सिंधू, श्रीकांत यांना अव्वल मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:08 AM2018-04-04T02:08:44+5:302018-04-04T02:08:44+5:30

आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत यांना बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीमध्ये ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात दुसºया फेरीमध्ये फाकलँड आयलँडच्या जोई मौरिसविरुद्ध करणार आहे.

Top rankings for Sindhu and Srikanth | सिंधू, श्रीकांत यांना अव्वल मानांकन

सिंधू, श्रीकांत यांना अव्वल मानांकन

googlenewsNext

गोल्ड कोस्ट - आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत यांना बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीमध्ये ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात दुसºया फेरीमध्ये फाकलँड आयलँडच्या जोई मौरिसविरुद्ध करणार आहे. या दोन्ही खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.
२०१० ची चॅम्पियन व जागतिक क्रमावरीतील माजी नंबर वन खेळाडू सायना नेहवालला दुसरे मानांकन देण्यात आले असून, दुसºया फेरीत तिची गाठ एल्सी डिव्हिलियर्ससोबत पडणार आहे. भारताच्या रुतविका शिवानी गाडे हिला आठवे मानांकन देण्यात आले आहे. तिची लढत दुसºया फेरीत घानाच्या अतिपाका ग्रेस गहा व सेशेल्सची अह वान ज्युलियट यांच्या दरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूसोबत होईल. रुतविकाला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. तिला उपांत्यपूर्व फेरीत २०१४ ग्लास्गो स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या ख्रिस्टी गिलमोरसोबत खेळावे लागू शकते.
गेल्या मोसमात चार स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणारा श्रीकांत पुरुष एकेरीत आपल्या मोहिमेची सुरुवात फिजीच्या लियाम फोंगविरुद्ध करेल. उपांत्य फेरीत त्याची गाठ २०१० च्या स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या राजीव ओसेफसोबत पडू शकते.
गेल्या महिन्यात आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाºया एच. एस. प्रणयला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. त्याला दुसºया फेरीत मॉरिशसचा पॉल ख्रिस्टोफर जीन व सेशेल्सचा स्टीव्ह मालकोजेन यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत खेळावे लागेल. उपांत्य फेरीत त्याची गाठ तीनदा आॅलिम्पिक रौप्यपदक पटकावणाºया ली चोंग वेईसोबत पडू शकते. त्याला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.

पुरुष दुहेरीमध्ये चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रंकीरेड्डी ही भारतीय जोडी धक्कादायक निकाल नोंदवण्यास सक्षम आहे. इंडोनेशिया मास्टर्समध्ये उपांत्य फेरी गाठणाºया या जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.

मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा व सिक्की रेड्डी या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे तर सात्विकसाईराज व अश्विनी पोनप्पा ही जोडीही स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. महिला दुहेरीमध्ये सिक्की व अश्विनी या जोडीला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. ही जोडी पदकाची दावेदार मानल्या जात आहे. अश्विनी यापूर्वी ज्वाला गुट्टाच्या साथीने सुवर्ण व रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे.

बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात बुधवारला मिश्र सांघिक स्पर्धेने होणार आहे. त्यात मलेशिया, इंग्लंड आणि भारत पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.

नव्या सर्व्हिस नियमांचा प्रयोग नाही

राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंना दिलासा देणारी बातमी आहे. आयोजकांनी बीडब्ल्यूएफच्या प्रायोगिक सर्व्हिस नियमांची अंमलबजावणी लांबणीवर टाकली आहे.
नव्या सर्व्हिस नियमांतर्गत शटल जमिनीच्या दीड मीटर उंचीवर असायला हवे. हा प्रयोग मार्चमध्ये आॅल इंग्लंड स्पर्धेदरम्यान करण्यात आला होता. भारतीय खेळाडूंशिवाय डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन आणि दोन वेळेचा चॅम्पियन चीनचा लीन डॅन यांच्यासारख्या स्टार्सने नव्या नियमास विरोध दर्शविला होता. राष्टÑकुल स्पर्धा जुन्याच नियमानुसार होणार आहे. यात सर्व्हिसच्या वेळी शटलची उंची कमरेच्या बरोबरीनुसार व्हायला हवी.

