बोल ना. काय ? - काहीही.!!
By Admin | Updated: June 19, 2014 21:16 IST2014-06-19T21:16:38+5:302014-06-19T21:16:38+5:30
ब्लॉक करावं सगळ्यांना किंवा थेट डिलीट मारावं व्हॉट्स अँप असं का वाटतंय तुला? ‘तिचे’ फोन कट करतोहेस तू.? चॅट टर्न ऑफ करून ठेवतोहेस.? काय नक्की झालंय काय तुला? असा का वागतोहेस एकदम?

बोल ना. काय ? - काहीही.!!
>सागर पांढरे
ब्लॉक करावं सगळ्यांना किंवा थेट डिलीट मारावं व्हॉट्स अँप असं का वाटतंय तुला? ‘तिचे’ फोन कट करतोहेस तू.? चॅट टर्न ऑफ करून ठेवतोहेस.? काय नक्की झालंय काय तुला? असा का वागतोहेस एकदम?
------------------
उशीखाली आता पाचव्यांदा व्हायब्रेट झालंय तुझ्या. तरीही पीसीएच करून निव्वळ कूस पालटण्याशिवाय तू काहीच करत नाहीस..
खरंतर फक्त नऊच वाजलेत पण तुला केव्हाची जाग आलीये. तेवढय़ात फोन झिणझिणायला लागला. आता मात्र तू फोन उशीखालून बाहेर काढतोस आणि ठाऊक असूनही त्याची फ्लॅप उघडून पाहतोस. मीरा कॉलिंग.
शांतपणे स्क्रीनवरचं लाल बटण अंगठय़ाने डावीकडे खेचतोस. एव्हाना नोटिफिकेशन्समध्ये व्हॉट्स अँपवर २१ मेसेजेस फ्रॉम ५ कॉन्व्हर्सेशन्स.
तू सगळं तसंच ठेवतोस आणि फोनची फ्लॅप लावून टाकतोस. उठायला हवंय आता. पाय जरा जास्तच दुखायला लागलाय पण त्याला नाईलाज आहे. अजून महिनाभर तरी त्रास होणार म्हणालेत डॉक्टर. आणि हॉस्पिटलपेक्षा घरी बरंय. घरी कुणी नसतं. आई बाबा सकाळीच जातात. तोंडात ब्रश सरकवत तू किचनमध्ये येतोस. आज नाश्ता नाहीये का? एरवी तर पोहे किंवा शिर्याची कढई झाकून ठेवलेली असते ओट्यावर. आज का नाही मग? म्हणजे आता हे आईला विचारायला का होईना, व्हॉट्स अँप उघडावं लागणारच. अमेझिंग. उघडल्या उघडल्या पहिला मेसेज आईचाच. सॉरी सोन्या, उठायला जरा उशीर झाला. मांडणीवरच्या तिसर्या डब्यात मॅगी आहे. गोळ्या वेळेवर घे. वील बी बॅक बाय फोर. त्यापाठोपाठ ग्रुपवर तुझ्या चुलत भावांचे आलिया भटचे पांचट फॉरवडर्स. मधूनच तुझ्या पायाच्या चौकशा आणि टेक केअर वगैरे. एखाददोन ठिकाणी फुटबॉल. आणि बाकी मीराचे सात मेसेजेस. व्हाय डोण्ट यू टॉक, प्लीज रिप्लाय याने सुरुवात आणि नंतर तू कसा बदललायेस हॉस्पिटलमधून परत आल्यापासनं आणि तू कसा इम्पॉसिबल वागतोयेस आणि कसा दुरावत चाललायेस या सगळ्याची लांबलचक सोदाहरण स्पष्टीकरणं तारखांसह..
च्यायला ब्लॉक करावं सगळ्यांना किंवा थेट डिलीट मारावं, व्हॉट्स अँप. फार काही उपयोग नाही त्याचा कारण फेसबुक मेसेंजर, वी चॅट, गुगल हॅँगआउट सगळं आहेच सगळ्यांकडे आणि इव्हेन्च्युली तुझ्याकडेही.
