विनेश फोगाटला मिळाली 16 कोटींची बक्षीसं? पती सोमवीर राठी यांनी केला मोठा खुलासा; सांगितलं संपूर्ण सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 10:41 IST2024-08-19T10:40:20+5:302024-08-19T10:41:43+5:30
विनेशने 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण स्पर्धेपूर्वी वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.

विनेश फोगाटला मिळाली 16 कोटींची बक्षीसं? पती सोमवीर राठी यांनी केला मोठा खुलासा; सांगितलं संपूर्ण सत्य
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही, मात्र, तिने कोट्यवधी भारतीयांची मने नक्कीच जिंकली आहेत. विनेश पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. विनेशने 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण स्पर्धेपूर्वी वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.
यानंतर तिने रौप्यपदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती, पण लवादानेही तिचे अपील फेटाळून लावले. आता मायदेशी परतलेल्या विनेश फोगाटबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात तिला विविध संस्था, व्यावसायिक आणि कंपन्यांकडून 16 कोटी रुपयांची बक्षीसे मिळाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर, आता तिचे पती सोमवीर राठी यांनी यामागचे संपूर्ण सत्य सांगितले आहे.
सोमवीर राठी यांनी 18 ऑगस्टच्या सायंकाली व्हायरल होत असलेल्या एका पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत, हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विनेशला अद्याप कुणाकडूनही पैशांच्या स्वरुपात बक्षीस मिळालेले नाहीत. तसेच, अशा खोट्या बातम्या न पसरवू नका, असे आवाहनही त्यानी चाहत्यांना केले आहे. याच बरोबर हे लेकप्रियता मिळवण्याचे एक साधन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले सोमवीर -
सोमवीर राठी यानी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "खालील संस्था, व्यापारी, कंपन्या आणि पक्षांकडून विनेश फोगाटला कसल्याही प्रकारे पैसे मिळालेले नाहीत. आपण सर्व आमचे हितचिंतक आहात. कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. यामुळे आमचे नुकसान तर होईलच, शिवाय सामाजिक मूल्यांनाही हानी पोहोचेल. हे केवळ स्वस्तातली लोकप्रियता मिळविण्याचे साधन मात्र आहे."
निम्नलिखित संस्थाओं, व्यापारियों, कंपनियों और पार्टियों द्वारा विनेश फोगाट को कोई धनराशि प्राप्त नहीं हुई है. आप सभी हमारे शुभचिंतक लोग हैं, कृपया झूठी खबरें न फ़ैलाएँ. इससे हमारा नुक़सान तो होगा ही. सामाजिक मूल्यों का भी नुक़सान होगा.
— Somvir Rathee (@somvir_rathee) August 18, 2024
यह सस्ती लोकप्रियता पाने का साधन मात्र है. pic.twitter.com/ziUaA8ct1W
भारतातील स्वागतानंतर बोलताना विनेश फोगाट म्हणाली होती, "त्यांनी मला गोल्ड मेडल दिले नाही, मात्र लोकांनी मला जे प्रेम आणि सन्मान दिला तो एक हजार गोल्ड मेडलपेक्षाही अधिक आहे."