेशीर अर्थ, तिच्याच वयाचं, तिच्या ओळखीचं कोणीतरी गेल्याची खंत ती नातवाला सांगत असते. इकडे रोहित लॅपटॉपकडे पाहत आजीच्या बोलण्याला जमेल तसा प्रतिसाद देत राहातो. आजी आतल्या खोलीत जाऊन एक लोखंडी संदूक घेऊन येते आणि तिही नातवासमोर आपलं जग उघडून बसते. त्या संदुकीतल्या एक एक गोष्टी बाहेर काढत ती त्याबद्दलच्या तिच्या आठवणीही सांगू लागते. लग्नातली साडी, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला नवºयानं दिलेल्या मोत्याच्या कुड्या, नथ असं एक एक करत आजी बाहेर काढते. नातवाला दाखवते. मग थोडा वेळ ते सर्व घालूनही बघते. रोहित चॅटिंग करता करता ते सर्व बघत असतो. साज शृंगार ल्यायलेली आजी बघून तो पटकन तिचा मोबाइलवर फोटोही काढून घेतो. आजी भानावर येत ते सर्व पुन्हा काढून ठेवून देते. त्या संदुकीत मग नवºयानं लिहिलेलं पत्र तिला सापडतं. ते वाचून ती अजूनच हळवी होते. आजोबांच्या आवडीच्या केवड्याच्या अत्तराची बाटली ती रोहितसमोर धरते. रोहितला ती अत्तर उडून गेलेली गंधहीन बाटली भासते; पण आजी मात्र अत्तर उडून गेलेल्या बाटलीतूनही येणाºया मंद वासानं मोहरून जाते. शेवटी तिला संदुकीत तळाशी ठेवलेली कुंची सापडते. ती कुंची आजी छातीला कवटाळते. रोहितला लहानपणीच वारलेल्या त्याच्या काकाबद्दल अर्थात आपल्या पहिल्या बाळाबद्दल आजी सांगते. त्याच्या आजारपणाविषयी, तो गेल्यानंतर झालेल्या भावनिक अवस्थेविषयी कातरलेल्या स्वरात, आवंढा गिळत गिळत सांगत राहाते. रोहित मात्र हो ला हो लावत असतो. एका क्षणी मात्र आजीचा तोल जातो. ती रडते, नातवाच्या हातातल्या यंत्रावर, त्याच्या बेफिकीर वृत्तीवर संतापते; पण रोहित थोडा वेळ का होईना आपलं जग बाजूला सारतो. आजीला जवळ घेत, तिच्या मांडीवर डोकं ठेवून आजीला सावरतो. त्याक्षणी आजीच्या चेहेºयावर हसू फुलवतो. वरवर आपल्या जगात हरवलेला नातू आजीशी भावनिकदृष्ट्या किती जवळ आहे हे ‘केवडा’ हा लघुपट दाखवतो. एरवी आहे ते वास्तव गोड मानून जगणारी आजी नातवाला जाताना ‘येत जा.. माणसं आली की बरं वाटतं’ असं म्हणत निरोप देते. खरं तर हाच निरोप केवडा लघुपटाचा लेखक, दिग्दर्शकही सहज पाहणाºयांच्या हातात देतो..
‘केवडा’ बनवणारे लेखक निर्माता शुभेंदू लळित आणि अमेय बेकनाळकर हे दोघेही लघुपटातल्या रोहितच्याच वयाचे. आधुनिक तंत्रज्ञानात हरवून जाण्याच्या तरुणांसारखेच; पण आपल्या आजी-आजोबांशी त्यांचं नातं घट्टच आहे.
हा लघुपट पाहताना केवडा म्हणजे आजीच्या मनात साठून राहिलेल्या आठवणींचा सुगंध वाटतो. पण शुभेंदू आणि अमेयला मात्र वेगळंच म्हणायचंय. ते म्हणतात, ‘केवड्यातून आम्हाला तरुण नातवंडांवर भाष्य करायचंय. वरवर खडबडीत, काटेरी असणारं केवड्याचं फूल. त्याच्या आत किती सुगंध साठवून असतं. तशीच ही तरुण नातवंडंही. वरवर बेफिकीर दिसतात; पण त्यांच्याही मनात आपल्या आजी-आजोबांविषयी एक हळवा कोपरा असतो. हा हळवा कोपरा म्हणजेच ‘केवडा.’
ज्योती सुभाष आणि आरोह वेलणकर यांच्या अभिनयानं सजलेला हा केवडा भरभरून मायेचा गंध देतो..

हा २० मिनिटांचा लघुपट इथं पाहा..
www.bit.ly/kevada 

Web Title: Kavda ... the story of young dancer when the world of grandmother unfolds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.