स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 21:39 IST2024-12-10T21:39:17+5:302024-12-10T21:39:59+5:30
Michail Antonio Ferrari Car Accident: निर्जन अशा जंगलात अपघात झाल्याने बराचवेळ कुणाला याबद्दल कळू शकलं नाही

स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात
Michail Antonio Ferrari Car Accident : भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत दिल्लीहून डेहराडूनला जात असताना त्याचा भीषण कारअपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातात पंतच्या गुडघ्याचे लिगामेंट तुटले. त्यानंतर पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्याला एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. ही घटना साऱ्यांच्याच अंगावर काटा आणते. आताही अशीच एक घटना एका स्टार खेळाडूसोबत घडली आहे. प्रीमियर लीग फुटबॉल स्टार मायकेल अँटोनियोता एक भयानक कार अपघात झाला आहे, ज्यामध्ये त्याच्या कारचा पुढचा भाग निखळून पडला आणि तो गंभीर जखमी झाला.
मायकेल अँटोनियोचा जीव थोडक्यात वाचला
शनिवारी, ७ डिसेंबर रोजी हा अपघात झाला. कार अपघातात जखमी झालेल्या स्टार मायकेल अँटोनियोची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याला मध्य लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, मायकेल अँटोनियोच्या कारला एपिंग फॉरेस्ट भागाच्या काठावर कोपिस रो येथे अपघात झाला. त्याची कार एका झाडाला धडकली, त्यानंतर तो कारच्या आत अडकून राहिला. अँटोनियो एक तासाहून अधिक काळ कारमध्ये अडकून पडला होता. त्यानंतर एका व्यक्तीने त्याला पाहिले आणि अपघाताची माहिती हेल्पलाइनवर कळवली. त्यानंतर त्याना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.
शरीराच्या कमरेखालील भागात अनेक फ्रॅक्चर
या अपघातात मायकेल अँटोनियो याच्या शरीराच्या खालच्या भागात अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तो रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. अँटोनियो प्रीमियर लीगमध्ये वेस्ट हॅमकडून खेळतो. मायकेल अँटोनियोच्या तब्येतीबद्दल अपडेट देताना, वेस्ट हॅमने एका निवेदनात म्हटले आहे की, 'वेस्ट हॅम युनायटेड पुष्टी करते की शनिवारी दुपारी रस्ते अपघातानंतर मायकेल अँटोनियोच्या शरीराच्या खालच्या भागात शस्त्रक्रिया झाली आहे. येत्या काही दिवसांत त्याच्यावर रुग्णालयात देखरेख ठेवण्यात येणार आहे.
२०१५ पासून मायकेल अँटोनियो वेस्ट हॅम संघाचा भाग
लंडनमध्ये जन्मलेला जमैकन खेळाडू मायकल अँटोनियो २०१५ मध्ये वेस्ट हॅमकडून खेळत होता. त्याने या क्लबसाठी ३२३ सामन्यांत ८३ गोल केले. मायकेल अँटोनियोने ताज्या हंगामात १५ सामन्यांत एकदाच गोल केला आहे. त्यात घरच्या मैदानावर इप्सविच विरुद्ध त्याच्या संघाला ४-१ असा विजय मिळाला होता.