लॉकडाऊनच्या काळात होतेय धडपड ‘क्वीन’ मिळवण्याची; घराघरांत रंगतोय कॅरमचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:19 AM2020-03-30T04:19:58+5:302020-03-30T06:14:53+5:30

सर्वसामान्यांसह सेलिब्रेटींचे परिवारही गुंतले खेळामध्ये

During the lockdown, the push was to get 'The Queen'; Carrom's left in the house | लॉकडाऊनच्या काळात होतेय धडपड ‘क्वीन’ मिळवण्याची; घराघरांत रंगतोय कॅरमचा डाव

लॉकडाऊनच्या काळात होतेय धडपड ‘क्वीन’ मिळवण्याची; घराघरांत रंगतोय कॅरमचा डाव

Next

- रोहित नाईक

मुंबई : सध्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश थांबला असून प्रत्येक नागरिक आपापल्या घरी थांबला आहे. केवळ अत्यावश्यक काळातच घराबाहेर पडण्याची मुभा असल्याने प्रत्येकजण आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. आता गप्पा तरी किती मारणार, टीव्ही किती बघणार, इंटरनेटवर किती वेळ घालवणार.. कंटाळा येणारच. घराबाहेर जाता येत नसल्याने कोणता खेळही खेळता येत नसल्याने सर्वच जण निराश झाले आहेत. मात्र, या लॉकडाऊनचा खेळ बहुतेकांना आधार दिला आहे तो ‘कॅरम’ने. अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटीही आपल्या परिवारासह कॅरम खेळण्याचा आनंद घेत आहेत.

ज्यांना खेळाची आवड आहे, ती प्रत्येक व्यक्ती आज कॅरम खेळत आहेत. बहुतेकांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरही परिवारासोबत कॅरम खेळतानाचे फोटो पाहण्यास मिळतात. त्यामुळेच लॉकडाऊनच्या निमित्ताने का होईना, आज कॅरमला चांगलीच लोकप्रियता मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आज कॅरम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याने या खेळामध्ये मोठ्या संधीही उपलब्ध आहेत. यानिमित्तानेच महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष अरुण केदार यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

केदार म्हणाले की, ‘पूर्वीपासूनच कॅरमकडे एक टाईमपास म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे इतर खेळांंनी केलेली प्रगती कॅरमच्या वाटेला म्हणावी तशी आली नाही. कॅरम कोणीही खेळू शकतो, असा सर्वसामान्य समज आजही दिसून येतो. जेव्हापासून कॅरमच्या स्पर्धा रंगू लागल्या, तेव्हा हा खेळ किती कलात्मक आणि कौशल्यपूर्ण आहे याची जाणीव लोकांना होऊ लागली. आज कॅरमपटूंना प्रसिद्धिसह पैसाही मिळतो, शिवाय नोकरीही मिळते. त्यामुळे आज कॅरममध्ये खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. सरकारकडूनही कॅरमला सातत्याने मदत मिळत आहे.’

‘लॉकडाऊन’मध्ये कॅरमला मिळत असलेल्या लोकप्रियतेविषयी केदार म्हणाले की, ‘आज संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध लढत आहे. यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब घरात थांबले असून घरातील छोटा-मोठा कॅरम बोर्ड बाहेर काढून खेळाचा आनंद घेत आहेत. घराच्या बाहेर जाता येत नसल्याने इतर कोणताही खेळ खेळता येत नाही. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी अनेकजणंनी कॅरमला पसंती दिली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या का होईना कॅरमची या निमित्ताने प्रसिद्धी होत आहे असे मला वाटते.’

त्याचप्रमाणे, ‘गेल्या चार दिवसांमध्ये माझ्याकडे अनेकांनी कॅरम बोर्ड, सोंगट्यांची विचारणा केली. पण सगळीकडे लॉकडाऊन असल्याने कॅरम पोहचणार कसे हाही प्रश्न आहे,’ असेही केदार यांनी सांगितले. त्याचवेळी, ‘लॉकडाऊनमध्ये जगभरात खेळ थांबले असताना एक खेळ मात्र सर्वसामन्यांमध्ये आवडीने खेळला जाईल, तो म्हणजे कॅरम,’ असा विश्वासही केदार यांनी व्यक्त केला.

प्रसार झाला नाही तरी चालेल, पण...

‘सध्याची परिस्थिती भविष्यात कधीही येऊ नये हीच इच्छा. या परिस्थितीमुळे जरी कॅरमची प्रसिध्दी होत असली, तरी ही परिस्थिती सुधरावी हीच प्रार्थना. भले यासाठी माझ्या खेळाचा प्रसार नाही झाला तरी चालेल. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर अनेक सामन्यांचे व्हिडिओ आहेत त्यातून कॅरमचे डावपेच शिकता येतील,’ असेही केदार यांनी सांगितले.

कॅरममध्ये आहेत नोकरीच्या संधी

जगभरात कॅरम १८-२० देशांमध्ये खेळला जातो. आतापर्यंत कॅरमच्या सात जागतिक अजिंक्यपद स्पर्धा झाल्या असून यामध्ये सर्वाधिक वर्चस्व भारताचेच राहिले आहे. शिवाय राष्ट्रीय आणि राज्य स्तरावराही सातत्याने कॅरमच्या स्पर्धा रंगत असल्याने यामध्ये अनेक सरकारी व खासगी कंपन्यांचे संघ सहभागी होत असतात. त्यामुळे आज कॅरमपटूंना पेट्रोलियम, इन्शुरन्स, बँक या क्षेत्रातील खाजगी कंपन्यांशिवाय अनेक सरकारी संस्थेत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

Web Title: During the lockdown, the push was to get 'The Queen'; Carrom's left in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.