Can there be a career in gaming lokmat webinar on gaming sector | गेमिंगमध्ये करिअर होऊ शकतं का?

गेमिंगमध्ये करिअर होऊ शकतं का?

- मोरेश्वर येरम
(मोरेश्वर येरम हे लोकमत ऑनलाइनमध्ये कार्यरत आहेत)

आई मला खेळायला जायचंय जाऊ दे ना वं, अशी गळ घालणाऱ्या चैत्याची कहाणी तुम्हाला माहित असेलच. पण आता २१ व्या शतकातील युवा पीढीची 'नाळ' मैदानी खेळाशी नव्हे, तर मोबाइल गेमिंगशी केव्हाच जोडली गेलीय. गेमिंग देखील आता एक करिअर क्षेत्र झालंय. इथंही करिअरच्या वेगवेगळ्या वाटा निर्माण झाल्या आहेत. गेम खेळून, ते डेव्हलप करुन किंवा मग गेमिंग इन्फ्ल्यूएन्सर बनून तरुणाई आपल्यातील वेगळेपण सिद्ध करुन दाखवतेय. पाश्चिमात्य देशांमध्ये गेमिंग रुळलेलं असलं तरी भारतात या क्षेत्राचं वर्तमान आणि भविष्य नेमकं कसं आहे? गेमिंग हे तुमचं करिअर कसं होऊ शकतं? त्यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं? 'पबजी'नं काय बदल घडवला? अशा अनेक प्रश्नांची उकल 'लोकमत'नं आयोजित केलेल्या 'गेमिंग इंडस्ट्री द गेम चेंजर' या वेबिनारमध्ये झाली.

गेमिंग स्ट्रीमर्स आणि डेव्हलपर्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहीत सुरेखा (Man Vs. Missiles), लक्ष्मी खानोलकर (War of cyber tanks), निखिल मालंकर (Mumbai Gullies), वैभव चव्हाण (Skatelander), रॉनी दासगुप्ता (therawkneeegames) यांच्याशी 'फोटॉन टॅडपोल स्टुडिओ'चे संस्थापक आणि सीईओ हृषी ओबेरॉय यांनी संवाद साधला. गेमिंग क्षेत्राकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहून या क्षेत्रात करिअर घडवलेली अशी ही मंडळी. त्यांच्यासोबतच्या चर्चेतील हे निवडक मुद्दे.

पालकांचा दृष्टीकोन बदलण्याची गरज
गेम खेळणं हे कसं काय करिअर होऊ शकतं? असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. पालकांचा हाच दृष्टीकोन आता बदलण्याची गरज आहे. गेम खेळणं म्हणजे वेळ वाया घालवणं अशी मानसिकता रुळलेली आहे. पण हे क्षेत्र आता त्यापलिकडे गेलं आहे. एक उत्तम आणि लोकांना खिळवून ठेवणारा गेम तयार करणं ही कला आहे. तर तो उत्तम पद्धतीनं खेळून त्यात माहीर होणं हे देखील यूट्यूबर आणि स्ट्रीमर म्हणून एक करिअर बनलं आहे.

आधी गेम डिझाइन करणं एक इंडस्ट्री होती. त्यानंतर गेम खेळणं आणि त्याचं स्ट्रीमिंग करणं इंडस्ट्री झाली. आता गेमिंगबाबत बोलणं ही देखील नवी इंडस्ट्री झाली आहे. हा बदल समजून घ्यायला हवा, असं मत हृषी ऑबेरॉय यांनी व्यक्त केलं.  

शिकाल तर टिकाल
गेमिंग क्षेत्रात येण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडावं का? असा प्रश्न अनेकदा तरुणांकडून विचारला जातो. गेम डेव्हलपमेंटसाठी शिक्षण गरजेचं नसलं तरी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करायलाच हवं. त्यानं तुमचा पाया रचला जातो. अर्ध्यावर शिक्षण सोडू नये, असं निखिल आवर्जुन सांगतो. शिक्षणामुळं तुमचा बॅकअप प्लान तयार असतो. गेमिंग क्षेत्र आपल्यासाठी नाही असं काही वर्षांनी लक्षात आलं तर शिक्षणाच्या जोरावर नव्या वाटा शोधता येतात.

'पबजी'नं क्रांती घडवली
'पबजी'वर बंदी घालण्यात आली असली तरी गेमिंग क्षेत्रात क्रांती घडली. पबजी यूट्यूब स्ट्रीमर्स घडले आणि गेमिंग इंडस्ट्रीला उभारी मिळाली हे मान्य करावंच लागेल. पबजी गेमचं सामर्थ्य हे होतं की तो प्रत्येक वयाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचला. गेमिंग क्षेत्रात भेदभाव होत नाही. लोकांना गेम आवडला की तो मोठा होतो. युझरची आवड येथे महत्वाची असते.

मुलींनीही गेमिंगकडे वळावं
गेमिंग क्षेत्र फक्त मुलांसाठी नाही. मुलींनीही याकडे करिअर म्हणून पाहायला हवं. तुमची मुलगी काय करते? ती गेमिंगमध्ये आहे असं पालकांनी सांगितल्यावर समोरचा आश्चर्यचकीत होणार नाही अशी वेळ एकेदिवशी येईल, असा विश्वास लक्ष्मी खानोलकर हिनं व्यक्त केला. गेमिंग क्षेत्र दिवसागणिक काहीतरी नवं घडविण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करत असतं. नव्या आव्हानांना सामोरं जायला शिकवत असतं आणि आव्हानांना तोंड देणं हा मुलींचा स्थायी भाव असतो त्यामुळे मुली या क्षेत्रातही खूप मोठी कामगिरी करू शकतात.

'गेमिंग इंडस्ट्री द गेम चेंजर' हे संपूर्ण वेबिनार येथे पाहता येईल:

Web Title: Can there be a career in gaming lokmat webinar on gaming sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.