ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 26 - सामना जिंकल्यानंतर मैदानावर ‘पूश-अप’करीत आनंद साजरा करण्याची पद्धत चुकीची ठरवित पाकिस्तानच्या संसदेने (नॅशनल असेम्ब्ली)ही कृती देशाची प्रतिमा मलिन करणारी ठरविली आहे. असे करण्याऐवजी मैदानाव नवाफिल(नमाज) पढण्याची ताकीद पाक क्रिकेट बोर्डामार्फत खेळाडूंना दिली आहे. पाकचा कर्णधार मिस्बाह उल हक याने सर्वात आधी ही कृती केली होती. सामना जिंकल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करताना त्याने मैदानावर चक्क पूश-अप केले होते. त्याचे अनुकरण अन्य खेळाडूंनीदेखील केले. पीसीबी खेळाडूंच्या या कृतीवर नाराज आहे. यापुढे असे करायचे नाही, असे स्पष्ट निर्देश खेळाडूंना बोर्डाने दिले. पाकमधील वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार बोर्डाने खेळाडूंच्या कृतीवर तीव्र नाराजी दर्शवित अखेर या कृतीतून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, असा सवाल केला. जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत शतक साजरे केल्यानंतर मिस्बाहने मैदानावर पूश- अप केले होते. बुधवारी झालेल्या पीसीबीच्या कार्यसमितीत हा मुद्दा प्रकर्षाने गाजला.पाकच्या नॅशनल असेंम्ब्लीतही या मुद्दावर रोष व्यक्त करण्यात आला. संसदेने बोर्ड अध्यक्ष नजम सेठी यांना खेळाडूंकडून असे वर्तन पुन्हा घडू नये अशी ताकीद दिली. हा मुद्दा इंटर प्रॉव्हिन्शियल कमिटीच्या काही खासदारांनी उपस्थित करीत यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याकडे लक्ष वेधले होते. या घडामोडीनंतर पीसीबीने खेळाडूंना ताकीद देत असे वर्तन नकरण्याची सूचना केली. पाकमधील सत्ताधारी मुस्लिम लीगचे (नवाज) खा. राणा मोहम्मद अफझल यांनी पाक क्रिकेट संघ असे वर्तन करीत काय संदेश देऊ इच्छितो, असा प्रश्न विचारला होता. दुसरे खा. चौधरी नजीब अहमद यांनी तर विजयाचा जल्लोष करताना खेळाडूंनी मैदानावर नमाज पढण्याची सूचना केली. पूश-अपऐवजी मैदानावर नमाज पढणे कधीही चांगले, असे ते म्हणाले. पीसीबी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले,‘४० वर्षांच्या मिस्बाहने आपला फिटनेस पटवून देण्यासाठी असे केले असावे.’ त्याआधी पाकचा अनुभवी फलंदाज युनूस खान याने सामना जिंकल्यानंतर सैनिकाच्या शैलीत ‘सॅल्यूट’ ठोकला होता. सेठी यांनी खेळाडूंकडून भविष्यात अशी चूक होणार नाही, असा विश्वास खासदारांना दिला.(वृत्तसंस्था)