Ghost hunt on a sleepy new moon night | आवसेच्या राती भुताचा शोध

आवसेच्या राती भुताचा शोध

ठळक मुद्देअमावास्येची रात्र. काळोख. मुसळधार पाऊस. वारा आणि त्याच रात्री स्मशानात जायचं ठरवलं, तेही भूत पहायला. आणि मग.

स्नेहा मोरे 

दीप अमावास्येच्या अर्थात जिला सगळे गटारीच म्हणतात, त्या अमावास्येच्या रात्री स्मशानात जायचं ठरवलं. वरळीहून रात्री कल्याण गाठणं थोडं कठीण वाटत होतं; पण म्हटलं जमवूयाच. मी स्मशानात जाणार आहे हे घरी सांगितल्यावर काहीसा संमिश्र प्रतिसाद होता. पण मी जाणारच आहे, म्हटल्यावर त्यांनी विरोध केला नाही.
 मग त्यादिवशी लवकर काम आटपून निघायचं ठरवलं; पण पत्रकाराच्या काम आणि वेळेची कधीच निश्चिती नसते. त्यामुळे लवकरच निघायचं म्हटलं की काम वाढतं. काम आटपून कसंबसं साडेआठला ऑफिस सोडलं, वरळीहून भायखळा मग तिथून कल्याण फास्ट असं ठरलं. रात्री साडेअकरा वाजता स्टेशनला पोहोचले, तोर्पयत बस बंद झाल्यामुळे रिक्षा हा पर्याय होता. रस्त्यावर फक्त मी बसले होती ती रिक्षा आणि बरेच कुत्रे एवढीच काय ती हालचाल. त्या सुनसान वाटेवर नाही म्हटलं तरी क्षणभर मनात काहीबाही विचार आलेच. 
बापनाक्याला पोहोचले तर तिथे आरती आणि अंजली माझी वाट पाहत होत्या. मग त्यांच्यासोबत कल्याण-भिवंडी हायवेच्या नांदकर गावातल्या स्मशानाकडे जायला सुरुवात केली. दुतर्फा किर्र अंधार होता, निर्जन रस्ता आणि आम्ही.
साधारण 12 वाजण्याच्या आसपास स्मशानभूमीत पोहोचलो. स्मशानाच्या चहूबाजूंनी हिरवळ होती, दूरदूरवर घरं दिसतं नव्हती. मात्र स्मशानात भूत पहायला आलेले अनेकजण होते. अगदी दुसरीच्या मुलांपासून पन्नाशीच्या आजोबांर्पयत. कुणाच्या चेहर्‍यावर कुतूहल दिसतं होतं, तर काहींच्या चेहर्‍यावर भीतीही. ‘विद्यार्थी भारती संघटने’च्या तरु ण मुला-मुलींनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. स्मशान, भीती, त्याविषयीचे गैरसमज, अंधश्रद्धा हे सारं दूर करणं हा त्यामागचा उद्देश. आयोजनात सहभागी असलेली अक्षरशर्‍ अवघी पंचविशीतील पोरं-पोरी. त्यांच्यातल्या काही मुला-मुलींनी भुतांची भीती मनातून काढण्यासाठी नाटय़ाचं माध्यम अवलंबलं. त्यात कुणी भोंदूबाबा झालं, कुणी हडळ, तर कुणी अंगात आलेलं भूत झालं. या सगळ्यांनी उपस्थितांना आपल्या अभिनयाने घाबरवलं, खिळवून ठेवलं. कुणी अंधारातून आवाज करीत थेट प्रेक्षकांच्या समोर आलं तर कुणी अंधारात प्रेक्षकांमध्येच बसून घाबरवलं. मात्र या नाटय़ाच्या दरम्यान घाबरण्याची मागची मानसिकता, भीतीची कारणं, भोंदूगिरी याविषयी जनजागृती करण्यात आली.  शास्त्रीय गोष्टी सांगण्यात आल्या.
भुता भुता ये ये, आम्ही तुला भेटायला आलोय रे..अशी अक्षरशर्‍ साद घालून भुतांना आमंत्रण देण्यात आलं, रात्र सरत होती. नाटकादरम्यान कुंकू लावलेलं लिंबू कापणं, त्यातला रस पिणं अशा अंधश्रद्धाही कृतीच्या माध्यमातून दूर सारण्यात आल्या. आयोजकांच्या फळीने तरुणाईला घाबरवण्यासाठी संपूर्ण वातावरण निर्मिती केली. त्यात मग चितेच्या ठिकाणी आग लावण्यात आली होती. काही ठिकाणी लाल रंगाने हाताचे छाप काढले होते, तर काही ठिकाणी बुजगावण्याच्या माध्यमातून भीती पेरण्यात येती होती; पण रात्रीच्या दोन-तीन वाजल्यानंतर वातावरण आणखीनच भारलं. अमावास्येची रात्र, सोसाटय़ाचा वारा, मिट्ट काळोख, रातकिडय़ांचा आवाज, मुसळधार पाऊस. या वातावरणानेही भीतीत भर पडत होती. 
