लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:14 IST2025-12-05T15:13:25+5:302025-12-05T15:14:18+5:30
Lionel Messi Retirement Fifa World Cup: २०२२च्या अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजयात लिओनेल मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली होती

लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
Lionel Messi Retirement Fifa World Cup: लिओनेल मेस्सी हा जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने २०२२ चा फिफा विश्वचषक जिंकला. मेस्सीच्या संघाने अंतिम फेरीत पेनल्टी शूटआउटद्वारे फ्रान्सचा पराभव केला. मेस्सी अलीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना पुढील विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. लिओनेल मेस्सी २०२६ च्या फिफा विश्वचषकात खेळण्याबाबत अजूनही अनिश्चित असला तरी, अर्जेंटिना जेव्हा आपले जेतेपद राखेल तेव्हा तो मैदानावर किंवा स्टँडवर उपस्थित राहील असा त्याला विश्वास आहे. ३८ वर्षीय मेस्सीने आगामी विश्वचषकात खेळण्याबाबत अनेक वेळा साशंकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या विश्वचषक ड्रॉपूर्वी मेस्सीने ईएसपीएनला एक विशेष मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान, मेस्सीने केलेल्या विधानामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
"खरं सांगायचं तर, माझे कोच आणि मी (माझ्या खेळण्याच्या उपलब्धतेबाबत) खूप बोललो आहोत. स्कोलोनी मला समजून घेतात आणि आम्ही त्यावर अनेक वेळा चर्चा केली आहे. मला आशा आहे विश्वचषकावेळी मी तिथे असेन. मी आधी सांगितले आहे की मला तिथे उपस्थित राहायचे आहे. कितीही आव्हानात्मक परिस्थिती असली तरीही मी लाईव्ह सामना पाहण्यासाठी नक्कीच जाईन. कारण तो क्षण नेहमीच खास असेल. विश्वचषक प्रत्येकासाठी खास असतो, परंतु आमच्यासाठी त्याचा अर्थ काही वेगळाच असतो. ते आमच्यासाठी जीवन आहे."
कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक २०२२ च्या आठवणी सांगताना लिओनेल मेस्सी म्हणाला, "नेदरलँड्स आणि फ्रान्सविरुद्ध, आमचा खेळ चांगला होता, तरीही सामने पेनल्टीवर गेले. आमच्याकडे 'दिबू' (एमिलियानो मार्टिनेझ) नावाचा एक गोलकीपर होता, ज्याने आम्हाला विजय मिळवून दिला. पण पेनल्टी शूटआऊट हा असा खेळ आहे जो तुम्ही जिंकूही शकता किंवा हरु पण शकता."
लिओनेल मेस्सीने लिओनेल स्कालोनीचे कौतुक करताना म्हटले, "संघात जे आनंददायी वातावरण आहे, ते कोच स्कालोनी आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफमुळे आहे. ऊर्जा, संघातील बंध, सर्वकाही तिथूनच येते. नवीन खेळाडू सतत सामील होत असतात आणि जेव्हा असा गट असा असतो तेव्हा कोणालाही संघात खेळणे सोपे होते. विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा आत्मविश्वास आणि तयारी पूर्णपणे बदलली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर तुम्ही वेगळ्या मानसिकतेने स्पर्धांसाठी तयारी करता. अर्जेंटिनाने या क्षणाचा फायदा घ्यायला हवा.