वीरूचा नगाडा, पंजाबचा भांगडा
By Admin | Updated: May 31, 2014 05:45 IST2014-05-31T05:45:00+5:302014-05-31T05:45:00+5:30
वीरेंद्र सेहवागच्या घणाघाती शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने एलिमिनेटर-२ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला २४ धावांनी हरवून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

वीरूचा नगाडा, पंजाबचा भांगडा
विनय नायडू , मुंबई - वीरेंद्र सेहवागच्या घणाघाती शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने एलिमिनेटर-२ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला २४ धावांनी हरवून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणार्या किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ६ बाद २२६ असा धावांचा ‘हिमालय’ उभा केला होता. याला प्रत्युत्तर देताना चेन्नईनेही दोनशेचा टप्पा पार केला. परंतु, त्यांना विजय मिळवता आला नाही. चेन्नईच्या सुरेश रैनाची २५ चेंडूंतील ८७ धावांची झंझावाती खेळी व्यर्थ ठरली. बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी (दि. १) कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आयपीएल-७ च्या विजेतेपदासाठी अंतिम लढत होईल. पंजाब पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचला आहे, तर चेन्नई सहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्यापासून वंचित राहीला. सेहवाग म्हणजे काय चीज आहे, याचे प्रत्यंत्तर आज पुन्हा एकदा वानखेडेवर आले. त्याने केलेल्या धुवाधार १२२ धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ६ बाद २२६ असा धावांचा हिमालय उभा केला. इंग्लंड दौर्यासाठी निवडलेल्या संघात समावेश न झाल्याची वीरूची खदखद आज वानखेडेवर बाहेर आली. चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजीची पिसे काढत त्याने १२ चौकार आणि आठ षटकार ठोकले. सेहवागचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे. सेहवागच्या तुफानी फटकेबाजीमुळे पंजाबच्या पहिल्या दहा षटकांत १०९ धावा झाल्या होत्या. पुढच्या दहा षटकांत पंजाबने ११७ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये पंजाबने ७० धावा केल्या होत्या, त्यात सेहवागचा वाटा ४२ धावांचा होता. सेहवागने २१ चेंडंूत आपले अर्धशतक, तर ५० चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने मनन व्होरा (३४) याच्यासोबत १०.४ षटकांत ११० धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने मॅक्सवेलसोबत १४ चेंडूंत ३८ धावांची, तर डेव्हीड मिलरसोबत ३१ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली. सेहवागने पाचव्या षटकांत आपला दिल्लीचा सहकारी आशिष नेहरा याला सलग तीन चौकार ठोकून त्याची लय बिघडवली. त्याने आपला पहिला षटकार मोहित शर्माला ठोकला, नंतर त्याने अश्विन आणि जडेजालाही सीमारेषेवरून तडकावले. १२ व्या षटकांत सेहवागने नेहराला सलग दोन षटकार ठोकल्यानंतर अश्विनला आणखी एक षटकार ठोकला. १८ व्या षटकांत अश्विनला एक चौकार आणि एक षटकार ठोकणार्या सेहवागचा वारु अखेर १९ व्या षटकांत नेहरानेच रोखला. पंजाबचा सलामीवीर व्होराने ३४ धावांत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मिलरने ३८ धावा करण्यासाठी पाच चौकार आणि एक षटकार लगावला. या सर्वांच्या योगदानामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने ६ बाद २२६ असा धावांचा हिमालय उभा केला. चेन्नईकडून आशिष नेहराने सर्वाधिक ५१ धावा दिल्या आणि दोन बळी घेतले.