मध्यरात्रीनंतर त्या मिट्ट काळाखोत विद्यार्थी भारतीने डिझाइन केलेल्या टास्कने आणखी रंजकता आणली. ट्रेझर हंटप्रमाणे हा टास्क त्यांनी आखला होता. स्मशानाच्या बाजूला असलेल्या पायवाटेने बाण दाखवलेल्या दिशेने आत जायचं आणि शेवटच्या टप्प्यावर ठेवलेल्या चिठ्ठय़ा शोधून त्यातला टास्क पूर्ण करायचा. 
आधीच भुताच्या भेटीसाठी जमलेले सगळे, त्यात आता स्वतर्‍च सहभागी व्हायचं हे ऐकूनच काहींच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटलं, पण भूत आणि भीती दोन्हीवर मात करण्यासाठी हा मार्ग होता. मग उपस्थितांची नावं नोंदवली गेली आणि त्यातल्या काहींची नावं पुकारण्यात आली. त्यांना एकएक करून टर्न होता, टास्कच्या पायवाटेवर चिखल होता, मिट्ट काळोख आणि भुताचा वेश परिधान करणारी मुलं-मुली लपली होती. काही भीती दर्शविणार्‍या आवाजांचे रेकॅर्डही होत्या. मग एकेकाचा नंबर आला. टास्क करायला गेलेल्या पायवाटेवर आवाज ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येत होतं. त्यातील सहभागी झालेले टास्क करताना पडले, धडपडले, काही परतही आले; पण पुन्हा जिद्दीने मागे फिरत टास्क पूर्ण केला. काहींना भूत असण्याची भीती होती, काहींना अंधाराची, काहींना आवाजाची, तर काहींना डोळ्यांची. पण काहींनी धाडसाने सगळे टास्क पूर्ण केले हे विशेष.
एका बाजूला टास्क सुरू असताना दुसर्‍या बाजूला टीम परिवर्तनच्या तरुणांनी प्रबोधन गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारून टाकलं. वातावरणात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. हळूहळू मध्यरात्रही सरली आणि सोबतीने उपस्थितांच्या चेहर्‍यावरची भीतीही. आता या उपस्थितांच्या चेहर्‍यावर वेगळीच चमक दिसू लागली. आपण कशावर तरी मात केल्याचं समाधान होतं होतं. दरम्यान उपस्थितांमधीलही काही जणांनी आपल्या कविता, अनुभव सादर केले. यातच मैत्रकुल संस्थेचे किशोर जगताप यांनीही साध्यासोप्या पण भिडणार्‍या शब्दांत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, अंधश्रद्धेला बळी न जाणे हे तरु णाईसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे भूत, आत्मा वगैरे काही नसतं, हे कायम लक्षात ठेवा. 
एकीकडे आपण चांद्रयान मोहीम पार पाडली, तरीही दुसरीकडे अजूनही त्याच चंद्राविषयी अंधश्रद्धाही पाळतो आहोत. हे बदललं पाहिजे, अमावास्या, पौर्णिमा, भीती, भूत हे सारं बाजूला केलं पाहिजे असं विद्यार्थी भारतीची मुंबई विद्यापीठ अध्यक्ष आणि उपक्रमाची आयोजक आरती गुप्ता हिने सांगितलं. 
या सार्‍यात रात्र सरली, पहाट झाली. आणि मनातल्या भीतीवर मात करून आम्हीही घरोघरी परतलो. 


( स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत आरोग्य वार्ताहर आहे.)
 

Web Title: Ghost hunt on a sleepy new moon night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.