मीराचा सलग तिसरा फोनसुद्धा तू कट करून टाकलायेस थेट फोन बंद करून टाकता येत नसला तरी. फेसबुकवर चॅट टर्नऑफ करून ठेवलंय थेट अकाऊण्ट डीअँक्टिव्ह करता येत नसलं तरी. आत्ता आत्तापर्यंत तुझं लास्ट सीन पहाटे चार सव्वीस असायचं आणि आता तू बघतही नाहीयेस ते.
तू असा वागतो आहेस. गाडी चिखलात स्लीप होते आणि पाय फ्रॅर होतो इतकी साधी घटना. या सगळ्यात ड्रॅमॅटिक इन्सिडन्स एवढाच की तू नेमका नेम धरून त्या डबक्यातच पडलास आणि तुझा फोन आणि लॅपटॉप पाणी जाऊन बंद पडले! यांच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये राहणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल वाटत होतं तुला. मध्यरात्री कधीतरी मीरा दिल्लीवरून पोचली पुण्यात. ती खोलीत शिरते न शिरते, तू लगेच तिच्याकडून तिचा फोन घेतलास आणि स्वत:च्या टांगलेल्या तंगड्याचा फोटो तिला एफबीवर टाकायला सांगितलास. मीरानेही लगेच एफबीवर आणि व्हॉट्स अँपवरच्या तमाम ग्रुपमध्ये फोटो टाकला. तुझ्या शेजारी बसून एक हात तुझ्या केसांमधून फिरवत दुसर्या हाताने फोटोवर येत असणार्या सगळ्या कमेण्ट्सना रिप्लाय देण्यात ती गुंतून गेली. त्या क्षणी पहिल्यांदा तुला इतक्या स्ट्रायकिंगली हे जाणवलं. तब्बल तीन महिन्यांनी भेटतीये ती तुला! तब्बल तीन महिन्यांनी स्पर्श अनुभवतोहेस तू तिचा.. ‘नंतर कर ना ते.’ तिचा हात हातात घेऊन तू म्हणतोस..
ती : एकच मिनिट हं शोन्या. अवंतिका पेटलीये..
तू : कटव ना तिला..
ती : अरे तेच करतीये.
तू : स्लीप झालो.
ती मग तिचा फोन बाजूला ठेवते. तुझे दोन्ही हात हातात घेते आणि एकटक तुझ्याकडे पाहत राहते. बर्याच बर्याच काळाने तू हे सगळं अनुभवतोयेस. काहीतरी कमाल अद्भुत फिलिंग आहे हे. अगदी इण्टेन्स, उत्कट कॅटेगरीतलं. खरंतर गेल्या तीन महिन्यांत अनेक व्हिडीओ कॉल्स आणि हॅँगआउट झालेत. स्काईपवर तर अगदी रेष न रेष दिसते चेहर्यावरची. मीरा दिल्लीला जायच्याआधीपेक्षा कैक पटीने जास्त तुम्ही गेल्या तीन महिन्यांत एकमेकांना बघत आला आहात. अगदी रोज अनेकदा. पण तरीही आज या अंधुक पिवळट प्रकाशात, या रोगट वासाच्या खोलीत आत्ता जे वाटतंय, जाणवतंय ते याआधी काहीही जाणवलेलं नाहीये तुला. कधीही संपू नये हे फिलिंग, हा क्षण असं वाटत असतानाच तिच्या व्हॉट्स अँपची शिट्टी वाजते. पहिलीकडे दुर्लक्ष केलं तरी पाठोपाठ दोन, तीन, चार वाजतात. ती पुन्हा फोनमध्ये शिरते. मग तिने अविनाश, सायली, समीर इत्यादी इत्यादींना कटवायची वाट पाहत राहतोस तू. रात्री कधीतरी शेवटी डोळा लागला तुझा. तिचा हात तुझ्या केसांमधून फिरत राहिल्याचं फक्त जाणवत राहिलं तुला रात्रभर. सकाळ झाली तिनं तुला पाठवलेल्या फॉरवर्ड; गुडमॉर्निंग मेसेजनीच. सरळ फेकून द्यावा तिचा फोन असं वाटून गेलं खूप तीव्रतेने. पण अगदी एक दिवस अगोदर, इथे यायच्या आधी हेच सगळं जगत होतास की तू. मग तिला आत्ता तेच जगताना पाहून तिचा आणि पयार्याने स्वत:चाही इतका तिटकारा का वाटतोय तुला??
आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो ते आपलं माणूस आत्ता त्याचा प्रत्येक श्वास जाणवेल इतकं आत्ताच्या घडीला आपल्याजवळ आहे आणि तरीही एकमेकांशी काहीच कम्युनिकेट करता येऊ नये? इतकं अचानक मूकबधिर होऊन जावं?
डॉक्टरांचा राऊण्ड होऊन गेलाय आता. हळूहळू करून तुझे व्हाट्स अँपवरचे तुझे काही चुलत, मामेभाऊ, एखाददोन मामे, आणि तुमच्या व्हॉट्स अँपवाल्या ग्रुपची अँडमिन असणारी तुझी मावशी तुला पाहायला यायला लागतात एकेक करून. निखीलदादा किती अखंड बोलत असतो ग्रुपवर. त्याने गेल्या अध्र्या तासात ‘कसा धडपडलास रे?’ हे एवढं एकच वाक्य उच्च्चारलंय. एरवी तुल व्हॉट्स अँपवर सतत सतत पिडणारी नेहा ताई ‘गाडी हळू चालवत जा’ हेच तिसर्यांदा शब्द फिरवून सांगतीये. मावशीने मग सगळ्यांमध्ये खाऊ वाटला. प्रत्येकाने मग तुझ्या प्लॅस्टरवर ओळीने रंगीबेरंगी सह्या केल्या. मग त्याच रंगीत पायासोबत एक ग्रुप सेल्फी क्लिक करून तुमच्या ग्रुपचा कव्हर पिक बनवण्यात आला. त्यात मीरालाही अँड करण्यात आलं. कॉलेज, जॉब, गर्लफ्रेण्ड, बॉयफ्रेण्ड, मोदी आणि फीफा यांच्याविषयी प्रत्येकी चार वाक्यं एकमेकांशी बोलून संपली की निर्माण होणार्या सायलेन्सचं काय करायचं हे समजेनासं झालं आणि सगळेच पांगले. पुन्हा आता मीरा आणि तू..
फार असह्य होतंय हे आता..
आणि आता तर ती फोनमध्येही नव्हती.. तुम्ही नुसतंच एकमेकांकडे बघत राहता..
ती : बोल ना.
तू : काय?
ती : काहीही.
तू : काहीही.
ती : बोलायचं नाहीये का?
तू : बोलतोय की.
ती : हे?
तू : मग काय?
ती : काल रात्री किती छान मूडमध्ये होतास.
तू : पण बोलत नव्हतोच तेव्हाही.
ती : हो.पण तरी..
तुला कळून चुकलंय की ती रात्र सरून गेलीये केव्हाच. ती परत येणार नाहीये. त्या रात्री जे वाटलं ते तसंच पुन्हा वाटणं फार फार अवघड आहे आता. आणि तू दोन दिवस व्हॉट्स अँप न पाहिल्याने, ग्रुप्स सोडून दिल्याने ते परतून येणार नाहीये..
दुपार उलटून गेलीये..तू एकीकडे मॅगी ढवळत दुसरीकडे लॅपटॉपचा कॅम अँडजस्ट करतोयेस. अगदी दोनच मिनिटात मीरा समोर येऊन बसते. तू ताटलीत मॅगी वाढून घेतोस आणि समोर जाऊन बसतोस. ती रागावलीये. तू तिच्याकडे बघून प्रसन्न हसतोस आणि हातातला काटा उंचावतोस..
‘हाय, मॅगी खाणार का?’