नोबेल संकेतस्थळाची सहल : जगभरात किती जणांना आणि कशासाठी मिळालेत नोबेल पुरस्कार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 01:52 PM2017-10-25T13:52:02+5:302017-10-26T09:35:13+5:30

नोबेल पुरस्कार आपल्या देशात किती जणांना मिळालेत, जगभरात किती माणसांना मिळालेत, आणि कशासाठी?

How many people have received Nobel Prize? | नोबेल संकेतस्थळाची सहल : जगभरात किती जणांना आणि कशासाठी मिळालेत नोबेल पुरस्कार?

नोबेल संकेतस्थळाची सहल : जगभरात किती जणांना आणि कशासाठी मिळालेत नोबेल पुरस्कार?

Next

-प्रज्ञा शिदोरे

यावर्षीचे नोबेल पुरस्कार कुणाला मिळाले? असा जीके टाइप्स प्रश्न तुम्हाला कुणी विचारला की पहिले तर काहीच आठवत नाही. अनेकदा नाव तोंडावर असतं; पण ते धड आठवत नाही. अनेकजण तर पाठांतर करतात पुरस्कार मिळाल्यांच्या नावांचं. पण तेही कधीतरी दगा देतंच.
आणि आपल्या लक्षात काय राहतं तर नोबेल हा फार मोठा, जागतिक कीर्तीचा पुरस्कार आहे.  कुणी फार कामात असेल तरी अनेकजण उपरोधानं म्हणतात की, पुरे आता, तुला काय यात नोबेल मिळणार आहे?

पण जे नोबेल पुरस्कार आपल्याला माहिती आहेत, ते नक्की काय आहेत? त्याभोवती एवढं वलय का आहे? नेमके कधी सुरू झाले?
हे सारं समजून घेण्यासाठी एकदा नोबेलची वेबसाइट वाचावी लागेल आणि त्यांनी चालवलेलं यू ट्यूब चॅनलही पाहावंच लागेल.
नोबेल हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील मूलभूत कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रत्येक वर्षी हे पुरस्कार दिले जातात.

स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांसाठी रक्कम ठेवली होती. त्यात ते म्हणतात, ‘‘माझ्याकडील सर्व रक्कम जपली जावी. त्या रकमेवरच्या व्याजाचे  पाच  भाग करावे आणि ते ५  लोकांना दिले जावे. ही मंडळी अशी असावीत की ज्यांनी मानवजातीसाठी, तिच्या जडणघडणीसाठी काही मूलभूत  काम केले आहे, प्रभाव टाकला आहे.’’  त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी डिसेंबर १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले. म्हणजे आता सलग ११७ वर्ष हे पुरस्कार देणे सुरू आहे. हा सगळा इतिहास आपल्या नोबेलच्या त्या संकेतस्थळावर वाचता येऊ शकतो. त्याबरोबरच जर तुम्हाला कोणाला हा पुरस्कार मिळावा असं वाटत असेल, संकेतस्थळावरून तुम्ही नोबेल संस्थेला त्या व्यक्तीविषयी लिहून कळवूही शकता.
जगात सर्वाधिक नोबेल पुरस्कार विजेते कोणत्या देशात आहेत?
- तर अमेरिकेत. त्या खालोखाल ब्रिटन, मग जर्मनी, फ्रान्सला अनुक्रमे हे पुरस्कार मिळाले आहेत? भारतात किती जणांना हा पुरस्कार मिळाला आहे?  आणि ज्यांना मिळाला त्यापैकी कोण भारतात राहत आहेत, की गेले निघून बाहेरच्या देशांमध्ये?
यासा-या प्रश्नांच्या उत्तरासाठी ती वेबसाइट एकदा पहाच.

वाचा- नोबेल पुरस्कारांसाठीचे अधिकृत संकेतस्थळ - www.nobelprize.org


नोबेल चॅनल : नोबेल पुरस्कारांसह एक नोबेल वीक डायलॉग असतो. तो पहायचाय?

दुस-या महायुद्धाच्या काळात जर्मनीतील चार लोकांनी हिटलरच्या भीतीने नोबेल पुरस्कार स्वीकारला नव्हता. त्यानंतर रशियन राज्यक्रांती दरम्यानही रशियन लोकांनी वैचारिक वादामुळे हा पुरस्कार घेणं आपण टाळतो आहे, असे स्पष्ट केलं होतं. आश्चर्याची गोष्ट अशी की, महात्मा गांधींजींना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाही. ते हयात असताना आणि देश पारतंत्र्यात असताना त्यांनी हा स्वीकारला असता किंवा नाही हा वेगळा मुद्दा. पण १९३७, ३८ आणि ३९ साली नॉर्वेमधील एका इसमाने त्यांना या पुरस्कारासाठी नामांकित केले होते. तो मिळाला नाही. पण या संकेतस्थळावर मात्र ‘कधीही पुरस्कार न मिळालेला शांतिदूत’ असं गांधींजींचं वर्णन करण्यात आलं आहे. १० वर्षांपूर्वी म्हणजे २००७ साली लोकाग्रहास्तव नोबेल संस्थेने आपलं यू ट्यूब चॅनल सुरू केलं. या चॅनलवर गेल्या दहा वर्षातल्या सर्व नोबेल पुरस्कार विजेत्यांची भाषणं आपल्याला पाहायला मिळतील. एकेका विषयावर आपलं सारं आयुष्य वाहिलेली ही मंडळी. त्यामुळे हे यू ट्यूब चॅनल म्हणजे आपल्यासाठी ज्ञानाचा खजिनाच आहे !
यावर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळा या चॅनलवर पहाता येइल आणि त्याबरोबरच विजेत्यांची भाषणेही ऐकता येतील. हा पुरस्कार देण्याच्या आधीच्या आठवड्यात दरवर्षी नोबेल संस्थेतर्फे एक किंवा व्याख्यानमाला आयोजित केली जाते. त्याला ते नोबेल वीक डायलॉग असं म्हणतात. यावर्षीचा विषय आहे. ‘आमची पृथ्वी, आपल्या अन्नधान्याचे भविष्य’ असा. हे सारं या चॅनलवर पाहता येईल.
हे ज्ञानग्रहण करताना, आपल्यातलेही काही जण लवकरच या याद्यांमध्ये सामील व्हावे, या याद्या सोडा, आल्फ्रेड नोबेल म्हटल्याप्रमाणे ‘मानवजातीच्या भविष्यावर सकारात्मक प्रभाव टाकेल’ असं मूलभूत संशोधन आपल्या हातून घडेल, असं काही तरी करावं असं मनात आलं तरी फार आहे.

नोबेलचं यू ट्यूब चॅनल -https://www.youtube.com/user/thenobelprize

(pradnya.shidore@gmail.com )

 

Web Title: How many people have received Nobel Prize?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.