९९ वर्षांचे बाबा म्हणतात.. मी शरिराने म्हातारा असेल, पण मनाने तरूणच आहे

By Admin | Published: February 11, 2017 02:11 AM2017-02-11T02:11:27+5:302017-02-11T02:11:27+5:30

व्हॅलेंटाईनचा सप्ताह म्हणजे तरूणाईसाठी एक पर्वनीच. या वीकमधील सातही दिवस तरूणाई वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करते

99 year old Baba says ... I'm old enough to be old, but my heart is very young | ९९ वर्षांचे बाबा म्हणतात.. मी शरिराने म्हातारा असेल, पण मनाने तरूणच आहे

९९ वर्षांचे बाबा म्हणतात.. मी शरिराने म्हातारा असेल, पण मनाने तरूणच आहे

googlenewsNext

व्हॅलेंटाईनचा सप्ताह म्हणजे तरूणाईसाठी एक पर्वनीच. या वीकमधील सातही दिवस तरूणाई वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करते. या सेलीब्रेशनला सत्तरी ओलांडलेले काही लोक विरोध दर्शवितात. परंतु याला अपवाद आहेत, औरंगाबादचे प्रेमकुमार. (नाव बददलेले) आजच्या तरूणांप्रमाणेच त्यांनी ९९ व्या वर्षीही आपल्या पत्नीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रत्येक वर्षी ते आपल्या पत्नीला टेडी भेट म्हणून देतात.शुक्रवारीही त्यांनी आपल्या पत्नीसाठी 99 रुपयांची टेडी खरेदी केली. ते म्हणतात.. मी शरिराने जरी म्हातारा झालेलो असलो तरी मनाने मात्र तरूणच आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन वीकमधील केवळ टेडी डे लाच ते सेलीब्रेशन करतात. याचे कारण विचारले असता त्यांनी आपल्या आपल्या प्रामाणिक लव्हमधील रोमॅण्टिक स्टोरीच सांगितली. 

९९ वर्षीय बाबा अर्थातच प्रेमकुमार सांगत होते... मी मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी. शिक्षण एम.ए.झालेले. माझ्या पत्नीचेही इंग्लिश बोलण्याइतपत शिक्षण झालेले आहे. आम्ही बुलडाण्यातीलच एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला जायचो. आम्ही दोघेही नववीच्या वर्गात होतो. दोन वर्षे सोबत असतानाही दहावीला परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशी मी तिला तुझा पेपर कसा गेला एवढेच विचारले. आणि इथेच आमचे पहिले बोलणे झाले. मग रोजच पेपर सुटला की तीला हे विचारणे सुरूच ठेवले. शेवटच्या पेपरला तिने स्वत:हुन मला विचारले. मला खुप आनंद झाला. आणि इथुनच सुरू झाली आमच्या पे्रमाची कहाणी.

हल्ली शाळेतले पोरंही प्रेम करायला निघतात. परंतु आम्ही याला अपवाद होतो. आम्ही कॉलेजमध्ये असतानाही प्रेम काय असते, हेच आम्हाला माहित नव्हते. फक्त मला ती आवडते, आणि मी तीला अवडतो, एवढेच माहित होते. मग मी तिला लग्नासाठी मागणी घातली. लग्नाचं नाव काढताच तिने पळ काढला. मी घाबरलो. मला वाटले की ती घरी सांगते की काय? घरी माहित झाले तर मला मार बसणार, हे निश्चीत. म्हणून मी बुलडाण्यातून पळ काढला. मामा कडे औरंगाबादला आलो. चार दिवस राहिलो. गावाकडं काही तरी झाले असेल, याचीच मनात भिती होती. परंतु गावाकडून तसा काहीच निरोप आला नाही. म्हणून मी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडे गेलो तर सर्वकाही ठीक होते. दुसऱ्या दिवशी मी तिला भेटलो. तीनेही स्माईल देत मी घातलेल्या मागणीला होकार दिला. आमच्या घरच्यांनीही आमच्या लग्नाला होकार दिला. त्याप्रमाणे आमचे १९४४ ला लग्न झाले. आमचा संसार सुखाने सुरू होता. आम्हाला दोन आपत्य झाली. दोन्ही आपत्य सध्या पुण्याला खाजगी कंपनीत काम करतात.

तत्पूर्वी लग्नानंतर चौदाव्या वर्षी (१९५८) आमचे भांडण झाले. मी चांगलेच झोडपून काढले. कारण क्षूल्लक होते. ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. १९७७ साली आम्ही औरंगाबादला वास्तव्यास आलोत. १९९९ साली आमचे पुन्हा भांडण झाले. वाद एवढा झाला की, तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मी खुप घाबरलो होतो. काही दिवस वाईट गेल्यानंतर पुन्हा २००१ साली चांगले दिवस आले. माझ्या नातवाने कोणाला तरी टेडी देण्यासाठी आणला होता. मी विचारले हे काय? तर त्याने मला हे टेडी दिल्याने काय होते, हे समजावून सांगितले. मी त्याचा आजोबा असतानाही मला एवढ्या वर्षात जे समजले नाही, ते त्याने मला त्याच्या बाविसाव्या वर्षी समाजावले. असो.. मी तीला टेडी दिला. यावर ती खुप खुष झाली. माझ्याबद्दल असणार सर्व राग तिच्या मनातून निघून गेल्याचे दिसले. म्हणून मी प्रत्येक वर्षी टेडी डे ला तिला एक टेडी घेऊन देतो. ती पण तेवढ्याच प्रेमाणे तिचा स्वीकार करते. तुम्हाला वाटत असेल की व्हॅलेंटाईनमधील सर्व डे चे या वयात सेलिब्रेशन करत असेल. हा तुमचा गोड गैरसमज आहे. माझा या सर्वाला विरोध आहे. कारण प्रेम हे ३६५ दिवस करावे. प्रेमाचा बाजार करू नये. आमचे भांडण होत असले तरी आमचे प्रेम कमी होत नाही. टेडी दिल्याने तिच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो, बाकी काही नाही.. असो मला उशिर होत आहे, नंतर बोलू... मी येतो.. धन्यवाद... माझे नाव कोणाला सांगू नका... आणि मोबाईल खिशात ठेवा.. तुम्ही माझा फोटो काढताल, याची भिती वाटते... एवढे बोलून ते ९९ वर्षीय बाबा माझ्यापासून निघून गेले. 
- सोमनाथ खताळ
औरंगाबाद

Web Title: 99 year old Baba says ... I'm old enough to be old, but my heart is very young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.