Tokyo Olympics: सिंधूने रचला इतिहास, दुसरे ऑलिम्पिक पदक; चीनच्या बिंग जियाओला नमवत पटकावले कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:17 AM2021-08-02T08:17:24+5:302021-08-02T08:22:11+5:30

Tokyo Olympics Update: स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला यंदाच्या  ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र ही कसर तिने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भरून काढली आणि ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले.

Tokyo Olympics: Sindhu makes history, Won second Olympic medal | Tokyo Olympics: सिंधूने रचला इतिहास, दुसरे ऑलिम्पिक पदक; चीनच्या बिंग जियाओला नमवत पटकावले कांस्य

Tokyo Olympics: सिंधूने रचला इतिहास, दुसरे ऑलिम्पिक पदक; चीनच्या बिंग जियाओला नमवत पटकावले कांस्य

Next

टोकियो : स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला यंदाच्या  ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र ही कसर तिने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भरून काढली आणि ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओ हिचा सरळ दोन गेममध्ये पराभव करत सिंधूने कांस्य पदक पटकावले.

सिंधू  ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तसेच तिने स्टार मल्ल सुशील कुमार याच्या विक्रमी कामगिरीशी बरोबरीही केली. सुशीलनेही कुस्तीत भारतासाठी दोन ऑलिंपिक पदके जिंकली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. सिंधूने रविवारी या विक्रमाशी बरोबरी केली.

त्याचप्रमाणे  ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटूही ठरली. सायना नेहवालने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. त्यानंतर रिओ ऑलिम्पिक अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले         होते. सिंधूचा फॉर्म पाहता तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती.

उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चिनी तैपईच्या ताय त्झू यिंगविरुद्ध तीन गेममध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर सिंधूने कांस्य पदक निसटणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. ५३ मिनिटे रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात सिंधूने बिंग हिचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. सामना एकतर्फी दिसत असला, तरी सिंधूला चांगलेच झुंजावे लागले. बिंगने दीर्घ रॅलीजवर भर देत सिंधूला काही प्रसंगी थकवले. मात्र, सिंधूने कोर्टचा चांगल्याप्रकारे वापर करताना बिंगला मागे-पुढे नाचवले. यामुळे दमछाक झालेल्या बिंगकडून अनेक चुका झाल्या आणि त्याचा फायदा घेत सिंधूने कांस्य पदक निश्चित केले. 

सिंधूकडून नेटजवळ काही चुका झाल्या. याचा फायदा घेत बिंगने पुनरागमनाचा प्रयत्न केला. परंतु, सिंधूने रॅलीजवर भर देताना बिंगला पुनरागमन करून दिले नाही. सिंधूने क्रॉस कोर्ट स्मॅश आणि ड्रॉप शॉटवरील आपले नियंत्रण पुन्हा दाखवून दिले. या फटक्यांपुढे बिंग निष्प्रभ  ठरली. सिंधूचे फटके परतवताना बिंगचे अनेक फटके कोर्टबाहेर पडले. यामुळे दबावात आलेल्या बिंगचे नियंत्रणही सुटले.  

पंतप्रधान मोदींनी केले सिंधूचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पी.व्ही. सिंधू हिचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, पी.व्ही. सिंधूचा भारताला अभिमान आहे. तसेच ती उत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे. मोदी यांनी ट्विट केले की, आम्ही सर्व सिंधूच्या खेळाने प्रफुल्लित आहोत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. भारताला तिच्यावर गर्व आहे. आणि ती उत्कृष्ट खेळाडू आहे.’ 

कौतुकाचा वर्षाव
पी.व्ही. सिंधू, दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू, तिने सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेचा मापदंड बनवला आहे. भारताला गौरवान्वित केले आहे. तिचे अभिनंदन. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

खूप छान खेळ केला सिंधुने खेळा प्रती अद्वितीय कटिबद्धता आणि समर्पण सिद्ध केले. असेच देशाचे नाव उजळत रहा, तुझ्या कामगिरीचा गर्व आहे. 
- अमित शहा, गृहमंत्री 

स्मॅशिंग विजय सिंधू, सामन्यात तुझा दबदबा कायम राहिला. आणि इतिहास रचला, दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली. भारताला तुझ्यावर गर्व आहे. मायदेशी परतण्याची प्रतीक्षा आहे. 
  - अनुराग ठाकूर, क्रीडा मंत्री 

सिंधूला पंतप्रधानांसोबत आईस्क्रीम खाण्याची संधी ?
ऑलिम्पिकसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू हिला म्हटले होते की, तू यशस्वी होऊन परत आलीस तर आपण एकत्र आईस्क्रीम खाऊ,’ त्यामुळे आता कांस्य विजेत्या खेळाडूला पंतप्रधानांसोबत आईस्क्रीम खाण्याची संधी आहे. मोदी यांनी तिला विचारले होते की, ‘रियो ऑलिम्पिकच्या वेळी तिच्यावर मोबाइल वापरणे, आईस्क्रीम खाणे यांची बंदी होती. आताही आहे का.’ त्यावर सिंधूने सांगितले होते की, ऑलिम्पिकची तयारी करत असल्याने डाएट पाळावे लागते. त्यामुळे आईस्क्रीमवर जास्त खात नाही. ’  

अशी आहे सिंधूची कारकीर्द 

- सिंधू हिचे आई-वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलिबॉल खेळाडू आहेत.
- तिने बॅडमिंटन खेळायला वयाच्या आठव्या वर्षी सुरूवात केली.
- रियो ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक मिळवले. रौप्य मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
- तिची चीनी प्रतिस्पर्धी बिंग जियायो हिने तिच्यावर १५ पैकी ९ सामन्यात विजय मिळ‌वला
- कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात मात्र सिंधूने वर्चस्व राखले
- आता तिच्याकडे दोन ऑलिम्पिक पदके आणि पाच विश्वविजेतेपद आहेत.

Web Title: Tokyo Olympics: Sindhu makes history, Won second Olympic medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.