उगीच पावसाला नाट नका लावू!
By Admin | Updated: July 18, 2016 17:02 IST2016-07-18T16:13:38+5:302016-07-18T17:02:29+5:30
मराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहता ती एकंदरीत सध्या बरी आहे. बहुतांश ठिकाणी रान आबादानी झालंय.

उगीच पावसाला नाट नका लावू!
- रमेश भोसले
मराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहता ती एकंदरीत सध्या बरी आहे. बहुतांश ठिकाणी रान आबादानी झालंय. दुष्काळाचं सावट काहीअंशी का होईना पण कमी होताना दिसत आहे. बळीराजानेही आपले शेत पुजून पेरणी करून टाकली, त्यामुळे पेरणी झालेल्या शेतात आणि भेगाळलेल्या भुईत चिटुकले अंकुर डोकावतायत.
या अंकुरांमुळे दुष्काळाची जखम आताशी कुठे खपली धरू पाहत आहे. ती पूर्णपणे बरी होण्यास अजून बराच वेळ लागणार हे निश्चित. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आठ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेची कामे केलेली आहेत, तसेच काही सेवाभावी संस्थानी पुढाकार घेत आपल्या उपक्रमातून पाणी अडवण्याचे चांगले काम केल्यामुळे चोहीकडे पाण्याची स्थिती बरी आहे.
तरीदेखील लातूर जिल्ह्यातील १४२, उस्मानाबाद ११०, बीड १४४, जालना १ अशा एकूण ३९७ प्रकल्पांतील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही. गेल्या वर्षातील जुलै महिन्याच्या तुलनेत यावेळी जुलैपर्यंत स्थिती नक्कीच चांगली आहे. सध्या पाणी तरी वरवर दिसतेय, नद्या, ओढे, नाले, धबधबे वाहतानाचे विहंगम दृश्य पाहावयास मिळत आहे; पण याच दृश्यांना भुरळून तरुणाई आणि काही पाऊसवेडी मंडळी या पावसाचा आनंद लुटण्यासाठी अन् मनसोक्त चिंब भिजण्यासाठी डोंगरकड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्याकंडे सैराटपणे निघाले आहेत.
आपल्याच तालात नाचायचे, पाण्यात बागडायचे धबधब्यासमोर उभे राहून मित्रांसोबत सेल्फी काढायचा, मस्त मौजमजा करायची, चिंब भिजलेले असताना गरम चहाचा झुरका घेत ‘काय मस्त चहा आहे’ असे म्हणत आणि छोट्याशा एखाद्या विनोदावर एक मेकांच्या हातावर टाळी देत हास्यांचे गुलकंद चोहीबाजूने उधळताना अनेक दृश्य तुम्हा आम्हाच्या नजरेस पडतील. बेधुंद, बेमालुम सभोवतालच्या जगाशी त्यांना काही देणेघेणे नाही.
खरंच सर्व काही अलबेल झालंय? एकाच पावसाने सर्व परिस्थिती बदलली आहे का? जनावरांच्या चाऱ्याचा अन् माणसाच्या अन्नाचा प्रश्न या एका पावसाने कायमचा सुटणार आहे का? मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालेला फोटो एवढेच विश्व आहे का? की त्यापलीकडेही आणखी जग शिल्लक आहे. हे प्रश्न आहेत रात्रंदिवस शेतात मेहनत घेणारऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील जनाबाईसारख्या अनेक पावसाळे खाल्लेल्या महिला शेतकऱ्यांचे. तिला माहितीए की, अजून बळीराजाच्या पदरात धान्याची रास पडण्यास बराच अवकाश आहे. आताशी बीज अंकुराला आलाय ते मोठे होईल, कणाकणाने वाढेल, कणसात दाणा भरेल, कपाशीला बोंडे लागतील, मोत्यांच्या राशी भरतील, तेव्हा कुठे त्याच्या खळ्यावर अन् माळ्यावर धान्याचे पोते दिसेल.
सर्व काही एका क्षणात आणि एका झटक्यात होण्यासारखे यात काहीच नाही. तंत्रज्ञान जरी हायटेक झालेले असले तरी निसर्ग मात्र अजून तसाच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपले फोटो टाकताना जरासा विचार करायला हवा. चार वर्षांच्या दुष्काळझळा सोसलेल्या आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर तरी असं हावरट प्रदर्शन जरा वाईट दिसतंय. दुष्काळाच्या जखम अजून खूप ओल्या आहेत..