मॉल अंगावर येतो?
By Admin | Updated: October 2, 2014 18:44 IST2014-10-02T18:44:35+5:302014-10-02T18:44:35+5:30
शॉपिंग म्हटलं की अनेकांच्या अंगात संचारतंच.मॉलरॅटच असतात काहीजण. तोंडपाठ असतं त्यांना काय घ्यायचं काय नाही ते!

मॉल अंगावर येतो?
- प्राची खाडे
(स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर)
शॉपिंग म्हटलं की अनेकांच्या अंगात संचारतंच.
मॉलरॅटच असतात काहीजण. तोंडपाठ असतं त्यांना काय घ्यायचं काय नाही ते! मात्र बहुतेकजण मॉलमधे खरेदीला गेलं की मनातल्या मनात बिचकलेलेच असतात. त्या लखलखाटात नेमकं काय घ्यावं, आपल्याला नेमकं काय चांगलं दिसेल हेच कळत नाही. गांगरायला होतं. आणि जे घ्यायचं नसतं ते ही घेऊन अनेकजण घरी येतात.
असं होऊ नये म्हणून या काही आयडिया, ज्या लक्षात ठेवल्या तर तुमचं मॉलशॉपिंग एकदम ‘खास’ होऊन जाईल.
लिस्ट केलीये?
खरेदीला निघण्यापूर्वी आपल्याला जे काही खरेदी करायचं आहे त्याची एक यादी केलेली बरी! तुम्ही म्हणाल हे काय बेसिक सांगता ? पण हेच खरंय, अनेकजण मॉलमध्ये जाताना अजिबात यादी करत नाहीत. मग घोळ होतो, त्यामुळे जुनाट वाटेल पण हाताशी यादी ठेवाच, आपल्याला नक्की काय करायचंय याची एक यादी हाताशी ठेवाच.
घ्यायचंय नक्की काय?
शॉपिंग लिस्ट तयार झाली की वस्तुंची त्यांच्या स्वरूपानुसार विभागणी करा.
म्हणजे शूज घ्यायचेत एवढंच लिहून थांबू नका, तुम्ही जर ठरवलं असेल की पांढरे शूज घ्यायचेत, सिल्व्हर पार्टीवेअर घ्यायचेत. पॅट्स घ्यायच्यात आहेत, त्याही कॅज्युअल तर तसं लिहून ठेवा. एवढय़ा गर्दीत आपल्याला हवं ते शोधणं मग सोपं होतं. आधी आपली गरज काय, ते नक्की ठरवा.
बी कम्फर्टेबल
हेदेखील पुन्हा बेसिकच. पण चूक नेमकी इथंही होतेच. खरेदीला निघताना नेहमीच आरामदायी कपडे आणि चप्पल घाला. विशेषत: मुलींनी. सहज बदलता येईल असा कुर्ता-चुडीदार किंवा टॉप-लेंगिन्स असे कपडे घाला. त्यामुळे खरेदी करताना नवीन ट्राय करणं सोपं होतं. त्यात वेळ जात नाही. मॉलमधे खूप चालावं लागतं, त्यामुळे पाण्याची बाटली, काहीतरी च्याऊमाऊ बरोबर ठेवलेलं बरंच.
मार्केट सर्व्हेचा मोह
कुठं काय मिळतं, हे नको ते, असं म्हणत तंगडतोड करत फिरण्याचा मोह अनेकांना होतो. काय घ्यायचं हे नक्की नसल्यानं ते शोधत फिरतात. पण त्यात वेळ तर जातोच, कनफ्यूजन वाढतं. ट्राफिकमधे अडकायला होतं ते वेगळंच. त्यापेक्षा एकच मोठं मार्केट, मॉल असं ठरवून एकाच ठिकाणी शॉपिंग करा. अतिचोखंदळपणा केला तर जे घ्यायचं तेच राहून जातं. पण जर तुम्ही खरेदीसाठी संपूर्ण दिवस ठेवला असेल तर त्यातील संपूर्ण वेळेच्या केवळ 30 टक्के वेळेत फिरफिर करा. कुठं काय मिळतं ते पहा. विंडो शॉपिंग करून बाजारातील किंवा मॉलमधील आपल्याला खरेदी करावयाच्या वस्तुंच्या किमतीचा अंदाज घ्या. मग लागा खरेदीला.
ट्रायल्स
कपडे आणि चपलांची खरेदी करणार असाल तर त्याची ‘ट्रायल’ घ्याच. साईझ वा फिटिंगबाबत तुम्हाला कितीही खात्नी असेल तरीही निरनिराळ्या ब्रँडसनुसार साईझ आणि फिटिंग बदलत असते. जर तुम्ही ट्रायल्स घेणं टाळलं तर घेतलेली वस्तू बदलण्याकरिता चकरा माराव्या लागतील. कुणास ठाऊक नंतर पुन्हा त्या दुकानात तुमच्या मापाचे कपडे, तुम्हाला आवडले तसेच मिळतील की नाही ! त्यामुळे ट्रायल घ्या. आवडलेले कपडे दुकानातच घालून पहा. ते तसे घालण्याचा अनेकांना फार कंटाळा येतो. त्यातून मग पुढे पस्तवावं लागतंच.