पी. व्ही. सिंधूने आॅल इंग्लंडसारख्या मोठ्या स्पर्धेत नव्या नियमांचा प्रयोग केल्याबद्दल बीडब्ल्यूएफला धारेवर धरले होते. खेळाडूंना नव्या नियमांची पुरेशी ओळख होणे तसेच अनुभव येण्यासाठी वेळ द्यायला हवा, असे सिंधूचे मत होते. राष्टÑकुल स्पर्धेत बॅडमिंटनला ५ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

भारतीयांचे आव्हान असेल - चोंग वेई
गोल्डकोस्ट : यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल. यावेळी पुरुष एकेरी गटामध्ये भारतीय खेळाडूंचे मुख्य आव्हान असेल,’ असे मत राष्ट्रकुल स्पर्धेत चार सुवर्ण पदक पटकावलेला मलेशियाचा दिग्गज बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने व्यक्त केले.
चोंग वेई म्हणाला की, ‘यंदा सर्वात मोठे आव्हान भारताकडून मिळेल. श्रीकांत आणि प्रणॉय चांगल्या लयीत असून सुवर्ण पदकाचे दावेदारही आहेत.’ जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेला श्रीकांत आणि १२व्या स्थानी असलेल्या प्रणॉय यांनी गेल्या वर्षी शानदार कामगिरी करताना दिग्गज खेळाडूंना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे दोघांनाही यंदा सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
याआधी २०१४ साली भारताच्या पी. कश्यप याने पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. चोंग वेई याने २००६ साली पुरुष एकेरी आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर २०१० साली नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने दोन्ही गटात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. दरम्यान, २०१४ साली ग्लास्गो स्पर्धेत चोंग वेई सहभागी झाला नव्हता, मात्र आता ती कसर यंदा भरुन काढण्यासाठ तो पूर्णपणे सज्ज झाला आहे. (वृत्तसंस्था)

सायनाच्या धमकीनंतर आयओए नरमले

गोल्ड कोस्ट : भारतीय आॅलिम्पिक महासंघाला (आयओए) मंगळवारी सायना नेहवालचे वडील हरवीर सिंग यांचे अधिकृत मान्यता कार्ड (एक्रिडेशन) तयार करण्याची मागणी मान्य करावी लागली. कारण सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली होती.
राष्ट्रकुल स्पर्धा २०१० च्या सुवर्णपदक विजेत्या सायनाने गोल्ड कोस्टमध्ये उपस्थित आयओएच्या एका वरीष्ठ पदाधिकाºयाला पत्र लिहिले होते. त्यात तिने लिहिले की, जर माझ्या वडिलांना ‘एक अधिकार’ म्हणून मंजुरी मिळाली नाही तर मी या स्पर्धेत सहभागी होणार नाही.
सायनाने आयओएला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘मी तुम्हाला संदेश पाठविला आणि तुमच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही फोन रिसिव्ह केला नाही, पण माझ्या वडिलांबाबत मोठा मुद्दा बनविण्यात आला. जर एक अधिकारी म्हणून त्यांचे एक्रिडेशन तयार होत नसेल तर मी सामना खेळणार नाही.’
आयओएच्या एका अधिकाºयाने याप्रकरणी सायना नेहवालने पत्र लिहिले असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आयओएचे वरीष्ठ अधिकारी म्हणाले, ‘खेळाडूंची मदत करणे आमचे कर्तव्य आहे. त्यांनी पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. होय, सायनाने वरीष्ठ अधिकाºयांना पत्र लिहिले, पण आम्ही याला मुद्दा बनवू इच्छित नाही. आम्ही त्यावर तोडगा काढला आहे. आम्ही पत्रातील भाषेवर टिप्पणी करू इच्छित नाही.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Top rankings for Sindhu and Srikanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.