BURN OUT- दिवाळीनंतर थकवा आला आणि मरगळल्यासारखंच झालं, असं होतं तुमचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:09 PM2019-11-01T13:09:34+5:302019-11-01T13:10:37+5:30

दिवाळी झाली, मस्त सेलिब्रेशन झालं, खूप मजा केली, खूप काम केलं तरीही रिलॅक्स वाटण्याऐवजी थकवा आला असं होतं तुमचं? ते कशानं? आणि त्यावर उपाय काय?

BURN OUT - After Diwali, do you feeling tired & exhausted? | BURN OUT- दिवाळीनंतर थकवा आला आणि मरगळल्यासारखंच झालं, असं होतं तुमचं?

BURN OUT- दिवाळीनंतर थकवा आला आणि मरगळल्यासारखंच झालं, असं होतं तुमचं?

Next
ठळक मुद्देदिवाळीच्या फटाक्यासारखी एकदम खूप एनर्जी लावली आणि ती फुस्सं होऊन आपलाच फुसका फटाका झाला, असं का होतं अनेकदा?

- ऑक्सिजन टीम

दिवाळी संपली. येणार येणार म्हणत आली आणि दिवाळी गेलीही.
कधीतरी याकाळात तुमच्या मनात आलं का, दिवाळी नको, सेलिब्रेशन नको, खरेदी नको, फक्त झोप काढू. नेहमीपेक्षा जास्त दगदग झाली या दिवाळीत. कामाची यादी संपलीच नाही. खूप सार्‍या डेडलाइन. अभ्यास. क्लासेस. परीक्षांचा ताण, घरकामात मदत, पाहुणे, भेटीगाठी, गप्पाटप्पांत गेलेला वेळ हे सारं म्हणजे मोठं कामच होऊन बसलं आणि आपण फार दमलो यासार्‍यात..
खरं तर रिलॅक्स व्हायचं होतं, खूप आराम करायचा होता, सिनेमे पहायचे होते, गप्पा मारायच्या होत्या भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी. पण आपली कामच संपली नाही. सगळीकडे नुस्ते धावतपळत पोहोचलो आणि सगळं निभावलं कसंबसं, यासार्‍या सेलिब्रेशनपेक्षा रूटीनच कमी दगदगीचं असतं, तेच बरं.
- हे असं वाटलं असेल तर तुम्ही काही एकटेच नाही. या भावनेतून मोठय़ा सणानंतर किंवा एखाद्या मोठय़ा स्पर्धेनंतर, परीक्षेनंतर, घरातल्या लगAानंतर किंवा अगदी दिवाळीच्या सेलिब्रेशननंतरही अनेकजण जातात.
थकवा येतो, मरगळ आल्यासारखं वाटतं, तरतरी वाटत नाही आणि आरामच करावासा वाटतो.
त्याला कारण म्हणता येईल बर्नआउट !
म्हणजे दिवाळीतलं भुईनळ किंवा भुईचक्र होऊन जातं आपलं. इतके उत्साहात असतो, इतके जोशात की आपल्यात आहे नाही ती सगळी एनर्जी एकाठिकाणी, एकाचवेळी लावतो आणि मग एकदम उसळी मारून गरगर फिरतो आणि मग एकदम विझल्यासारखे फुस्स होऊन जातो.
आणि मग एकदम गपगार होतो.
वाटतं, हे काय झालं.
तर या अवस्थेलाच बर्नआउट म्हणता येईल.
खरं तर या अवस्थेची चर्चा सध्या जगभर आहे. अलीकडेच अमेरिकेत एक अहवाल आला की, त्यांच्या व्यवस्थेत डॉक्टर्स आणि नर्स ही सगळ्यात बर्नआउट माणसं आहेत. म्हणजेच काय तर त्यांच्यावर कामाचा इतका बोजा आहे की, त्यांना निवांतपणा आणि फुरसत अशी मिळतच नाही आणि काम करून करून ते अगदी पिचून गेलेले असतात.
एवढंच नव्हे तर एका जागतिक एचआर फर्मने अलीकडेच केलेल्या मिलेनिअल्सच्या  म्हणजेच तरुण नोकरदारांच्या एका अभ्यासानुसार भारतातले मिलेनिअल्स अर्थातच तरुण जगभरात सर्वाधिक तास काम करतात. त्यांना सुटय़ाही कमी असतात. आणि सुटी मिळावी म्हणून सतत हळहळत असतात. त्याला म्हणतात, ‘लिव्ह ड्रिप्राइव्हड’. म्हणजे हक्काच्या सुटय़ाही अनेकांना मिळत नाही तर निवांतपणासाठीची सुटी मिळणंही मुश्कील.
त्याउलट अनेकांना असं वाटतं की, आपण सुटी घेतली अगदी साप्ताहिक सुटी घेतली तरी आपलं ऑफिसमधलं काम आणि प्रभाव कमी होईल. आपल्यात इनिशिएटिव्ह नाही असं मानलं जाईल म्हणून आपण फार काम करतो, असं दाखवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठीही अनेकजण रोज काम करतात.
इतकं काम करतात की, त्यांना स्वतर्‍साठी काही वेळच मिळत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतोय की अनेकजण वयाच्या पंचविशीत आणि तिशीतच ‘बर्नआउट’ व्हायला लागले आहेत.
दिवाळीसारख्या सणानंतर ही समस्या जास्त मोठय़ा प्रमाणात जाणवते कारण या सणानिमित्त मिळणारी दोन-तीन दिवसांची का होईना हक्काची सुटी. आणि त्याचवेळी करावी लागणारी खरेदी, सफाई आणि एकूणच चारी बाजूनं अंगावर येणारं सेलिब्रेशन. सार्‍यांसोबत हे साजरं करताना अनेकांना कामाचा ताण आणि घरचा सेलिब्रेशनचा ताण सहन होत नाही आणि परिणामी याकाळात जास्त बर्नआउट झाल्यासारखं वाटतं.
अनेकांना तर असंही वाटतं की, सारं जग आनंदात असताना मीच का असा कामाच्या दडपणाखाली आणि ओझ्याखाली वाकलो आहे. कामं संपतच नाहीत. हात जड झाल्यासारखे वाटतात. शीण येतो. आणि तो शीण काही उमजू देत नाही.
तर हा असा शीण घालवायचा असेल आणि नव्या उमेदीनं आणि एनर्जीनं दिवाळीनंतर पुन्हा कामाला सुरुवात करायची असेल तर काय करायला हवं याचाही विचार करायलाच हवा.
तो केला नाही तर हे बर्नआउट फिलिंग मरगळ होऊन आपल्या कामावर आणि रूटीनवर पसरतं. त्यातून मग कळतच नाही की, नेमकं सारं उत्तम असून, आनंदी असूनही आपल्याला असं मरगळल्यासारखं का वाटतं आहे.
तर दिवाळीनंतर आता छान थंडी सुरू होईल. ती मरगळ आणि शरीरासह मनाला आलेलं जडत्व झटकून टाकण्यासाठी हे साधेसोपे उपाय !
हो असतोच आपल्यात, जोश आणि जिंदादिली पुन्हा मस्त मनात भरून घेऊ.

