- स्नेहा मोरे
कुणी घरात एकटंच गिरक्या घेतंय, ताल धरतंय, मस्त आपल्याच धुंदीत गरबा करतंय, असं दिसलं तर दचकू नका.भाई, जमाना ऑनलाइन का है! कोरोनाकाळात जर शिक्षणापासून कामार्पयत अनेक गोष्टी ऑनलाइन गेल्या तर मग सण-उत्सवांनीच का म्हणून मागे राहावं. त्यात नवरात्र म्हटलं की गरबा-दांडिया आलंच.एरव्ही तर कार्पोरेट टीम बिल्डिंगचे एफर्ट म्हणूनही गरबा क्लासेसला अनेकजण जायचे. स्ट्रेस बस्टर वगैरे लेबल लावून बाकायदा गरबा शिकायला तरुण कर्मचारी जायचे. काही तर हौशीने ठरवून गरबा शिकायचे.पण यंदा काय? यंदा तर सारं ठप्प.पण म्हटलं ना जमाना ऑनलाइनचा आहे. विपरीत परिस्थितीवर मात करत दांडिया, गरब्याचेही ऑनलाइन क्लासेस दणक्यात सुरूआहेत. ज्यांना गरबा शिकायचा ते शिकणार, ऑनलाइन एकत्र येऊन नवरात्रत गरबा करणारही. या नव्या ट्रेण्डचंच तर नाव आहे, गरबा होम.यंदा गुगल मीटपासून ते अगदी झूम कॉलवरही गरबा क्लासेस भरूलागलेत.अगदी लहान मुलांपासून ते तरुण-तरुणी ते काही उत्साही आजी-आजोबाही घरबसल्या गरबा शिकत आहेत.खास पारंपरिक दांडिया आणि गरबा शिकवणा-या क्लासेसला बंदची पाटी लावायची वेळ निदान मोठय़ा शहरांत तरी आलेली नाही.नवरात्रोत्सवापूर्वी 15 दिवस हे गराबा क्लास सुरूहोतात. त्यांच्या बॅच असतात. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा बेसिक कोर्स, त्यानंतर पाच दिवसांचा अँडव्हान्स कोर्स, वीकेंड बॅच यासारखे प्रकारही असतात. खासकरून आयटीतील तरु ण-तरु णींची वीकेंड बॅचला गर्दी होते, असे ‘अभिव्यक्ती गरबा ग्रुप’च्या रेखा भानुशाली यांनी सांगितले.
गणोशोत्सवाप्रमाणेच गरब्याची क्रेझ परदेशी नागरिकांमध्येही दिसून येते. मुंबईत एक वर्षासाठी कामानिमित्ताने आलेल्या फ्रिडोलीन या जर्मन तरुणालाही गरबा शिकावासा वाटला. तो सध्या ‘अभिव्यक्ती’ ग्रुपमध्ये गरबा शिकत आहे. मुंबईच्या बोरिवली कोराकेंद्र येथे होणा-या गरबा नाइटमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती; परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे हे शक्य नसल्याने काहीतरी हटके करायचा प्लान आहे असं तो सांगतो.गरबा, दांडिया, रोषणाई, डीजे हे सारं नेहमीचं यंदा नसेल; पण तरीही अनेकांनी घरीच मस्त नटूनथटून ग्रुपने ऑनलाइन गरबा नृत्यात सहभाग घेतला आहेच.या मंद काळातही अनेकांच्या आयुष्यात गरबा असा उत्साही ऑनलाइन ताल धरणार आहेच. ए हालो. अशी हाक देत उत्साहाची गिरकी घरातही घ्यावीशी वाटणं, या उमेदीची तर या काळातही गरज आहे.
( स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)
moresneha305@gmail.com