सुनील कुमारने केली 'सुवर्ण' कामगिरी; 27 वर्षांनंतर अखेर संपली भारताची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 09:14 IST2020-02-19T08:56:32+5:302020-02-19T09:14:00+5:30
उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतर विजय मिळविणाऱ्या सुनीलने येथील केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये ८७ किलो वजनगटाच्या फायनलमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहज मात केली.

सुनील कुमारने केली 'सुवर्ण' कामगिरी; 27 वर्षांनंतर अखेर संपली भारताची प्रतीक्षा
नवी दिल्ली : सुनील कुमारने मंगळवारी ८७ किलो वजन गटाच्या फायनलमध्ये किर्गिस्तानच्या अजान सालिदिनोव्हचा ५-० ने पराभव करीत भारताला आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या ग्रीको रोमन गटात २७ वर्षांत प्रथमच सुवर्णपदक पटकावून दिले. उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतर विजय मिळविणाऱ्या सुनीलने येथील केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये ८७ किलो वजनगटाच्या फायनलमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहज मात केली.
त्याआधी, सुनीलने कजाखस्तानच्या अजामत कुस्तबायेवविरुद्ध उपांत्य फेरीत १-८ ने पिछाडीवर पडल्यानंतर सलग ११ गुण मिळवत दमदार पुनरागमन केले व १२-८ ने सरशी साधत अंतिम फेरीत धडक मारली. त्याने २०१९ मध्येही या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याआधी, अर्जुन हालाकुर्की (५५) याने उपांत्य फेरीत चांगल्या स्थितीत असतानाही सामना गमावला. त्याला इराणच्या पौया मोहम्मद नासेरपौरविरुद्ध ७-८ ने पराभव स्वीकारावा लागला.
मेहर सिंगला अंतिम चारच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. कोरियाच्या मिंसेओक किमने त्याचा ९-१ ने पराभव केला. दिवसाच्या पहिल्या पात्रता फेरीच्या लढतीत साजनला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताच्या आशेला धक्का बसला. साजनला किर्गिस्तानच्या अंडर-२३ आशियन चॅम्पियन रेनत इलियाजुलूविरुद्ध ९-६ ने पराभव स्वीकारावा लागला.
सचिन राणा (६३ किलो) याला एलमरत तस्मुरादोव्हने एकतर्फी लढतीत ८-० ने पराभूत केले. रेपेचेज फेरीत त्याच्या पदरी निराशा आली. त्याला कजाखिस्तानच्या यर्नूर फिदाखमेटोव्हविरुद्ध ६-३ ने पराभव स्वीकारावा लागला.
कोरोनाचे सावट
चीनमध्ये पसरलेल्या कोरोना संक्रमणाचे सावट भारतात मंगळवारी सुरू झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेवर पडले. जपान, कोरिया आणि चायनिज तायपेईचे मल्ल मास्क घालून वावरत होते. आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालत असल्याचे पाहुण्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे मत आहे.