*******
बर्नआउट म्हणजे काय?


खरं तर ही एक मानसशास्रीय फ्रेज आहे. ज्यावर जगभर अभ्यास झालेला आहे. मात्र मानसिक आजार असं म्हणून याकडे न पाहता काही गोष्टी तपासून पाहिल्या तर सतत काम करण्याचा, सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास म्हणून तयारी करण्याचा, शारीरिक कष्टांचा परिणाम म्हणूनही बर्नआउट झाल्यासारखं वाटू शकतं.
अनेक अ‍ॅथलिट आणि खेळाडूंना अशी समस्या मोठय़ा स्पर्धेनंतर येते. कारण ते दीर्घकाळ एका ध्येयासाठी प्रय} करत असतात. आणि ते लक्ष्य साध्य झालं किंवा नाही झालं तरी त्यांना एकप्रकारचा शीण येतो.
अनेकदा काही प्रोफेशनल, विविध प्रोजेक्टवर काम करणारे, अनेक परीक्षा देणारे अशा अनेकांना अशा प्रकारचा बर्नआउट फील येतो.
त्याची काही लक्षणंही दिसतात.
1. सतत थकवा. काही करावंसं न वाटणं.
2. उदास वाटणं किंवा स्वतर्‍विषयी/इतरांविषयी नकारात्मक विचार येणं.
3. मरगळ वाटणं.
4. कामात किंवा कशातच लक्ष न लागणं.
5. स्वतर्‍ची काळजी न घेणं, देखभाल न करणं.
6. कामच न संपणं. सतत हातात काम आहे असं वाटणं.
- अर्थात ही कारणं फार ढोबळ आहेत. ती अनेकदा सगळ्यांना जाणवतात. प्रदीर्घ काळ हे जाणवलं तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. 

******

रिफ्रेश होण्यासाठी काय करायचं?


1. एकतर आपलं मॉर्निग रुटीन असलं पाहिजे. कधी 6 ला उठले, कधी 8 ला, कधी दुपारी 12 वाजता असं करू नये. रोज सकाळी उठण्याची आपल्याला सोयीची अशी एक वेळ ठरवावी आणि त्याचवेळी उठावं. रोज. त्यानं आपलं बॉडी क्लॉक सेट व्हायला मदत होतेच; पण पुढे होणारी कामाची धावपळ कमी होते.
2. रोज जमेल तसा म्हणजे 10 मिनिटं का होईना; पण व्यायाम करायलाच हवा. तोही रोज. एकदिवस केला, एकदिवस नाही असं करू नये.
3. नो स्क्रीन टाइम. सकाळी घाईच्या वेळात मोबाइल पहायचाच नाही किंवा अमुक 1 वाजेर्पयत मोबाइल पहायचा नाही अशी शिस्त स्वतर्‍ला लावून घ्यावी.
4. नास्ता. ही फार ढोबळ गोष्ट आहे असं वाटेल; पण नास्ता रोज सकाळी केला तर आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि मूडही चांगला राहतो. 
5. दिवसभरात आपण काय काय करणार आहोत याचं एक पॉझिटिव्ह प्लॅनिंग करावं. तेही कागदावर किंवा मोबाइलच्या प्लॅनरवर आणि महत्त्वाच्या कामाची क्रमवार शिस्तीत यादी करावी.
6. ठरल्यावेळी रात्री झोपावं. हे सारं बोअर वाटलं तरीही त्यामुळे आपल्या मनाला आणि शरीराला येणारा थकवा एका विशिष्ट रूटीनमुळे कमी व्हायला मदत होते.

*****

टू डू लिस्ट

बर्नआउट होण्यात एक सगळ्यात महत्त्वाचा त्रास असतो तो म्हणजे हातातलं कामच न संपण्याचा. आपण काम करतोच आहोत; पण ते संपत नाही, अभ्यास संपत नाही, थकवा येतो असं वाटतं.
त्यावर एक सोपा उपाय म्हणजे.
महत्त्वाची कामं आणि कमी महत्त्वाची कामं यांची एक यादी करायची. एकावेळी एकच काम या गतीने महत्त्वाची कामं आधी संपवून टीक मार्क करायची. त्यानं काम होत असल्याचं समाधान मिळतं आणि कामाचा वेग वाढतो.


 

Web Title: BURN OUT - After Diwali, do you feeling tired & exhausted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.