वेबकॅम बंद करा!
By Admin | Updated: September 18, 2014 19:39 IST2014-09-18T19:39:16+5:302014-09-18T19:39:16+5:30
आपल्याला मारे वाटतं की, आपण ऑनलाइन फार प्रायव्हसी जपतो. आपण जे करतो, ते प्रायव्हेट, कुणाला काही कळत नाही.

वेबकॅम बंद करा!
आपल्याला मारे वाटतं की, आपण ऑनलाइन फार प्रायव्हसी जपतो. आपण जे करतो, ते प्रायव्हेट, कुणाला काही कळत नाही. पण असं काही नाही तुमच्यावर अनेकांचा ऑनलाइन ‘वॉच’ असतो.
तुमचे लोकेशन तर जवळपास सगळ्याच वेबसाइटवाल्यांकडे असते. विविध स्पायवेअर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काय काम करता यावर हॅकर्स लक्ष ठेवून असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काही हजारो किलोमीटर अंतरावर बसून हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वेबकॅमही चालू करू शकतात.
काय असतो नक्की हा वेबकॅम हॅकिंगचा प्रकार?
वेबकॅम हॅकर्स म्हणजे काय?
वेबकॅम हॅकर्स सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. हे लोक हजारो किलोमीटर अंतरावरुन तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वेबकॅम चालू-बंद करू शकतात. एवढेच नव्हे तर त्या वेबकॅमच्या हद्दीतील सगळी रेकॉर्डिंगही करू शकता. म्हणजे तुमचा लॅपटॉप तुमच्या बेडरूममध्ये टेबलावर पडलेला असेल आणि तो जर ओपन असेल आणि सुरु असेल तर तुमच्या बेडरूममधील सर्व हालचालीवर हे वेबकॅम हॅकर्स हजारो किलोमीटरवरून लक्ष ठेवू शकतात. असे काही भयंकर प्रकार डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या वेबकॅमच्या बाबतीतही लक्षात आले आहेत.
हे वेबकॅम हॅकिंग करतात कसं?
वेबकॅम हॅकर्स हे नक्की करतात कसं? आपल्यापैकी अनेकांनी फ्री सॉफ्टवेअर्स गाणी, गेम्स असं काहीबाही डाउनलोड करायची भारी हौस असते. मात्र हे फ्री मिळणारे सॉफ्टवेअर्स आणि गाण्यांसोबत हे हॅकर्स मालवेअर प्रोग्राम्स देखील जोडून ठेवतात. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं फ्री सॉफ्टवेअर किंवा गाणं डाउनलोड करता तेव्हा हे मालवेअर प्रोग्राम्सदेखील त्या सोबत तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपवर डाउनलोड होऊन कार्यरत होतात. मालवेअर प्रोग्राम्स हा असा सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो जो तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉप विषयीची सगळी माहिती जसे की आयपी अँड्रेस, हार्डवेअर डिटेल्स, ऑपरेटिंग सिस्टीम डिटेल्स आदिंबद्दल सर्व माहिती आपल्या मालकाकडे (हॅकर्सकडे) पाठविण्याचे काम इमानेइतबारे करत असतो. याच माहितीच्या आधारे वेबकॅम हॅकर्स तुमच्या वेबकॅम हॅक करू शकतात.
- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com