युवा नेमबाजांचा विश्वचषक स्पर्धेत  ‘सुवर्णवेध’; इलावेनिल- दिव्यांश यांचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:45 AM2021-03-23T03:45:58+5:302021-03-23T05:51:42+5:30

सौरभ- मनू  यांनी इराणच्या गोलनोश सेबहातोलाही- जावेद फोरोगी यांना १६-१२ असे नमविले. दुसऱ्या फेरीनंतर सौरभ व  मनू माघारले होते.

Young Shooters World Cup; Elevenil- Dominance of Divyansh | युवा नेमबाजांचा विश्वचषक स्पर्धेत  ‘सुवर्णवेध’; इलावेनिल- दिव्यांश यांचा दबदबा

युवा नेमबाजांचा विश्वचषक स्पर्धेत  ‘सुवर्णवेध’; इलावेनिल- दिव्यांश यांचा दबदबा

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताच्या युवा ब्रिगेडने येथील डाॅ. कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात सोमवारी शानदार कामगिरीच्या बळावर दहा मीटर एअर पिस्तूल व दहा मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदके जिंकली. सौरभ चौधरी-मनू भाकर यांनी एअर पिस्तूलचे आणि इलावेनिल वलारिवान-दिव्यांश पंवार यांनी एअर रायफलचे सुवर्ण जिंकले. भारत पाच सुवर्णपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी मिळवले.

सौरभ- मनू  यांनी इराणच्या गोलनोश सेबहातोलाही- जावेद फोरोगी यांना १६-१२ असे नमविले. दुसऱ्या फेरीनंतर सौरभ व  मनू माघारले होते. त्यांनी पुनरागमन करीत भारताला पाचवे सुवर्ण जिंकून दिले. दोघे पात्रता फेरीत ३८४ गुणांसह दुसऱ्या स्थानी होते. यशस्विनीसिंग देसवाल व अभिषेक वर्मा यांनी तुर्कस्थानच्या सेवाल इलाहदा तारहान-इस्माईल केलेस यांना १७-१३ असे नमवून कांस्य जिंकले. दुसरीकडे, गरतोज खांगुरा, मैराज अहमद खान व अंगरवीर सिंग बाजवा यांनी भारतीय संघाला स्कीट प्रकारात सुवर्ण मिळवून दिले. तसेच, महिलांमध्ये परिनाज धालीवाल, कार्तिक सिंग शक्तावत व  गनीमत सेखों यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 

जोडीदाराच्या कामगिरीमुळे विचलित नाही - इलावेनिल
दिव्यांश पन्वर कामगिरीमुळे मी विचलित होत नाही. स्वत:च्या कामगिरीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असते. अखेर दोघांचेही गुण विचारात घेऊन पदक निश्चित होत असले तरी जोपर्यंत स्वत:ची कामगिरी उंचावणार नाही, तोपर्यंत सहकाऱ्याकडून अपेक्षा बाळगता येणार नाहीत. सहकारी खेळाडू किंवा प्रतिस्पर्धी काय करतो, हे पहायला वेळ देखील नसतो. दिव्यांश चांगलीच कामगिरी करेल,अशी अपेक्षा होती. अपेक्षेनुसार आम्ही सुवर्ण जिंकले, अशी प्रतिक्रिया १८ वर्षांच्या इलावेनिलने दिली.

‘शॉटगन नेमबाजीचे भविष्य उज्ज्वल’
युवा खेळाडूंच्या बळावर भारतात शॉटगन नेमबाजीला उज्ज्वल भविष्य असल्याचा विश्वास राष्ट्रीय प्रशिक्षक मानशेरसिंग यांनी व्यक्त केला. २००४ अथेन्स ऑलिम्पिकमध्ये डबल ट्रॅप प्रकारात राैप्य जिंकून राज्यवर्धनसिंग राठोडने भारतात नेमबाजीला ओळख दिली.
 त्यानंतर मात्र रायफल आणि पिस्तूल प्रकारात भारतीयांनी चांगलीच प्रगती केली. मानशेर यांनी शॉटगन प्रकाराचे भविष्य उज्ज्जल असून याचे ताजे उदाहरण अंगदवीर बाजवा आणि मैराज अहमद खान यांनी टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळविल्याचे सांगितले. 
भारतात शाॅटगनला लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि उपकरणांअभावी सरावासाठी संघर्ष करावा लागतो, असे सांगून ‘सध्याच्या नेमबाजी विश्वचषकात भारताच्या स्कीट नेमबाजांकडून होत असलेल्या कामगिरीमुळे सकारात्मक बदल होईल,’ अशी अपेक्षा मानशेर यांनी व्यक्त केली.

इलावेनिल- दिव्यांश यांचा दबदबा
इलावेनिल वलारिवान आणि दिव्यांश पन्वर यांनी दहा मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्ण वेध घेतला. त्यांनी निर्णयक फेरीत १६ गुणांची कमाई करीत हंगेरीची विश्व क्रमवारीत नंबर वन जोडी इस्तावान पेनी- इस्जतर डेनेस यांना नमविले. पराभूत जोडीला केवळ दहा गुण मिळविता आले. भारतीय जोडीने अखेरच्या शॉटमध्ये सारखे १०.४ तर प्रतिस्पर्धी जोडीने १०.७ आणि ९.९ गुणांची कमाई केली. अमेरिकेचे मेरी कॅरोलिन टकर आणि लुकास कोजोनीस्की यांना कांस्यवर समाधान मानावे लागले.

इलावेनिल- दिव्यांश यांनी दुसऱ्या पात्रता फेरीत क्रमश: २११.२ आणि २१०.१ असे गुण संपादन केले होते. एकूण ४२१.३ गुणांसह भारताची जोडी अव्वल स्थानावर होती. याच स्पर्धेत उतरलेली अंजूम मोदगिल- अर्जुन बाबूता ही जोडी पात्रता फेरीत पाचव्या स्थानी राहिल्याने मुख्य स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. दिव्यांशचे स्पर्धेत हे दुसरे पदक आहे. त्याने पहिल्या दिवशी वैयक्तिक प्रकारात कांस्य जिंकले होते. इलावेनिलला मात्र वैयक्तिक प्रकारात पदकाने हुलकावणी दिली होती.

Web Title: Young Shooters World Cup; Elevenil- Dominance of Divyansh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.