- श्रेणिक नरदे
क्रि केट हा भारताचा आत्मा आहे. या खेळाचे सर्वाधिक प्रेक्षक आपल्या देशात आहेत. खेळाडूंवरचं प्रेम, कधी टोकाचा तिरस्कार, विजयाचा जल्लोष, तर कधी पराभवामुळे खेळाडूंना धमक्या देण्यापर्यंत प्रेक्षक अतिच इमोशनली या खेळात इन्व्हॉल्व्ह होत जातात.हे वर्षानुवर्षं चालत आलेलं आहे आणि पुढेही हा वेग असाच राहील किंबहुना याहूनही वाढेल. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीलच्या सामन्यांनी तर अक्षरश: भारताला वेडं केलं आहे. यंदा कोरोनाच्या महाभयानक संकटातही आवश्यक त्या उपाययोजना करून दुबईमध्ये हे सामने त्याच उत्साहात खेळवले जात आहेत. आपल्या क्रि केटवेड्या देशात खेळाडूंची, खेळाची, अम्पायर, कोच लोकांची जितकी चर्चा चवीनं होत असते तितक्याच चवीनं दबक्या आवाजात क्रि केटवर लावल्या जाणार्या सट्टय़ाचीसुद्धा होत होती. मात्र गेल्या काही वर्षांत या सट्टय़ाची चर्चा खुलेपणानं होऊ लागली आणि गप्पांतून सरळसरळ आज कोण खेळेल असं वाटतं रे? आज याला कप्तान करायचं की याला व्हाइस कप्तान करायचं? ही चर्चा खुलेआम चालू झाली. आता हे आपले लोक डिविलियर्स, कोहली, रसेल, धोनी, के.एल. राहुल, कार्तिक, उथप्पा, रोहित शर्मा आणि अशा बर्याच खेळाडूंना टीमच्या बाहेरही ठेवू शकतात. आपल्या गल्लीतले लोक असं करू शकतात? हो. कुठं? तर मोबाइलमधल्या स्पोर्ट एप्लिकेशनमध्ये. फॅण्टसी स्पोर्टस हे एक नवं सट्टय़ाचं व्यासपीठ आज जगभरासाठी खुलं झालं आहे. पूर्वी सट्टा लावणं म्हणजे काहीतरी गुन्हा करणं असं वाटायचं; पण आता भाऊ-बहीण, बाप-लेक, दोस्तलोक एकत्र बसून सट्टा खेळत असतात. आणि त्यात काही वाईट नाही असंही बहुसंख्यांना वाटतं. 49 रुपये गुंतवले, अँपवर दोन्ही टीममधले योग्य लोक हेरून तुमची टीम निवडली, कर्णधार, उपकर्णधार चांगले खेळले आणि निवडलेल्या टीममधील सर्व खेळाडू उत्तम खेळले तर तुम्ही 49 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये कमावू शकता अशी इथली लालूच आहे. निवडलेले एक-दोन खेळाडू जरी खेळले नाहीत, पहिलं बक्षीस नाही मिळालं तरी खालची बक्षिसं असतातच.हे सगळं सांगतोय म्हणजे सट्टा खेळायला शिकवण्याचा माझा हेतू नाही; पण अनेकजण कशामागे सध्या पागल झालेत त्यातलं सूत्र तेवढं सांगतो आहे.टीम अगदीच खराब खेळली तर तुमचे 49 रु पये वारतात. आणि रात्री झोप येत नाही. थोडक्यातच माझं बक्षीस हुकलं रे. म्हणत तळमळत बसावं लागतं.दुसर्या दिवशी त्याच उत्साहानं परत टीम तयार करायची. खेळायचं. काही जिंकायचं किंवा हारायचं. या उत्साहाचा अभ्यास करून तयार झालेले हे फॅण्टसी स्पोर्ट्स अँप्लिकेशन सामान्य लोकांच्या या सट्टा लावण्यातून भरपूर कमाई करू लागले आणि त्या कमाईतील चौथा भाग बक्षीस म्हणून वाटू लागले. मात्र या फॅण्टसी टीम तयार करण्यात लाखो लोकांत रोज एखादा यशस्वी ठरतो. आणि निम्म्याहून अधिक लोक आपले पैसे गमावतात.