दहा कोटींचा दंड भरणार नाही, ऑलिम्पिक संघटनेला सरकारचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:46 IST2019-08-07T20:45:07+5:302019-08-07T20:46:56+5:30
एकदा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धाची तारीख निश्चित केली की, मग आम्ही वेगवेगळ्य़ा 47 कामांसाठी निविदा जारी करू, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

दहा कोटींचा दंड भरणार नाही, ऑलिम्पिक संघटनेला सरकारचा इशारा
पणजी : गोवा सरकार राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या वर्षी आयोजित करील. आमची तयारी आहे. मात्र भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दहा कोटींचा जो दंड गोव्याला ठोठावला आहे, तो भरायचा नाही असा सरकारचा निर्णय झाला आहे, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना आजगावकर उत्तर देत होते. आजगावकर यांच्याकडेच क्रीडा खाते आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यापूर्वी आम्ही घेऊ शकलो नाही पण आम्ही सगळ्य़ा साधनसुविधा उभ्या केल्या आहेत. अजुनही कामे सुरू आहेत. सुमारे 390 कोटी रुपये आम्ही खर्च केले आहेत. एकदा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाची तारीख निश्चित केली की, मग आम्ही वेगवेगळ्य़ा 47 कामांसाठी निविदा जारी करू, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. तारीख जाहीर झाल्यानंतरच निवास व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, चहापान, प्रवास, स्पर्धेचा उद्घाटन व समारोप सोहळा अशा कामांसाठी निविदा जारी करता येतील. आम्ही संघटनेच्या पत्रच्या प्रतिक्षेत आहोत. संघटनेने आम्हाला तारीख निश्चित करून सांगावी. आम्ही साधनसुविधांबाबत कुठेच कमी पडत नाही. मात्र संघटनेने दहा कोटींचा दंड ठोठावला तरी, आम्ही तो भरणार नाही, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
आमदार सुदिन ढवळीकर यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाबाबत प्रश्न विचारला होता. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मडगाव-फातोर्डाच्या जलतरण तलावाविषयी प्रश्न विचारला. तिथे लोकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते, असे कामत यांनी सांगितले. सरकार तेथील शुद्धीकरण प्रकल्प बदलेल आणि जलतरण तलावाचे नूतनीकरणही करील, त्यावर नऊ कोटींचा खर्च केला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. कांपालच्या जलतरण तलावाचा राष्ट्रीय स्पर्धासाठी वापर केला जाईल. लुसोफोनियावेळी उभ्या केलेल्या साधनसुविधांचाही आम्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी वापर करू, असे आजगावकर यांनी नमूद केले.